Pimpri Chinchwad : बांधकाम व्यावसायिकांविरोधात मोफा अंतर्गत गुन्हा

खरेदीखतात नोंदवल्याप्रमाणे सर्व सुविधा उपलब्ध करून न देता तसेच नियोजित वेळेत फ्लॅटचा ताबा न देता बांधकाम व्यावसायिकाने फ्लॅटधारकांची फसवणूक केली.

Pimpri Chinchwad

बांधकाम व्यावसायिकांविरोधात मोफा अंतर्गत गुन्हा

'द नुक' हाऊसिंग सोसायटीमधील फ्लॅटधारकांचा केला विश्वासघात, खरेदी खतामध्ये सांगितलेल्या सुविधा दिल्या नाहीत

खरेदीखतात नोंदवल्याप्रमाणे सर्व सुविधा उपलब्ध करून न देता तसेच नियोजित वेळेत फ्लॅटचा ताबा न देता बांधकाम व्यावसायिकाने फ्लॅटधारकांची फसवणूक केली. तसेच २८५ फ्लॅटधारकांनी मेंटेनन्सपोटी दिलेल्या १ कोटी ४२ लाख ५० हजार रुपयांचा हिशोब दिला नाही म्हणून, बांधकाम व्यावसायिकांच्या विरोधात फसवणूक आणि महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ॲक्ट (मोफा) (MOFA Act)  अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताथवडे येथील ‘द नुक हाऊसिंग’ या सोसायटीत हा प्रकार दोन मार्च २०१६ ते १४ जानेवारी २०२४ या घडला आहे.

पिरॅमिड डेव्हलपर्सचे खेमचंद उत्तमचंद भोजवानी, पिरॅमिड डेव्हलपर्स यांचे भागीदार, प्रथमेश डेव्हलपर्स व त्यांचे भागीदार, तसेच गृहप्रकल्पाच्या जमिनीचे मालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दयानंद रवाळनाथ पाटील (वय ३८, रा. ताथवडे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिरॅमिड डेव्हलपर्सचे खेमचंद भोजवानी यांनी दयानंद पाटील यांना फ्लॅट खरेदी देताना खरेदी खतामध्ये ठरवून दिलेल्या नियम व अटीप्रमाणे अभिहस्तांतरण आणि ॲमेनिटीज दिल्या नाहीत. भोजवानी यांनी ॲमेनिटीजमध्ये बँक्वेट हॉल, स्केटिंग रिंग, बॅडमिंटन कोर्ट बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी पाटील आणि इतर फ्लॅटधारकांकडून रक्कम स्वीकारली आहे. मात्र फ्लॅटधारकांना बँक्वेट हॉल, स्केटिंग रिंग, बॅडमिंटन कोर्ट दिलेले नाही.

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) मंजूर आराखड्यामध्ये नमूद केलेल्या जागी न बांधता वेगळ्याच ठिकाणी बांधलेला आहे. तसेच बांधकाम व्यावसायिकाने मेंटेनन्स चार्ज म्हणून २८५ फ्लॅट धारकांकडून दोन वर्षांसाठी प्रत्येकी सुमारे ५० हजार रुपये प्रमाणे घेतले आहेत. त्याची एकत्रित रक्कम एक कोटी ४५ लाख ५० हजार रुपये एवढी होत असून, बांधकाम व्यावसायिकांनी सोसायटी फ्लॅटधारकांकडे हॅन्ड ओव्हर केली आहे.

बांधकाम व्यावसायिकाने पाटील आणि इतर फ्लॅटधारकांकडून मेंटेनन्स चार्ज म्हणून घेतलेल्या रकमेचा कोणताही हिशोब देण्यात आला नाही. बांधकाम व्यवसायिकाने एग्रीमेंट मध्ये लिहून दिलेल्या तारखेला फ्लॅटचा ताबा दिलेला नाही. भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करून दिलेले नाही. एग्रीमेंट करून देताना संपूर्ण इमारतीचा नकाशा जोडणे बंधनकारक असताना केवळ फ्लोअर प्लॅन जोडलेला असल्याने करार नोंदणी कायद्याप्रमाणे नोंदणी करून दिलेला नाही. फ्लॅट धारकांकडून घेतलेल्या आगाऊ रकमा बँकेत स्वतंत्र खाते उघडून त्यात ठेवलेल्या नसून त्याचा कोणताही हिशोब दिलेला नाही. सोसायटी नोंदणी झाल्यापासून चार महिन्यात संपूर्ण जमीन व इमारती सोसायटीला हस्तांतरित केलेल्या नाहीत. कन्व्हेयन्स डिड करून दिलेली नाही. त्यामुळे बांधकाम व्यवसायिकाने फिर्यादी पाटील व 'द नुक' हाऊसिंग सोसायटीमधील इतर फ्लॅटधारकांचा विश्वासघात करून फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत तक्रार अर्ज देण्यात आला होता. त्यानंतर याप्रकरणाची प्राथमिक चौकशी केल्यावर पोलीस उपायुक्तांनी दिलेल्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, वाकड पोलीस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल साळुंखे तपास करीत आहेत.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest