हार्ट अटॅक, उष्माघातात दगावले ३६ प्राणी
निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय हे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून वन विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर आता येथील मृत ३६ प्राण्यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. हृदयरोगाचा झटका (हार्ट अटॅक), निमोनिया, डायरिया, बर्ड फ्लू तसेच उष्माघाताने हे प्राणी दगावल्याची माहिती प्राण्यांच्या शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे. विशेष म्हणजे मृत प्राण्यांतील एक कासव त्वचारोगाने दगावल्याचेही समोर आले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात २०१७ ते २०२३ या सहा वर्षांत प्राणिसंग्रहालयातील ३६ प्राणी दगावले असल्याचा मुद्दा चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांनी नागपूर अधिवेशनामध्ये मांडला. त्यावर निसर्गकवी बहिणाबाई चौधरी सर्पोद्यान व प्राणिसंग्रहालयातील ३६ प्राण्यांच्या मृत्यू प्रकरणाची नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांमार्फत चौकशी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जाहीर केला. तसेच हे प्राणिसंग्रहालय वन विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, महापालिकेच्या माध्यमातून चिंचवडमधील संभाजीनगरमध्ये एमआयडीसीच्या सात एकर जागेमध्ये १९८९ मध्ये निसर्गकवी बहिणाबाई चौधरी सर्पोद्यान व प्राणी संग्रहालय उभारण्यात आले. त्यानंतर या संग्रहालयाच्या नूतनीकरणासाठी २०१७ ला सुरुवात झाली. तेव्हापासून संग्रहालयाला टाळे आहे.
नूतनीकरणाचे काम सुरू झाले तेव्हा प्राणिसंग्रहालयात २२० प्राणी होते. मात्र, मागील सहा वर्षांत ३६ प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता प्राणिसंग्रहालयात १८४ प्राणी-पक्षी आहेत. प्राणिसंग्रहालयाचे नूतनीकरण सुरू झाल्यानंतर नागरिकांसाठी हे सर्पोद्यान बंद करण्यात आले. २५ नोव्हेंबर २०१७ रोजी सर्पोद्यानातील मोराचा मृत्यू झाला. त्यानंतर सहा वर्षांत सात मोर, चार कासव, एक पक्षी, सहा मगर, पाच साप, पाच घुबड, एक ग्लॉसी इबिक पक्षी, चार बजेरी गर पक्षी, एक पॅरॉकिट पक्षी आणि दोन पोपटांचा मृत्यू झाला आहे. या सर्व मृत प्राण्यांचे औंध येथील शासकीय पशू रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. या अहवालामध्ये डायरिया, हार्ट अटॅक, अवयव निकामी होणे, गॅस्ट्रो, उष्माघात, वयोमान, त्वचारोग, बर्ड फ्ल्यू यांमुळे प्राण्यांचे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
डायटनुसार आहार
निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयात एक डॉक्टर, एक अभिरक्षक, तीन ऑनिमल किपर्स, सहा कर्मचारी अशा एकूण ११ लोकांची टीम प्राण्यांची देखभाल करते. डॉक्टरांनी ठरवून दिलेल्या डायटनुसार त्यांना आहार दिला जातो. तसेच प्रत्येक प्राण्यांवर योग्य वेळी उपचार केले जातात. मात्र, साथीचे आजार नियंत्रणात येत नसल्याने या प्राण्यांचा मृत्यू होत आहे, असे पशु वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात येत आहे.
निसर्गकवी बहिणाबाई चौधरी सर्पोद्यान व प्राणिसंग्रहालयातील ३६ प्राण्यांचा २०१७ ते २०२३ या सहा वर्षांच्या काळात मृत्यू झाला आहे. या सर्व मृत प्राण्यांचे औंध येथील शासकीय पशू रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आले आहे. या सर्व प्राण्यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल सेंट्रल झू ॲथॉरिटीला पाठविण्यात आला आहे.
- संदीप खोत, उपायुक्त, पशु वैद्यकीय विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.