पिंपरी-चिंचवड : वादळ-वाऱ्यात होर्डिंग्ज पडल्यास जबाबदारी मालकांची!
शहरात विविध ठिकाणी जाहिरात होर्डिंग्ज (hoardings) महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाकडे मंजूर करून उभारलेले आहेत. मात्र, अवकाळी पावसात वादळ, वारा मोठ्या प्रमाणात येत असतो. या वादळात कुजलेले, गंजलेले आणि कमकुवत झालेले जाहिरात फलक कोसळण्याची शक्यता असते. त्यामुळे कमकुवत, कुंजलेले जाहिरात होर्डिग्ज तत्काळ हटवण्यात यावेत अन्यथा जाहिरात फलकांचे स्ट्रक्चर पडून जीवित किंवा वित्त हानी झाल्यास संबंधित मालक, चालकाला जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल, असा इशारा सह-आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी दिला. (Pcmc)
महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या वतीने जाहिरात होर्डिंग्ज चालक, मालक यांची बैठक मुख्य प्रशासकीय इमारतीत घेण्यात आली. जाहिरात फलक पडू नये म्हणून त्या घटना टाळण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यासाठी सूचना करण्यात आल्या. यावेळी सह-आयुक्त चंद्रकांत इंदलकर, उपायुक्त संदीप खोत, संबंधित विभागांचे कर्मचारी उपस्थित होते. महापालिका हद्दीतील काही जाहिरात फलक हे महापालिका परवानगीकरीता प्रलंबित आहेत. ही बाब उच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे. तसेच सर्व जाहिरात फलकांची सादर केलेली स्ट्रक्चर स्टॅबिलिटी पुन्हा सन २०२४-२५ एप्रिल अखेरपर्यंत तपासून घेण्याबाबत सूचना बैठकीत देण्यात आल्या.
महापालिका हद्दीमध्ये असणाऱ्या सर्व जाहिरात फलकधारकांनी उभारण्यात आलेल्या फलकांचे स्ट्रक्चर मजबूत आहे का याची खातरजमा करणे गरजेचे आहे. जर स्ट्रक्चर कमकुवत असेल तर ते त्वरित हटवण्यात यावे. येत्या काही दिवसांत वादळ, वारा किंवा जोरदार पावसाने स्ट्रक्चर पडून जीवित किंवा वित्त हानी झाल्यास त्यास जाहिरात फलकधारकास जबाबदार धरण्यात येणार आहे. महापालिका हद्दीमध्ये विविध ठिकाणी जाहिरात फलकधारकांनी जाहिरात फलक मंजूर करून उभारले आहेत. येत्या काही दिवसात पावसाळ्यास सुरुवात होईल. पावसाळ्याच्या सुरुवातीस वादळ, वारा मोठ्या प्रमाणावर येत असतो. अशा प्रकारच्या वादळ वाऱ्याने कुजलेली, गंजलेली, कमकुवत अशा प्रकारचे जाहिरात फलकांचे स्ट्रक्चर पडून जीवितहानी किंवा वित्तहानी होण्याच्या घटना यापूर्वी झालेल्या आहेत.
शहरात अनेक मंजूर केलेल्या फलकांचे नूतनीकरण करताना स्ट्रक्चर स्टॅबिलिटी सादर केलेले असले तरीही अपघाताच्या घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागतो, तसेच अनेकदा जीवित आणि वित्त हानी होण्याची शक्यता असते. हा विषय गंभीर असून याबाबत महापालिकेने कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.
जाहिरात फलकांचे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र आकाशचिन्ह व परवाना विभागास सादर करणे बंधनकारक आहे. जाहिरात फलकांना ज्या संरचना अभियंत्यांनी प्रमाणपत्र दिलेले आहे, त्यापैकी एखादे जाहिरात फलक कमकुवत आढळले किंवा फलक पडून काही जीवित, वित्त हानी झाल्यास संबंधित संरचना अभियंत्यास जबाबदार धरण्यात येणार आहे. याबाबत आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत.
- संदीप खोत, उपायुक्त, आकाशचिन्ह व परवाना विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.