आता पिंपरी चिंचवडचे नाव जिजाऊनगर ?
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने चौंडी येथील आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरचे नामकरण अहिल्यादेवी नगर करण्याची घोषणा केली. या घोषणेला दोन दिवस उलटत नाहीत तोच पिंपरी चिंचवडचे नामांतर करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडचे नाव जिजाऊनगर करण्यात यावे, अशा मजकूराचे फ्लेक्स शहरातील विविध ठिकाणी लावण्यात आले आहे. भक्ती-शक्ती प्रतिष्ठानच्या वतीने हे फ्लेक्स लावण्यात आले आहेत.
या आधी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आले होते. मात्र, त्या कॅबिनेटचा निर्णय अवैध असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादचे पुन्हा छत्रपती संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला होता. त्यानंतर पुणे शहराचे नाव जिजाऊनगर करण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली होती.
अशातच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने चौंडी येथील आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरचे नामकरण अहिल्यादेवी नगर करण्याची घोषणा केली. त्यामुळे आता पुण्याऐवजी पिंपरी चिंचवडच्या नामांतराच्या मागणीने डोके वर काढल्याचे समोर आले आहे. भक्ती-शक्ती प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील विविध भागात फ्लेक्स लावण्यात आले आहेत. यामध्ये “शिवबांच्या भक्तीमध्ये ‘ती’, शिवबांच्या शक्तीमध्ये ‘ती’, मग या पवित्र संगमाच्या नावात तिला का नको स्थान? आता पिंपरी चिंचवडचे जिजाऊनगर करुया, हाच तिचा खरा सन्मान!” अशा पद्धतीचा मजकूर छापण्यात आला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडचे नामांतर जिजाऊनगर होणार का? हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.