संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरणात (Pawna Dam) ४४.७२ टक्के तर आंद्रा धरणात ५५.४८ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. तीव्र उन्हामुळे होणाऱ्या बाष्पीभवनामुळे पाणीसाठा कमी होत आहे. उपलब्ध पाणीसाठा १५ जुलैपर्यंत पुरेल असा पाटबंधारे विभागाचा अंदाज आहे. मात्र, पावसाळा लांबल्यास शहराला पाणीटंचाईस सामोरे जावे लागेल, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
शहरासाठी महापालिका पवना धरणातून दररोज ५१० एमएलडी पाणी घेते. हे पाणी पवना नदीवरील रावेत बंधारा येथून अशुद्ध जल उपसा केंद्रात उचलले जाते. तेथून ते निगडी येथील सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध करून ते संपूर्ण शहरात पुरवले जाते. गेल्या काही दिवसांपासून आंद्रातून होणारा अपुरा पाणीपुरवठा आता सुरळीत झाला असून महापालिका ८० एमएलडी पाणी इंद्रायणी नदीवरील निघोजे येथील बंधाऱ्यातून उचलते.
हे पाणी चिखली जलशुद्धीकरण आणले जाते. तेथे पाणी शुद्ध करून चिखली, मोशी, च-होली, भोसरी परिसरातील नागरिकांना दिले जात आहे. एमआयडीसीकडून महापालिका सध्या २० एमएलडी पाणी असे एकूण ६१० एमएलडी पाणी शहराला दिले जात आहे. एप्रिल आणि मे महिन्यामध्ये उन्हाच्या झळा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पवना धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नागरिकांनी पिण्याचे पाणी हे घरगुती वापरासाठी काटकसरीने वापरावे. पाणी हे शिळे होत नसल्याने शिल्लक असलेले पाणी फेकून देऊ नये. त्या पाण्याचा पुनर्वापर करावा. पिण्याचे पाणी हे वाहने स्वच्छ करणे, बागकाम व कुंड्यासाठी, घर किंवा इमारत व परिसर स्वच्छ करणेसाठी, धुण्यासाठी वापरू नये. तसेच, सर्व सोसायटीधारकांनी सांडपाणी प्रकल्प आणि बोअरवेल सुस्थितीत ठेवून त्याचे पाणी सदनिकांमध्ये सोसायटी अंतर्गत उद्यान परिसराच्या स्वच्छतेसाठी वापरावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता श्रीकांत सवणे यांनी केले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.