प्रदूषित इंद्रायणीची हाक कोणीही ऐकेना
गेल्या महिन्यापासून फेसाळणाऱ्या प्रदूषित इंद्रायणी नदीची हाक कोणालाही ऐकू येत नसल्याचे समोर आले आहे. स्थानिकांनी पिंपरी-चिंचवड महापालिका,(Pimpri-Chinchwad Municipal Corporation) प्रदूषण नियंत्रण मंडळ यासह अनेक विभागांकडे दाद मागून, तक्रारी नोंदवूनही आणि या समस्येचा पाठपुरावा करूनही त्याची साधी दखलही घेतली जात नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. रविवारी (११ फेब्रुवारी) आळंदीत राज्यातील तीन महत्त्वाचे नेते व मंत्री आले होते. मात्र एकानेही या प्रदूषित इंद्रायणीबाबत चकार शब्द काढला नाही.
इंद्रायणी नदीचे (Indrayani River) प्रदूषण नदीपात्राचे दररोज वेगवेगळे रूप समोर आणत आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेत, आमदारांनी हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा मांडला होता. त्याकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. शासनाचे विविध विभाग व पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन कसे दुर्लक्ष करत आहे, याकडे देखील लक्ष वेधले. मात्र, त्यावर कोणती कार्यवाही झाली नाही. इंद्रायणी नदीतील दूषित पाण्यामुळे एका लहान बालकाच्या अंगावर चट्टे उठले असून, जखमा झाल्याचे इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले. याबाबत व्हीडीओ शेअर केला असून यावरती कार्यवाही करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. वेळेतच याची दखल घेतली नाही तर, भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकेल.
इंद्रायणी नदीपात्राच्या बाजूच्या पूरनियंत्रण रेषेच्या आतमध्ये होणार्या व्यवसायांचे सांडपाणी थेट इंद्रायणी नदीत सोडले जात आहे. नदी प्रदूषित करणार्यांवर सुरू केलेली कारवाई थांबली आहे. पर्यावरणाला घातक असलेले रासायनिक घटक नदीपात्रालगत जाळतात. त्यानंतर त्यामधील घातक रसायने नदीपात्रात सोडतात. अशा व्यक्तींवर पिंपरी-चिंचवड महापालिका कारवाई करत नसल्याची बाब निदर्शनास येते. आळंदी परिसरात वाढत जाणारी लोक वस्ती, चिखली येथून येणारे प्रदूषित पाणी आणि कंपन्यातून सोडलेले रासायनिक दूषित पाणी यामुळे नदी दिवसेंदिवस दूषित होत चालली आहे. विशेष म्हणजे रविवारी राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील आळंदीत एका कार्यक्रमासाठी आले होते. जवळपास अर्धा ते पाऊण तास हे तिन्ही मंत्री आळंदीत होते. मात्र त्यांनी आळंदीतील इंद्रायणी नदी पात्रातील प्रदूषणाची दखल घेतली नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ कारवाई करण्याचे आश्वासन स्थानिकांना दिले. या आश्वासनानंतर दोन दिवस उलटल्यावरही येथे एकही अधिकारी फिरकलेला नाही. इंद्रायणी नदीला फेस येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचे कारण अद्यापही प्रदूषण नियंत्रण मंडळाला सापडलेले नाही. याबाबत पर्यावरणवादी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. रसायनयुक्त पाण्यामुळे नदीला फेस येत आहे, असा आक्षेप पर्यावरणवादी संघटनांनी घेतला आहे. वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र असणाऱ्या देहू-आळंदीतील इंद्रायणी नदीची अवस्था दयनीय झाली आहे. आळंदीतील बंधाऱ्यात सोमवारी फेसाळलेले पाणी येत आहे. बंधारा ते पुलापर्यंतच्या नदीपात्रात बर्फवृष्टी झाल्याचे दिसून येत होते. प्रदूषण होत असल्याने पर्यावरणप्रेमींची निराशा व्यक्त होत आहे.
सर्व विभाग अपयशी
नदी प्रदूषणाचे कारण अद्यापही जिल्हा प्रशासन, पीएमआरडीए, प्रदूषण नियंत्रण मंडळाला सापडलेले नाही. तक्रार आल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आळंदीत येतात पाण्याचे नमुने घेऊन जातात. मात्र, चाकणच्या बाजूने होणारे नदी प्रदूषण रोखण्यात अद्यापही यश आलेले नाही.