पिंपरी-चिंचवड : राडारोड्याने उद्योगनगरी तुंबली!

मागील दोन दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. संततधार पावसामुळे शहरातील ओढे-नाले तुडुंब भरून वाहात आहेत.

Pimpri Chinchwad News

पिंपरी-चिंचवड : राडारोड्याने उद्योगनगरी तुंबली!

पवना, इंद्रायणीत टाकला भराव-राडारोडा, पाणी थेट घुसले घरा-घरांत; ओढे-नाल्यांवर बांधकामांना परवानगी अंगलट, आयुक्तांचा कानाडोळा; नागरिकांचे हाल

मागील दोन दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. संततधार पावसामुळे शहरातील ओढे-नाले तुडुंब भरून वाहात आहेत. मात्र, पवना, इंद्रायणी नदीपात्रात टाकलेला भराव, राडारोडा आणि नैसर्गिक ओढे-नाल्यांवर अतिक्रमण करून दिलेल्या बांधकाम परवानगीमुळे शहरातील अनेक सोसायटीत पहिल्या मजल्यापर्यंत पाणी आले आहे.

त्याशिवाय नागरिकांच्या घरात पाणी घुसले आहे. याकडे महापालिका आयुक्तांनी कानाडोळा करून वेळीच कारवाई न केल्याने उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड तुंबल्याचे समोर आले आहे.
महापालिकेच्या जलनिस्सारण विभागाकडून रस्त्यावर व सखल भागात पाणी साठू नये म्हणून सर्व्हेक्षण करण्यात आले. यातून उघडी गटारे, स्टाॅर्म वाॅटर, ड्रेनेज, नैसर्गिक नाले, ओढे, रस्त्यावरील, रेल्वे मार्गावरील छोटे-मोठे सी.डी.वर्क्स, या भागाचे सर्व्हेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणामुळे शहरातील शेकडो बांधकाम व्यावसायिकांनी नैसर्गिक नाले, ओढे बुजविले असून नाल्यांवर अतिक्रमण केल्याचे निर्देशनास आलेले आहे. वाढते नागरीकरण, लोकसंख्या वाढ आणि झपाट्याने वाढलेले गृहनिर्माण प्रकल्प यामुळे ड्रेनेज लाईन कालबाह्य होऊ लागली, शहरात सांडपाणी निचरा करणारी जलनिस्सारण व्यवस्था देखील जुनी झाल्याने लिकेज होत आहे. अनेक भागात नैसर्गिक नाले पाईपलाईन टाकून बुजवले गेले आहेत. काही ठिकाणी नाल्यांवरच बांधकामे केली आहेत. त्यामुळे ड्रेनेजलाईन वारंवार तुंबणे, पावसाळ्यात पाण्याचा योग्य निचरा न होणे, लोकवस्तीत पाणी शिरणे आणि रस्त्यावर, भुयारी मार्गात पाणी साचून तळे निर्माण होऊ लागल्याचे आज सर्वत्र दिसत आहे. शहराच्या चारही बाजूने टोलेजंग इमारती उभारत आहेत. शहरात अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार सिमेंट काँक्रिटचे रस्ते, रस्त्याहून मोठे पदपथ निर्माण केले आहेत. त्यामुळे थोडा जरी पाऊस झाला तर रस्त्यावर देखील पाणी साचत आहे. त्या पाण्याचा योग्य निचरा होत नाही. त्यावेळी ड्रेनेज लाईन, स्टॉर्म वॉटर लाईन कुचकामी ठरत आहे.  
शहरात अनेक भागात रि-डेव्हलमेंट होत आहे. अनेक गावातील चाळी, बैठी घरे, झोपडपट्टी, बंगले तोडून टोलेजंग इमारती उभ्या राहात आहेत. परंतु, त्या भागातील ड्रेनेज लाईन व स्ट्राॅर्म वाॅटर जुनी व कमी क्षमतेच्या असल्याने सांडपाणी तिप्पटीने वाढल्याने ड्रेनेज लाईन वारंवार तुंबण्याचे प्रकार होत आहेत. काही भागात दाट लोकवस्ती व झोपटपट्टी भागात जुन्याच ड्रेनेजलाईन आहेत. त्या स्वच्छ न केल्याने कचरा, गाळ, दगडी साचल्याने त्या चोकअप होत आहेत. दगड-माती साचून कायमच्या बंद झाल्याने सांडपाणी प्रवाहास अडथळे निर्माण होत आहेत.

