...अन्यथा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार
रावेत येथील मेट्रो इको पार्कमधील (Metro Eco Park) झाडे वाचवण्यासाठी बचाव समितीकडून एक वर्षापासून प्रशासनाशी संघर्ष सुरु आहे. मात्र, गेंड्याच्या कातडीचे प्रशासन मेट्रो इको पार्कमधील दुर्मिळ झाडे वाचवण्यासाठी कुठलाही प्रयत्न करत नाही, तसेच नागरिकांनादेखील मदत करत नाही. त्यामुळेच रावेत परिसरातील मेट्रो इको पार्क बचाव समितीकडून आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकावर बहिष्कार (Boycott of municipal elections) टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे.
रावेत मेट्रो इको पार्क गेट समोर रविवारी (दि. ३१) सकाळी दहा वाजता कोणत्याही घोषणा न देता, निषेध व्यक्त न करता तोंडाला पट्टी बांधून मूक आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी सर्व आंदोलक लोकसभा, विधानसभा आणि महापालिका मतदान प्रक्रियेवर बहिष्कार घालण्यासंदर्भात निर्णय मेट्रो इको पार्क बचाव समितीकडून निर्णय घेण्यात येणार आहे.
नागरिकांच्या हक्कांच्या १० टक्के आरक्षित जागेत बसवलेले मेट्रो इको पार्क हे परस्पर खोटा पंचनामा करून निवडणूक आयोगाला देण्यात आले आहे. पुणे जिल्हाधिकारी यांनी अधिकाराचा गैरवापर करून ते बंद केले आहे.
त्यातील १४० वृक्षदेखील प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मारली गेली आहेत. जर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आमची बाजू आणि कायद्याची बाजू समजून न घेता त्यांचे निर्णय आमच्यावर लादत असेल तर हे मेट्रो इको पार्क वाचवण्यासाठी व पर्यावरण वाचवण्यासाठी आम्ही येणाऱ्या लोकसभा, विधानसभा व नगरपालिका निवडणुकीचा बहिष्कार टाकू, अशा इशारा मेट्रो इको पार्क बचाव समितीच्या पदाधिका-यांनी दिला आहे.
मेट्रो इको पार्क प्रवेशद्वारावर बचाव समितीने नागरिकांना रविवारी (दि. ३१) सकाळी १० वाजता एकत्रित येण्याचे आवाहन केले आहे. आपले म्हणणे कागदावर लिहून तोंडाला पट्टी बांधून ते मूक आंदोलन करणार आहेत, असेही समितीकडून सांगण्यात आले आहे.
अनधिकृत बांधकाम तत्काळ थांबवून इको पार्क नागरिकांसाठी खुले करण्याची मागणी
शासन एकीकडे झाडे लावा, झाडे जगवा म्हणत असताना दुसरीकडे अधिका-यांच्या निष्काळजी पणामुळे रावेत येथील 'मेट्रो इको पार्क'मधील १४० झाडे पाण्याविना मृत पावली आहेत. यामध्ये चेरी, पळस, बेहडा, आपटा, आंबा, करंज, सिंदूर, कल्पवृक्ष, रुद्राक्ष, नागकेशर, तुती, कृष्ण वड, पिंपळ, जांभूळ, शमी या वृक्षांसह अनेक दुर्मिळ जातीच्या झाडांचा समावेश होता.
याबाबत महापालिका उद्यान व वृक्ष संवर्धन विभागाकडे पर्यावरण प्रेमींनी तक्रार केली. त्यानंतर पालिकेच्या उद्यान विभागाने झाडांचा पंचनामा करत अहवाल तयार केला. त्यात १४० झाडांना तीन महिन्यापासून पाणीच दिले नाही. झाडांभोवती आळे तयार केले नाही. पार्कमधील उंच गवत वाढून त्यामुळे अनेक दुर्मिळ जातीची झाडे मृत झाली आहे. या सर्व बाबी लक्षात घेता, मेट्रो इको पार्कच्या झाडांची हरित लवादाच्या आदेशाने योग्य काळजी न घेणा-या संबधित अधिका-यांवर कडक कारवाई करावी, तसेच इको पार्कमधील अनधिकृत बांधकाम तात्काळ थांबवून नागरिकांसाठी खुले करावे, अशी मागणी पर्यावरण प्रेमी करत आहेत.
माजी नगरसेवक, आमदार, खासदारांकडून आश्वासनावर बोळवण
मेट्रो इको पार्क वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. प्रशासनातील प्रत्येकाला भेटलो. पोलीस तक्रारी केल्या, उपोषण केलं, मानवी साखळी केली, हरित लवादामध्ये देखील तक्रार करण्यात आली. पण कुणीही दाद दिली नाही. स्थानिक माजी नगरसेवक, आमदार आणि खासदार यांनीदेखील फक्त आश्वासन दिले. त्यामुळे आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. देशात लोकशाही असताना जर लोकांचं मत आणि बाजू जनतेचे प्रतिनिधी आणि प्रशासन ऐकून घेत नसेल तर अशा लोकशाहीचा तसेच निवडणूक या सर्वांत मोठ्या उत्सवाचा उपयोग काय, असा प्रत्येक संवेदनशील नागरिकाला अंतर्मुख करणारा सवाल मेट्रो इको पार्क बचाव समितीने उपस्थित केला आहे.
रावेतचे इको पार्क हे नागरिकांसाठी तत्काळ खुले करण्यात यावे. सदरची जागा निवडणूक आयोगाला हस्तांतरित करताना ही जागा मोकळी आणि पडिक असल्याचा स्थळ पाहणी अहवाल चुकीचा बनवला. शासनाची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करा. १४० झाडे मृत होण्यास दोषी अधिकाऱ्यांना जबाबदार धरून जाणीवपूर्वक वृक्ष कायदा, जैवविविधता कायदा आणि वन्यजीव कायद्यातंर्गत कारवाई करावी. निवडणूक आयोगाच्या इमारतीसाठी महापालिकेची बांधकाम परवानगी न घेता पीडब्लूडी विभागाकडून काम सुरु आहे. त्या अनधिकृत इमारतीवर कारवाई करा. आम्ही जिवाचे रान करुन इको पार्क वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. हरित लवादाच्या आदेशानंतरही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून इको पार्कमधील झाडांची काळजी घेतली जात नाही. लोकशाही मार्गाने आंदोलन करुनही दखल घेतली जात नसेल तर आम्ही निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेऊ.
– प्रशांत राऊळ,
ग्रीन आर्मी, पिंपरी-चिंचवड
इको मेट्रो पार्क वाचवण्यासाठी आम्ही पर्यावरणप्रेमी नागरिक सातत्याने प्रयत्न करत आहोत. तेथील झाडांची आम्ही मुलांप्रमाणे काळजी घेत सांभाळ केला. काही झाडेदेखील लावली. त्या सगळ्या झाडांना पाणी घालून मोठी केली. मात्र, पार्क बंद केल्याने झाडांना पाणी देत आले नाही. त्यामुळेच १४० झाडे मृत पावली. हे प्रशासकीय अधिकारी आणि बिल्डर यांचे पाप आहे. तसेच इको पार्क अद्याप खुले केलेले नाही. त्यामुळेच आम्ही सनदशीर मार्गाने आंदोलन करत निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा विचार करत आहोत.
– विकास बडोलिया, पर्यावरणप्रेमी नागरिक
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.