पवना धरण १०० टक्के भरले, १४०० क्यूसेक्सने विसर्ग
ऑगस्ट महिना पुर्णपणे कोरडा गेल्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच पावसाने जोरदार कमबॅक केले आहे. शुक्रवारी रात्रीपासून पुणे, पिंपरी चिंचवड आणि आजूबाजूच्या परिसरात पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. पवना धरण १०० टक्के भरले असून धरणातून १४०० क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
याबाबत माहिती देताना पवना धरण पूरनियंत्रण कक्षाने म्हटले की, पवना धरण १०० टक्के टक्के क्षमतेने भरलेले आहे. तरी विजनिर्मिती ग्रुहद्वारे पवना नदीमध्ये पिण्यासाठी व सिंचनासाठी सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी ८०० क्यूसेक्स विसर्ग करण्यात आलेला आहे. हा विसर्ग दुपारी १२ वाजता वाढवून ८०० क्यूसेक्सवरून १४०० क्यूसेक्स करण्यात आला आहे.
तसेच धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता कधीही पवना धरणाच्या सांडव्यावरून पवना नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे. तरी पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीमधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी व पाटबंधारे विभागास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.