दरम्यान, महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी 'नेमीची येतो पावसाळा' म्हणून पवना, इंद्रायणी नदीत टाकलेल्या भराव, राडारोडा यासह नैसर्गिक ओढे-नाल्यांवर झालेले अतिक्रमण, त्याशिवाय कमी व्यासाच्या पाईप टाकून बांधकाम विभागाकडून शेकडो बिल्डरांना दिलेले 'ना हरकत' दाखले याकडे कानाडोळा केला. त्यामुळे महापालिकेकडून तत्काळ कारवाई केली असती, वेळीच पाणी साठणाऱ्या ठिकाणांची साफसफाई केली असती तर आज पिंपरी-चिंचवड तुंबले नसते, अशी संतप्त भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

ओढे-नाले बुजवा, पूररेषेत बांधकाम करा
पवना, इंद्रायणी नदीपात्रात पूररेषा शेकडो बांधकामे सुरू आहेत. अनेक भागात नदी काठावर दिवसाढवळ्या भराव, राडारोडा टाकला जात आहे. शहरात नदीकाठावर अनधिकृत बांधकामे, पत्राशेड आणि नवीन गृहप्रकल्प होत आहेत. ही बांधकामे, पत्राशेड होताना नैसर्गिक नाले, ओढे, ड्रेनेज लाईन गायब केले आहेत. महापालिका हद्दीत नैसर्गिक नाले, ओढे हे बांधकाम व्यावसायिकांनी स्थापत्य विभागाकडून 'ना हरकत' दाखले घेऊन बुजवले आहेत. त्या पाईपची साफसफाई होत नाही. नाले, ओढे बुजवताना त्या भूमिगत पाईप टाकण्यात आलेल्या आहेत. त्या पाईप कमी व्यासाच्या आहेत. अचानक पाऊस जास्त झाला. पाण्याचा योग्य निचरा न होता सखल भागात पाणी साचून राहात आहे, ड्रेनेज तुंबण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. अतिक्रमणामुळे देखील अनेक भागात नाले साफसफाई करता येत नाही. त्यामुळे अनेक वर्षांपासूनच कचरा साचून राहिला आहे. त्यामुळे अनेक भागात पावसाचे पाणी साचून राहात आहे. पूरपरिस्थिती निर्माण होऊन नागरिकांचा जीव धोक्यात जात आहे.

ऐन पावसाळ्यात येतात अडचणी
शहरातील अनेक सखल भागात पाणी साचून पूरस्थिती निर्माण झालेली आहे. पावसाळ्याअगोदर ड्रेनेज लाईन, स्ट्राॅर्म वाॅटर यात माती, दगड, प्लाॅस्टिक, कचरा साचून राहिला आहे का, याबाबत वेळीच साफसफाई केलेली नाही. तर नैसर्गिक नाले, ओढे हे बिल्डर व्यावसायिक कमी व्यासाच्या पाईप टाकून बुजवले आहेत. काही ठिकाणी त्यावर थेट अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचून राहिले आहे. रस्ते जलमय झाले आहेत. शेकडो नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. गटारे तुंबली, ड्रेनेज लाईन ओव्हर फ्लो होत आहेत. नाल्यांच्या भिंती पडणे, रस्त्यात खड्डे पडणे, रस्त्यात साठलेल्या पाण्यात अपघात होत आहे. वाहतुकीला अडथळा होऊन सखल भागात पाणी साठून रस्ता तो जलमय होत आहे.

अधिकाऱ्याने दिली कबुली
शहरात ड्रेनेज लाईन, नैसर्गिक नाले, ओढे सर्व्हेक्षण केले आहे. यामध्ये अनेक नैसर्गिक नाले, ड्रेनेज लाईनवर अनधिकृत बांधकामे, अतिक्रमण झाले आहे. हे उघड सत्य आहे. ड्रेनेज लाईनमध्ये माती, दगड, कचरा आढळून आला आहे. अनेक ड्रेनेज लाईन खराब होऊन फुटल्या आहेत. काही चोकअप, ना दुरुस्त झालेल्या आहेत, असे महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे. 

... म्हणून सर्वत्र साचले पाणी
संततधार पाऊस सुरू असताना देखील पिंपरी-चिंचवडचे रस्ते कधी जलमय होत नाहीत. पण, महापालिकेने योग्य साफसफाई न केल्याने सगळे रस्ते जलमय होऊन पूरस्थिती झाली आहे. रस्ते जलमय होऊ नयेत, रस्त्यावर पाणी साठू नये, याकरिता रस्त्याच्या कडेच्या सर्व स्टॉर्म वॉटर लाईन स्वच्छ केलेल्या नाहीत. पावसाळ्यात खड्डे होऊ नयेत यासाठी सर्व रस्ते पावसाळ्यापूर्वीच दुरुस्त केले नाहीत. सर्व नदीवरील पूल, रस्त्यावरील पूल, रेल्वे पूल, त्यांच्या दोन्ही बाजूला पाण्याचा निचरा होणारे सर्व मार्ग मोकळे केले नाहीत. शहरातील सर्व नाले, सी.डी. वर्क हे स्वच्छ केलेले नाहीत. सर्व नाले, ओढे, स्टॉर्म वॉटर लाईन गटारे स्वच्छ केलेले नाहीत. नाल्यावरील अतिक्रमण काढले नाही. नाल्यास अडथळा ठरणारे पाईप लाईन, केबल, सर्व्हिस लाईन स्थलांतरित करून अडथळा दूर केलेला नाही.  बंदिस्त गटारे, बुजविलेले नाले, ओढे पुनरुजीवन केलेले नाहीत. ड्रेनेज लाईन व्यवस्थेचे चोकअप काढलेले नाही. त्यामुळे महापालिकेने वेळीच कामे करून साफसफाई केली असती, तर हे पाणी आज साचून राहिले नसते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest