संग्रहित छायाचित्र
नागरिकांना भेटण्यासाठी निश्चित केलेल्या वेळेत देखील अधिकारी बैठका घेण्यावर जोर देत आहेत. परिणामी, नागरिकांची विविध कामे आणखी लांबणीवर पडली असून, त्यांचे प्रश्न, समस्या आणि अडचणी सोडवण्यासाठी कार्यालयांचे अनेक हेलपाटे मारावे लागत आहेत. पीएमआरडीएसह (PMRDA) तहसील, तलाठी, आरटीओ आणि शिधापत्रिका कार्यालयाची हीच स्थिती आहे. शहरातील नागरिक त्यांचे प्रश्न, समस्या, महत्त्वाची कामे घेऊन अधिका-यांच्या भेटीसाठी सरकारी कार्यालयात येतात. मात्र, नागरिकांना तासनतास वाट पाहात बसावे लागत आहे. पीएमआरडीए कार्यालयात पुणे जिल्ह्यातील विविध गावातून नागरिक येत असतात. आवास योजना, गृहप्रकल्प आणि जमिनीविषयक माहितीसाठी कार्यालयात येतात. मात्र, अनेकांना अधिकारी भेटत नसल्याने पुन्हा जावे लागते. तेथील कर्मचारी केवळ अर्ज दाखल करण्याचे सल्ले देत आहेत. प्रत्यक्षात अनेक हेलपाटे मारूनदेखील त्यांची कामे होत नसल्याचे दिसून येते. दुसरीकडे, आचारसंहितेमुळे नवीन कामे ठप्प झाली आहेत. त्यातच निवडणुकीचे कामात गुंतल्याने नागरिकांची कामे लांबणीवर पडली आहेत. त्यातच या कार्यात अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने एकमेकांकडे तात्पुरता चार्ज देण्यात आला आहे. परिणामी, नागरिकांना संबंधित विभागाचा अधिकारी शोधत फिरावा लागतो.
तोच प्रकार शहरातील तलाठी कार्यालय येथे दिसून येतो. शहरातील वाढत्या गाव प्रमाणे तलाठी संख्या अपुरी आहे. त्यामुळे दोन ते तीन गावांचा एका तलाठीकडे पदभार दिला आहे. त्यातच इलेक्शन ड्यूटीमुळे दुपारी बारानंतर तलाठी कार्यालय बंद असल्याचे दिसून येतात. तर, काही कार्यालयातील कर्मचारी हे नागरिकांना निवडणुकीचे कारण सांगून परत पाठवत आहेत. दुसरीकडे, शिधापत्रिका कार्यालयातदेखील सर्व अधिकारी व कर्मचारी दुपारी एक नंतर निवडणूक कामकाजासाठी बाहेर पडतो. त्यामुळे हे कार्यालय बंद करावे लागते. शहरातील १०५ प्राथमिक आणि १६ माध्यमिक शाळा चालवल्या जातात. त्यात १३०० शिक्षक कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबींशी संबंधित काही प्रश्न घेऊन येणाऱ्या शिक्षकांनासुध्दा वेळ दिला जात नाही. त्यामुळे त्यांचे प्रश्न देखील सोडवले जात नाहीत.
इलेक्शनच्या कामकाजासाठी तलाठी यांना नेमणूक केली आहे. तरीसुद्धा नागरिकांची कामे प्राधान्याने सोडवण्याच्या सूचना प्रत्येक कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
-जयराम देशमुख, अप्पर तहसीलदार, पिंपरी-चिंचवड.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.