संग्रहित छायाचित्र
कर संकलन विभागाच्या मालमत्ता कराच्या ऑनलाइन बिलामध्ये उपयाेगकर्ता शुल्काची रक्कम दिसत असली तरी शासन स्थगिती आदेशामुळे एकूण भरायची जी रक्कम आहे, ती उपयाेगकर्ता शुल्क वजाकरून दर्शवण्यात आली आहे. मालमत्ताधारकांना उपयाेगकर्ता शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. तसेच अंतिम देय रक्कम जी बिलामध्ये दर्शवण्यात आली आहे, त्यामध्ये उपयाेगकर्ता शुल्काचा समावेश नाही. त्यामुळे रहिवासी मिळकतधारकांनी आपला थकीत मालमत्ताकर तत्काळ भरावा, असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात ६ लाख २५ हजार मालमत्ता आहेत. यापैकी ४ लाख ३३ हजार ७५९ मालमत्ताधारकांनी आपला पूर्ण कराचा भरणा केला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत महापालिकेच्या तिजाेरीत ८८६ काेटींचा महसूल जमा झाला आहे. असे असले तरी २०२४-२५ या आर्थिक वर्षात कर संकलन विभागाला १ हजार काेटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आर्थिक वर्ष संपण्यास अवघे पाच दिवस बाकी असताना ११४ काेटींची वसुली करण्याचे माेठे आव्हान कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख आणि त्यांच्या टीमपुढे असणार आहे. तर कर संकलन विभागाकडून थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करणे, थकबाकीदारांची नावे वर्तमानपत्रात प्रसिध्द करणे, नळ कनेक्शन खंडित करणे, जनजागृती करण्यासह विविध माेहिमा हाती घेतल्या आहेत.
जास्तीत-जास्त कर वसुलीसाठी कर संकलन विभागाचे उद्दिष्ट आहे. मात्र, असे असतानाच कर संकलन विभागाचे कर्मचारी सदनिकाधारकांकडे कर वसुलीसाठी जातात, तेव्हा अनेकांनी उपयाेगकर्ता शुल्क रद्द झाला असताना त्या रकमेचा आमच्या बिलात समावेश झाला आहे, त्यामुळे आम्ही अद्याप कर भरला नसल्याचे सांगत आहेत. मात्र, ऑनलाइन बिलामध्ये उपयाेगकर्ता शुल्काची रक्कम दिसत असली तरी शासन आदेशामुळे शुल्क वसुलीला स्थगिती देण्यात आलेली आहे. बिलामध्ये एकूण भरायची जी रक्कम आहे, ती उपयाेगकर्ता शुल्क वजा करून दर्शवण्यात आली आहे. मालमत्ताधारकांना उपयाेगकर्ता शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. तसेच अंतिम देय रक्कम जी बिलामध्ये दर्शवण्यात आली आहे, त्यामध्ये उपयाेगकर्ता शुल्काचा समावेश नाही. त्यामुळे मालमत्ताधारकांनी फक्त आपला थकीत कर त्वरित भरावा.
निवासी मालमत्ताधारकांकडे ३५४ काेटींची थकबाकी
पिंपरी-चिंचवड शहरात १ लाख ४८ हजार २०३ निवासी मालमत्ता आहे. या मालमत्ताधारकांना वेळाेवेळी कर भरण्याबाबत आवाहन केले. मात्र, त्यानंतरही कर न भरणा-या या मालमत्ताधारकांकडे तब्बल ३५४ काेटींची थकबाकी आहे. कर भरण्याची ऐपत असतानाही कर भरण्यास टाळाटाळ मालमत्ताधारकांनी करू नये. त्याउलट थकीत करावर दंडाची रक्कम दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांचेच नुकसान हाेत असल्याने अशा थकबाकीदार मालमत्ताधारकांनी तत्काळ कर भरून शहर विकासामध्ये याेगदान द्यावे, असे आवाहन कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.