आता गुंडांच्या मदतीशिवाय होणार तक्रारींचे निवारण

राज्याच्या औद्योगिक धोरणात गुन्हेगारी आणि माथाडीच्या नावाखाली चालणाऱ्या गुंडगिरी अडथळा होऊ नये, म्हणून पिंपरी-चिंचवड पोलिसांनी औद्योगिक तक्रार निवारण कक्षाची (इंडस्ट्रीयल ग्रिव्हियन्स सेल) स्थापना केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rohit Athavale
  • Thu, 8 Jun 2023
  • 12:48 am
आता गुंडांच्या मदतीशिवाय होणार तक्रारींचे निवारण

आता गुंडांच्या मदतीशिवाय होणार तक्रारींचे निवारण

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून औद्योगिक तक्रार निवारण कक्षाची स्थापना

रोहित आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

राज्याच्या औद्योगिक धोरणात गुन्हेगारी आणि माथाडीच्या नावाखाली चालणाऱ्या गुंडगिरी अडथळा होऊ नये, म्हणून पिंपरी-चिंचवड पोलिसांनी औद्योगिक तक्रार निवारण कक्षाची (इंडस्ट्रीयल ग्रिव्हियन्स सेल) स्थापना केली आहे.

खंडणीविरोधी पथकांतर्गत या सेलचे काम चालणार असून, चाकण एमआयडीसीतील कंपन्यांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी ही महत्वपूर्ण घोषणा केली. मंगळवारी (दि. ६) सावरदरी येथील ब्रिजस्टोन कंपनीत परिसरातील एमआयडीसी भागातील अडीचशे कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.

चाकण-म्हाळुंगे एमआयडीसी आणि आसपासच्या भागातील खंडणीखोरांवर आत्तापर्यंत १२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वी १९ जानेवारी २०२३ मध्ये कंपनी प्रतिनिधी आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांची आयुक्त चौबे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. तेव्हा खंडणी प्रकरणात तक्रार देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर सहा महिन्यांत या भागात कंपनीत ठेका मिळावा, ठराविक व्यक्तिलाच भंगार विकले जावे आणि अन्य कारणांसाठी खंडणी मागण्याचे १२ प्रकार उजेडात येऊन, संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या बैठकीला पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर, सहायक कामगार आयुक्त निखील वाळके, एमआयडीसीचे उपअभियंता श्री. चौडेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, तसेच चाकण एमआयडीसीमधील मर्सिडीज कंपनीचे सारंग जोशी, ब्रिजस्टोन कंपनीचे पौरव मेहता, न्यू हॉलंड कंपनीच्या शीतल साळुंखे, टाटा मेग्ना कंपनीचे शंकर साळुंखे, मिंडा कंपनी ग्रुपचे राज दाईजे, स्पोल अँटो कंपनीचे सुधीर पाटील त्याचबरोबर व्हायब्रंट एचआर प्रोफेशनल असोसिएशन पुणे आणि फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रिजचे प्रतिनिधी, तसेच म्हाळुंगे व चाकण, एमआयडीसीमधील २५० कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीमध्ये पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ, माथाडी बोर्डाचे सहाय्यक कामगार आयुक्त निखील वाळके, एमआयडीसी विभागाचे उपअभियंता चौडेकर यांनी उपस्थित कंपन्यांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी कंपनी प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या अडचणी तत्काळ सोडविण्याबाबत कार्यवाही करण्यात आली. त्यामध्ये विशेषतः औद्योगिक वाढीसाठी आणि गुंतवणुकदारांचे हित तसेच सुरक्षा यासंदर्भातील आवश्यक बाबींवर चर्चा करण्यात आली. कामगार संघटना, माथाडी कामगारांच्या समस्या, माथाडी कामगार कायदा, चरित्र्य पडताळणी, वाहतूक नियोजन आणि अंमलबजावणी, सीसीटीव्ही कॅमेरे, कचरा आदी महत्त्वाच्या विषयांवर यावेळी चर्चा झाली.

चाकण पोलीस ठाण्याचे विभाजन करून, आयुक्तालयांतर्गत म्हाळुंगे एमआयडीसी असे नवे पोलीस ठाणे सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर आता वासोली फाटा येथे पोलीस मदत केंद्र सुरू करण्यात येणार असून, कंपनी व्यवस्थापन तसेच अधिकारी-कर्मचारी यांना कोणत्याही स्वरूपाची मदत हवी असल्यास अथवा तक्रार करायची झाल्यास इंडस्ट्रिअल ग्रिव्हियन्स सेलशी (औद्योगिक तक्रार निवारण कक्ष) किंवा कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याशी संपर्क करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

एमआयडीसी भागामध्ये औद्योगिक वाढ होण्यासाठी तसेच सुरक्षिततेची भावना   भक्कम होण्यासाठी समन्वय बैठका नियमितपणे घेण्यात येतील. कंपनी व्यवस्थापनाने कोणत्याही गुंड प्रवृत्तीच्या लोकांबाबत भय अथवा त्यांचे दबावास बळी पडू नये. औद्योगिक क्षेत्रास कसल्याही प्रकारचा त्रास देणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.

– विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest