संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड: राहण्यायोग्य व स्मार्ट शहरामुळे नागरिकांनी राहण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहराला प्राधान्य दिलेले दिसून येत आहे. सध्या वाढत असलेल्या लोकसंख्येमुळे पायाभूत सोयी सुविधांसोबत पाण्याचीही मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे. यामुळे शहरातील नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने मागील १८ महिन्यांपासून चार योजना कार्यान्वित केल्या असून त्यासाठी आजतागायत केंद्र शासनाकडून सुमारे ४२ कोटींचा निधी मिळालेला आहे. या चार योजनांवर २३८ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार असून प्रकल्पांतर्गत असणारी सर्व कामे सध्या प्रगतीपथावर आहेत, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली आहे. (Pimpri Chinchwad News)
पिंपरी-चिंचवड शहर पायाभूत सोयी सुविधांमुळे नागरिकांना आकर्षित करत आहे. त्यामुळे शहराची लोकसंख्या मोठया प्रमाणात वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येला पायाभूत सुविधा पुरवतानाच त्यांच्या मुलभूत गरजांची पुर्तता होणे गरजेचे आहे. शहरात वाढत्या पाण्याच्या मागणीवरही मनपाचा पाणी पुरवठा विभाग सातत्याने काम करत आहे. नागरिकांना मुबलक पाणी मिळावे, शहरातील पाणी क्षमतेत वाढ होण्यासाठी चार पॅकेजच्या माध्यमातून सध्या शहरात काम सुरु असून हा प्रकल्पामुळे मनपा हद्दीतील भागांचा विकास होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे मनपा हद्दीतील नागरिकांना मुबलक पाणी देण्यास पालिकेचा प्रयत्न असणार आहे.
महापालिका हद्दीमध्ये वाढलेली लोकसंख्या पाहता पाण्याची मागणी वाढलेली आहे. वाढलेल्या पाण्याच्या मागणीमुळे पाणी साठवणुकीसाठी मनपाचा पाणी पुरवठा विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे. पाणी क्षमता वाढवण्यासाठी तब्बल २३८ कोटींची योजना लागू असून त्याचे मागील १८ महिन्यांपासून सुरु असलेले काम झपाट्याने पुर्ण होण्याच्या दिशेने सुरु आहे. यामध्ये मुख्य जलवाहिन्या व मोठ्या टाक्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. योजनेसाठी तब्बल २३८ कोटींचा निधी खर्च होणार असून सदर काम २०४१ च्या वाढणाऱ्या लोकसंख्येला गृहीत धरून सुरू करण्यात आलेले आहे. सदर योजनेमधील सर्व कामे सध्या प्रगतिपथावर आहेत.
या पॅकेज चार योजनेच्या माध्यमातून शहरामध्ये पाण्याच्या उंच टाक्या, पंप हाऊस बांधणे व टाक्यांना जोडणाऱ्या मुख्य जलवाहिनी टाकण्यात येणार आहेत. सदर कामे ही शहराची २०४१ ची लोकसंख्या गृहीत धरुन करण्यात येत असून चालू वर्षामध्ये सदर कामे पुर्ण होऊन ती कार्यान्वित होणार आहेत. असेही आयुक्त सिंह यांनी सांगितले.
६० टक्के क्षेत्रात गळती प्रतिबंधक जलवाहिन्या
महापालिका हद्दीतील वाढत्या पाण्याच्या मागणीवर मनपाचा पाणी पुरवठा विभाग सात्यत्याने प्रयत्नशील असतो. नागरिकांना मुबलक पाणी मिळण्यासाठी शासनाच्या 'अमृत १ योजने'अंतर्गत मनपाद्वारे संपूर्ण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात ६० टक्के क्षेत्रामध्ये गळती प्रतिबंधक असणारी उच्च घनता पॉलिथिलीन (एचडीपीई) जलवाहिनी टाकण्यात आली आहे. त्याचबरोबर १,२५,००० जुन्या नळ जोडणींची नव्याने जोडणी करण्यासाठी मध्यम घनता पॉलिथिलीन (एमडीपीई) जलवाहिनी सारखे साहित्य वापरण्यात आलेले आहे. शहरातील जल वाहिन्यांमधील गळती थांबविण्यासाठी महानगरपालिकेने सर्वोत्कृष्ट दर्जाची पाइपलाइन टाकण्यात येत असून भविष्यात पाण्याची गळती यामुळे थांबणार आहे. असेही आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.
असा होणार योजनेवर खर्च
टप्पा १) योजनेतील भाग – डुडुळगाव, चोवीसवाडी, वडमुखवाडी, चरोल्ही - काम – मुख्य पाइपलाइन व ८ टाक्यांचे बांधकाम - रुपये – ६२.४३ कोटी
टप्पा २) योजनेतील भाग – चिखली, मोशी, व परिसर - काम – मुख्य पाइपलाइन व ३ टाक्यांचे बांधकाम - रुपये – ५९.४३ कोटी
टप्पा ३) योजनेतील भाग – भोसरी, वाकड, थेरगाव, - काम – मुख्य पाइपलाइन व ९ टाक्यांचे बांधकाम - रुपये – ६४.६६ कोटी
टप्पा ४) योजनेतील भाग –किवळे, पुनावळे, ताथवडे - काम – मुख्य पाइपलाइन व १० टाक्यांचे बांधकाम - रुपये – ५१.७८ कोटी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची सध्याची लोकसंख्येस ७७१ द.ल.लि प्रतिदिन पाणी आरक्षीत असले तरी २०४१ च्या लोकसंख्येस ते कमी पडणार असून त्यासाठी मनपाने मुळशी धरणातून पिंपरी-चिंचवड शहरास पाणीपुरवठा मंजूर करण्याची मागणी शासनाकडे केली आहे. नवीन 'भामा आसखेड योजने'द्वारे चिखली येथून पाणी सुरू झाल्यानंतर पाणी साठवणुकीच्या झालेल्या कामांमुळे शहरातील पाणीपुरवठा सक्षम होण्यास मदत होणार आहे.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.