संग्रहित छायाचित्र
(विकास शिंदे)
पिंपरी-चिंचवड: आशिया खंडातील श्रीमंत महानगरपालिका अशी बिरुदावली मिरवणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेला (PCMC) आता भिकेचे डोहाळे लागण्यास सुरुवात झाली आहे. तत्कालीन सत्ताधारी आणि प्रशासकीय काय॔काळात तरतुदीपेक्षा मोठी भांडवली कामे काढल्याने पालिकेला कर्जरोखे आणि कर्ज काढण्याची वेळ आली आहे.
त्यामुळेच पालिकेवर स्थापत्य, स्थापत्य प्रकल्प, बीआरटी, विद्युत, पर्यावरण, जलनिस्सारण, पाणी पुरवठा, भांडार, आरोग्य या विभागातील तब्बल ४ हजार ५०० कोटीचे विविध कामांचे दायित्व राहिले आहे. दरम्यान, बांधकाम परवानगी, करसंकलन, एलबीटी, पाणी पुरवठा, आकाशचिन्ह यासह अन्य विभागातील उत्पन्नाचे स्रोत कमी झाले आहेत. त्यामुळेच पिंपरी-चिंचवड महापालिकेला ऋण काढून सण साजरे करायची वेळ आली आहे. (Pimpri Chinchwad News)
श्रीमंत महापालिका असा नावलाैकिक असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या राष्ट्रीयकृत विविध बँकामध्ये सुमारे दीड हजार काेटी रूपयांच्या बचत ठेवी असताना कर्जाचे डोहाळे लागले आहेत. तत्कालीन सत्ताधाऱ्यांकडून आणि प्रशासकीय राजवटीत पवना, इंद्रायणी आणि मुळा-मुठा या नदी सुधार प्रकल्पासाठी दोनशे काेटी रूपयांचे कर्जराेखे घेण्यात आले. त्यानंतर आता माेशी सुसज्ज रूग्णालय, पुणे-मुंबई महामार्ग, टेल्को रोड आणि हरित सेतू प्रकल्प, पादचारी मार्गाचे सुशोभीकरण करण्यासाठी ५५० काेटी रूपयांचे कर्ज महापालिका घेणार आहे. महापालिकेचे सात हजार काेटी रूपयांचे अंदाजपत्रक आहे. पिंपरी-चिंचवड शहर सर्व बाजूने झपाट्याने वाढत असून विस्तारत आहे. शहराची लाेकसंख्या सुमारे २७ लाखांच्या घरात गेली आहे. शहरात सहा लाख १५ हजार निवासी, व्यावसायिक, औद्याेगिकसह इतर मालमत्ता आहेत. या मालमत्तांच्या माध्यमातून महापालिकेला सुमारे एक हजार काेटी रूपयांचा महसूल मिळतो.
तसेच बांधकाम परवानगी, अग्निशमन विभाग ना-हरकत दाखला, आकाश चिन्ह विभागासह विविध माध्यमातून उत्पन्न मिळते. वस्तू व सेवाकरापोटी (जीएसटी) शासनाकडून अनुदान मिळते. त्यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली आहे. विविध बँकामध्ये दीड हजार काेटी रूपयांच्या बचत ठेवी असताना प्रशासकीय राजवटीत कर्ज घेण्यावर भर दिसून येत आहे.
महापालिकेत १३ मार्च २०२२ पासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. या राजवटीतच पवना, मुळा आणि इंद्रायणी नदी सुधारसाठी दोनशे काेटी रूपयांचे कर्जराेखे उभारण्यात आले. मात्र, नदी सुधारच्या कामाला अद्याप मुर्हूत मिळालेला नाही. त्यामुळे महापालिकेला व्याज भरावे लागत असून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. आता माेशीत रूग्णालय उभारणे, पुणे-मुंबई महामार्ग, टेल्काे राेडचे सुशाेभीकरण, टेल्को रोड, पादचारी, सायकल मार्ग, हरित सेतू प्रकल्प उभारण्यात येणार आहे. ही कामे महापालिका कर्ज काढून करणार आहे. त्यासाठी विविध बॅंकांकडून कमी व्याजदराने मुदत कर्ज घेण्यात येणार आहे. १२ ते १५ वर्ष कालावधीसाठी कमी व्याजदराने कर्ज मिळावे, यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी निविदा नाेटीस प्रसिद्ध केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. दीड हजार कोटीच्या बचत ठेवी सुरक्षित आहेत. माेठे प्रकल्प महापालिका निधीतून करणे याेग्य नाही. छाेट्या प्रकल्पांसाठी निधीची आवश्यकता असते. त्यामुळे माेठ्या प्रकल्पासाठी कर्ज काढण्यात येत आहे. मात्र, स्थापत्य विभागासह अन्य विभागाची तरतूद कमी असताना देखील मोठमोठी कामे काढली जात आहेत. त्यामुळेच साडेचार हजार कोटीचे दायित्व झाले आहे.
- प्रविण जैन, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.