संग्रहित छायाचित्र
पिंपरी चिंचवड: औद्योगिक परिसर चाकणमधील वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यांचा परिणाम थेट राज्याच्या तिजोरीवर आता होऊ लागला आहे. या समस्यांना कंटाळून सुमारे ५० प्रॉडक्शन प्लॅन्ट्सनी आपला गाशा गुंडाळून अन्य राज्यात स्थलांतरित होणे पसंत केले आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे चाकणमधील (Chakan) प्लॅन्टच्या उत्पादनात सातत्याने घट होत असल्याने अनेक कंपन्यांनी आपले प्लॅन्ट गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश अशा राज्यांमध्ये हलवले आहेत .
या भागात अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून जीवितहानीही मोठ्या प्रमाणात होत आहे. वाहतूक पोलिसांची कमतरता, बेशिस्त वाहतूक आणि निकृष्ट दर्जाचे रस्ते ही येथील काही प्रमुख कारणे आहेत. कच्चा माल कंपनीत येणे आणि तयार माल बाहेर जाण्यास रस्त्यांमुळे विलंब होत आहे. त्यातच वाहतूक कोंडी आणि अपघातामुळे कर्मचाऱ्यांना कंपनीत येण्या-जाण्यास उशीर होत असल्याने सर्वजण त्रासले आहेत. यापूर्वी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत गाऱ्हाणे मांडल्यावर एक उच्चस्तरीय बैठक पार पडली होती. पुणे आणि पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त, ग्रामीण पोलीस अधीक्षक, एमआयडीसी, पीएमआरडीएचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. तेव्हा खराब रस्ते, अपघात, माथाडी, कर्मचारी अडवणूक आदींवर चर्चा झाली होती. मात्र, यानंतर झालेल्या तीन बैठकांमध्ये तोडगा निघालेला नाही. (Pimpri Chinchwad News)
त्यामुळे पुन्हा एकदा या सगळ्या समस्येवर चर्चा करण्यासाठी मर्सिडीज बेंज कंपनीमध्ये नुकतेच एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राज्य सरकारने त्वरित चाकण एमआयडीसी परिसरातील रस्त्यांची कामे करावीत, अशी मागणी वाहतूक समस्येवर आयोजित बैठकीत विविध संघटनांनी केली. चाकण औद्योगिक परिसरात भेडसावणाऱ्या वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी मर्सिडीज बेंज कंपनीमध्ये प्रादेशिक परिवहन विभाग, वाहतूक विभाग यांच्यासोबत एमआयडीसीतील कंपन्यांचे प्रतिनिधी आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. निवृत्त पोलीस महासंचालक जयंत उमराणीकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश कसबे, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे सचिव दिलीप बटवाल, ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष रवी धुतेकर आदी या वेळी उपस्थित होते.
चाकण एमआयडीसी परिसरामध्ये लहान मोठ्या हजारो कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये तब्बल १५ लाख कामगार काम करत आहेत. त्यामुळे या परिसरात नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. लाखो वाहने दररोज येथील रस्त्यांवरून प्रवास करतात. मात्र, या परिसरात मुळातच रस्त्यांची, पायाभूत सुविधांची कमतरता आहे. अनेक रस्त्यांची कामे सुरू आहेत. अनेक रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. काही रस्ते अतिशय लहान आहेत. मोठी वाहने रस्त्यावर उतरली की वाहतूक कोंडी होणार, अशी परिस्थिती असते. त्यामुळे या परिसराच्या विकासाची वाढती गरज लक्षात घेता राष्ट्रीय रस्ते वाहतूक विभागाने ताबडतोब नाशिक फाटा ते राजगुरुनगर व तळेगाव चाकण-शिक्रापूर रस्ता या रस्त्यांचे काम तातडीने सुरू करणे गरजेचे आहे, अशी मागणी कंपनी आणि संघटनांच्या प्रतिनिधींनी केली. अतुल आदे म्हणाले, रस्त्यावरील अपघात व त्यात होणारे मृत्यू, हा अतिशय गंभीर विषय बनत चालला असून त्यावर ताबडतोब उपाययोजना करणे गरजेचे आहे. अपघात टाळण्यासाठी वाहतुकीच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. चालकामध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती करायला हवी.
सतीश कसबे म्हणाले, परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलिस जास्तीत जास्त प्रयत्न करत आहेत. मात्र, पोलिसांची संख्या कमी असल्याने वाहतूक नियोजन करण्यामध्ये खूप ताण येतो. त्यामुळे पोलिसांच्या मदतीसाठी कंपन्यांनी वॉर्डन दिले, तर वाहतूक नियोजन करणे सोपे जाईल. जयंत उमराणीकर म्हणाले, अपघात होण्यामागे बहुतेक वेळा माणसाचा स्वतःवरील ताबा नसणे, बेशिस्त वाहतूक अशा गोष्टी कारणीभूत आहेत. परंतु या अपघातांमध्ये एखादी व्यक्ती मृत्यू पावली तर त्या कामगारांचे पूर्ण कुटुंब उध्वस्त होते. कामगारांनी आपले कुटुंबाची काळजी घेऊन आपण जबाबदारीने व वाहतुकीचे सर्व नियम पाळून कामावर जावे. सुरक्षित कामावर जाणे व सुरक्षित घरी पोहोचणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी वाहतुकीचे नियम पाळावेत.
... तर त्या चालकांना पुरस्कार
चाकण एमआयडीसी परिसरात अपघातांचे प्रमाण मोठे आहे. या भागात जड वाहनाची संख्या जास्त असल्याने आणि अपघातातील या वाहनांचे प्रमाण जास्त असल्याने मोठ्या प्रमाणात प्राणांतिक अपघात घडतात. त्यामुळे या चालकांना प्रशिक्षण देऊन जो चालक वर्षभर एकही अपघात करणार नाही, त्याला बेस्ट ड्रायव्हरचा पुरस्कार द्यावा, अशी सूचना जयंत उमराणीकर यांनी केली. त्यांच्या सूचनेवर तातडीने अंमलबजावणी करत वर्षभर अपघात न करणाऱ्या चालकांना बेस्ट ड्राइवर हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचे मान्य केले.
वाहतूक समस्येमुळे कंपन्यांचे मोठे नुकसान
चाकण एमआयडीसी परिसरातून केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणात कर दिला जातो. येथील हजारो कंपन्यांमध्ये सुमारे १५ लाख नागरिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यामुळे सरकारने ताबडतोब चाकण एमआयडीसीतील वाहतूक समस्या सोडवावी. वाहतूक समस्येमुळे येथील कंपन्यांचे उत्पादन घटले आहे. सातत्याने उत्पादनात घट होत असल्याने सुमारे ५० कंपन्यांनी आपले प्रॉडक्शन प्लांट गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश अशा राज्यांमध्ये हलविले आहे. या कंपन्यांनी इतर राज्यांमध्ये जाऊ नये, यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना करायला हव्यात,अशी मागणी फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे सचिव दिलीप बटवाल यांनी केली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.