आता रात्रीच्या वेळी इंद्रायणीत रसायनयुक्त पाणी
पंकज खोले :
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने शहरभर पर्यावरणाचे गोडवे गात असताना, इंद्रायणी नदी आळंदीत प्रचंड प्रमाणात फेसाळली होती. मध्यरात्रीतून नदीत रसायनयुक्त सांडपाणी सोडल्याने पवित्र इंद्रायणी रात्रीतून फेसाळू लागली. साबणाच्या फेसासारखा तवंग पाण्यावर तरंगत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या वारीचे निमित्ताने हे प्रदूषण वारकऱ्यांना संताप व्यक्त करणारे ठरले. एरवी दिवसाढवळ्या नदीत सोडणारे रसायनयुक्त पाणी आता रात्रीच्या वेळी सोडण्यात येत आहे.
नदी प्रदूषण करणाऱ्यांना वारकऱ्यांच्या आरोग्याशी काहीच देणेघेणे नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. इंद्रायणीच्या उगमापासून ते तुळापूर येथील संगमापर्यंत नदीपात्र मोठ्या प्रमाणात दूषित झाले आहे. अनेकदा वारकरी संप्रदाय, सामाजिक संस्थांनी प्रदूषणाविरोधात आवाज उठवला. मात्र, याचा काही परिणाम होत नसल्याचे चित्र आहे. त्यात बुधवारी जागतिक पर्यावरण दिन आणि वारीच्या काही दिवसा अगोदरच असे चित्र वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर राग आणणारे दिसले.
मध्यरात्रीपासून प्रदूषित सांडपाणी नदीत मिसळल्याने नदीपात्रात पाण्यावर साबणासारखे फेसाचे तवंग पाहायला मिळत आहेत. मोठे फेस पाण्यावर तरंगत वाहत होते. अशा प्रदूषण करणारांवर कारवाई करणारी कोणतीच यंत्रणा पुढाकार घेत नाही. नदीबाबत या सरकारी लोकांना आस्थाच नसल्याने अशा प्रकारांकडे सोयिस्कर दुर्लक्ष केले जात आहे. मात्र, राज्याच्या कानाकोपऱ्यापासून वारकऱ्यांना अशा प्रदूषित सांडपाण्याचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. आषाढीवारी अवघ्या तीन आठवड्यांवर येऊन ठेपली.
राज्यभरातून वारकरी पुढील तीन आठवड्यांत आळंदीत दाखल होती. मात्र अशा वेळी अशाच पद्धतीने प्रदूषित सांडपाणी नदीपात्रात सोडले तर वारकऱ्यांनी स्नान करायचे कसे, असा प्रश्न पडला आहे. याकडे मात्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ,
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा पर्यावरण विभाग, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नगर परिषद मूग गिळून बसले आहे.
इंद्रायणीची केविलवाणी अवस्था
ठिक-ठिकाणांहून सांडपाणी, मैलापाणी मिसळले जात आहे. जुना पूल ते सिद्धबेट बंधाऱ्यापर्यंतचा परिसर दूषित झाला आहे. जुन्या पूलाच्यापुढे चऱ्होलीकडे जाणारे पाणी मैलायुक्त सांडपाणीच आहे. इंद्रायणीनगर, ज्ञानेश्वरी मंदिर परिसरात नदीपात्रात पूर्ण जलपर्णी आहे. नवीन पुलाजवळ उघड्यावर शौच करणे, घरचा कचरा फेकणे, असे प्रकार सुरू आहेत. दशक्रिया विधीचे निर्माल्य, मृतांचे कपडे टाकले जात आहे.
आमची हाक ऐकणार कोण ?
इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त व्हावी यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. पत्रव्यवहार, आंदोलने, उपोषण, निदर्शने अशा अनेक प्रकार अवलंबून देखील शासकीय यंत्रणा कारवाई करत नाही. लोकप्रतिनिधी फिरकत नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांनी तीन महिन्यांचा वेळ दिला होता. मात्र वर्ष उलटून देखील कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आमची हाक कोण ऐकणार, असा सवाल परिसरातील नागरिकांनी आणि आळंदी ग्रामस्थांनी केला आहे.
माऊली पालखी प्रस्थान सोहळा अगदी जवळ आला आहे. त्याच्यापूर्वी हवे तेवढे रसायनयुक्त पाणी सोडून घ्या, अशा मानसिकतेतून संधी साधून जाणीवपूर्वक हे कृत्य केले आहे. प्रशासनाने आता तरी कारवाई करावी, अशी आमची आर्त हाक आहे.
- विठ्ठल शिंदे, इंद्रायणी सेवा फाउंडेशन
संबंधित घटनेची माहिती घेण्यात येणार असून, त्या अनुषंगाने कार्यवाही करण्याच्या सूचना करण्यात आली आहे.
-मंचक जाधव, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.