एकच खिडकी अन् सतरा हेलपाटे; पालिकेची ऑनलाईन सुविधेची घोषणा हवेतच
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) वायसीएम रुग्णालयाबाहेर जन्म-मृत्यू विभागात दाखले घेण्यासाठी नागरिकांची वणवण सुरू आहे. आठ दिवसांनंतर दाखले घेण्यासाठी येऊन देखील कधी कागदपत्रे अपुरी, तर कधी सर्व्हरची अडचण सांगितली जात आहे. नागरिकांना ऑनलाइन दाखले देण्याची योजना महापालिकेने आखली आहे. प्रत्यक्षात मात्र जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी हेलपाटेच मारावे लागत असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागात अपुऱ्या मनुष्यबळाची कारणे सांगून नागरिकांना वणवण फिरवले जात आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीमध्ये जन्म आणि मृत्यू झाल्यास त्याची नोंद वायसीएम रुग्णालयातील जन्म-मृत्यू विभागात करण्यात येते. त्यामुळे जन्म-मृत्यूचा दाखला मिळवणे नागरिकांना अनिवार्य आहे. हा दाखला नसेल, तर नागरिकांची अनेक कामे अडून राहतात. अर्ज करूनही त्यासाठी नागरिकांना वाट पाहावी लागत आहे. गेल्या काही महिन्यांपासून शेकडो नागरिकांना जन्म आणि मृत्यूचा दाखला वेळेत मिळालेला नाही.
रुग्णालयात जन्म-मृत्यूचा दाखला घेण्यासाठी एकाच खिडकीवर काम केले जाते. ते दोन ते तीन तास नागरिकांना अर्ज दाखल करून त्यानंतर दाखला घेण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. अनेकदा सर्व्हर डाउन झाल्याने हा विभाग बंद असल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. नागरिकांना सांगितलेल्या वेळेत दाखले मिळत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. दाखल्यासाठी अर्ज करून शुल्क भरल्यानंतर जन्म किंवा मृत्यूचा दाखला मिळणे आवश्यक असते. मात्र, नागरिकांना चार ते पाच दिवस हेलपाटे घालावे लागत आहेत.
तसेच, महापालिकेकडे जन्म-मृत्यूच्या काही जुन्या नोंदींचे रेकॉर्ड उपलब्ध नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा अडचण होते. ज्या नोंदींचे रेकॉर्ड पालिकेकडे उपलब्ध नाही, त्या नोंदींसाठी जर अर्ज आला, तर संबंधित व्यक्तीकडून त्याबाबतची कागदपत्रे, शपथपत्र घेऊन त्यांना रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचा शेरा असलेले दाखले दिले जात आहेत. दाखला मिळवण्यासाठी करण्यात येणारा अर्ज हा नियमानुसार जन्म-मृत्यू विभागाकडून योग्य त्या फाॅरमॅटमध्ये मिळणे आवश्यक असते. मात्र, या विभागाकडून तो अर्ज मिळत नाही. कधी तो अर्ज मिळाला तर ठीक अन्यथा नागरिकांनाच अर्ज लिहून आणण्याची सक्ती केली जात आहे.
दरम्यान, महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात सकाळी ९ ते १२ या वेळेत दाखले दिले जातात. दाखला लवकर मिळावा म्हणून अनेकजण सकाळी लवकर येऊन रांगेत उभे राहतात. तरीही सर्व्हरच्या अडचणी, अपुरे मनुष्यबळ आणि कागदपत्रांच्या अडी-अडचणी सांगून नागरिकांना वारंवार हेलपाटे मारण्यास भाग पाडले जात आहे. अनेकदा महापालिका हद्दीलगत आणि हद्दीबाहेरील लोक देखील जन्म-मृत्यू दाखले घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे जन्म-मृत्यूच्या दाखल्यासाठी नातेवाईकांना खेटे मारावे लागत आहेत.
पोर्टल बंद असल्याने नागरिक संतप्त
महापालिका हद्दीत मृत्यू झालेल्या नागरिकांचा दाखल काढण्यासाठी तब्बल २१ दिवस वाट पाहावी लागते. २१ दिवसांनंतर संबंधित मृत्यू झालेल्या नागरिकांचे रेकाॅर्ड त्या विभागात येते. त्यानंतर चार पानी इंग्रजी आणि मराठी अर्ज नातेवाईकांनी भरून द्यावा लागत आहे. मृत्यू दाखल्यासाठी येणाऱ्या अर्जांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यातच जन्म-मृत्यूची नोंदणी केंद्र सरकारच्या अधिकृत पोर्टलवर करावी लागत असून या पोर्टलवर ताण वाढल्याने या पोर्टलचा सर्व्हर मागील तीन दिवसांपासून डाऊन झाला आहे. पोर्टलवर जन्म-मृत्यूची नोंद होत असल्याने नागरिकांना जन्म-मृत्यूच्या दाखल्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. मागील पाच दिवसांपासून दाखला मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या नागरिकांना दाखले मिळत नसल्याने नागरिकांच्या संतापात भर पडली असून दाखले वेळेत उपलब्ध करून देण्याची मागणी त्रस्त नागरिकांकडून करण्यात येत आहे.
जन्म-मृत्यू विभागात एकच खिडकी असून त्या ठिकाणचे कर्मचारी संथगतीने काम करत आहेत. सकाळी लवकर येऊन रांगेत उभे राहून देखील दाखला मिळत नाही. त्यामुळे तीन ते चार दिवसांपासून चकरा मारत आहे. पालिका हद्दीबाहेरून येणा-या नागरिकांना तर खूपच मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे तीन तासात टोकन नाही भेटले तर परत दुसऱ्या दिवशी हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे मनुष्यबळ आणि आणखी खिडक्या वाढून नागरिकांची सोय करावी.
- नकुल भोईर, तक्रारदार नागरिक
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.