Pimpri-Chinchwad Police Commissionerate : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी मोशीतील गायरान जागेचा पर्याय; पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याकडून जागेची पाहणी

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, (Pimpri-Chinchwad Police Commissionerate) मुख्यालय आणि पोलीस परेड ग्राउंडसाठी मोशी येथील गायरान जमिनीची पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे (Vinay Kumar Choubey) यांनी पाहणी केली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rohit Athavale
  • Sat, 4 Nov 2023
  • 05:51 pm
Pimpri-Chinchwad Police Commissionerate

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी मोशीतील गायरान जागेचा पर्याय

सांगवी पोलीस ठाण्यासाठी २० गुंठे जागेची मागणी

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, (Pimpri-Chinchwad Police Commissionerate) मुख्यालय आणि पोलीस परेड ग्राउंडसाठी मोशी येथील गायरान जमिनीची पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे (Vinay Kumar Choubey) यांनी पाहणी केली. महापालिका प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय आणि राज्य सरकारकडे याबाबत स्थानिक नेते आणि पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आयुक्तालय हे पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यवर्ती भागात म्हणजे पिंपरी चौक अथवा जुन्या पुणे मुंबई महामार्गालगत असण्याची आवश्यकता आहे.

प्रस्तावित जागेची पाहणी करताना सहआयुक्त डॉ. संजय शिंदे, अतिरिक्त आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त संदिप डोईफोडे, नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड, तहसीलदार अर्चना निकम, पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आदी अधिकारी उपस्थित होते. 

पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय निर्मिती २०१८ मध्ये करण्यात आली. यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली होती. तसेच, २०१४ पासून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे आदींनी आयुक्तालयासाठी शासनदरबारी पाठपुरावा केला होता. आयुक्तालयाचे कामकाज २०१८ मध्ये  सुरू झाले. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून अद्याप आयुक्तालयासाठी हक्काची जागा मिळलेली नाही.

सध्या महापालिकेच्या शाळेच्या जुन्या इमारतीत आयुक्तालयाचा कारभार चालविला जात आहे. गेल्या पाच वर्षात आयुक्तालयाच्या कामकाजासाठी शासनाकडून अतिरिक्त वाहने आणि मनुष्यबळ देण्यात आले आहे.

दरम्यान, देहूगाव गायरान येथील ६५ एकर जागा पिंपरी-चिंचवड आयुक्तालयासाठी देण्याबाबत राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. मात्र, या जागेला स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलनात्मक भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे सदर जागा उपलब्ध होण्यास विलंब आणि अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे मोशी येथील गायरान जागेत पोलीस आयुक्तालय उभारावे, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली आहे. 

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे ३० लाखांच्या घरात आहे. शहरातील काही पोलीस ठाण्यांचे विभाजनही करण्यात येणार आहे. पोलीस परेड ग्राउंड आणि अन्य कामकाज एकाच आणि मध्यवर्ती ठिकाणी झाल्यास पोलीस आयुक्तालयाच्या प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता येईल. मध्यवर्ती ठिकाण म्हणून मोशीतील गायरान जमिनीवर पोलीस आयुक्तालयाची भव्य इमारत उभारावी, यासाठी आम्ही आग्रही आहोत. पोलीस आयुक्तांनी आज जागेची पाहणी केली. यासाठी आता महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहोत. 

- महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

सांगवी जागेसाठी तीन कोटींची २० गुंठे जागा

सांगवी पोलीस ठाण्याच्या जागेसाठी पीडब्ल्यूडी ग्राउंड नजिक असलेल्या जलसंपदा विभागाची २० गुठे जागा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पोलीस आयुक्तालय स्तरावरून यासाठी ३ कोटी रुपये मिळावेत म्हणून शासन दरबारी प्रयत्न सुरू आहेत. शासनाकडून ३ कोटी रुपये जलसंपदा विभागाला दिल्यानंतर या जागेचा ताबा गृह विभागाला मिळणार आहे. तर त्यानंतर पोलिसांच्या गृह निर्माण विभागाकडून येथे सांगवी पोलीस ठाण्याची इमारत उभी केली जाणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest