मुळशीच्या पाण्याचा प्रस्ताव लालफितीत

पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यात पाण्याची लागणारी गरज ओळखून महापालिकेकडून मुळशी धरणातून पाणी मिळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत महापालिकेने जलसंपदा मुख्य अभियंता, राज्य सरकारसह टाटा धरणाच्या व्यवस्थापकांना देखील पत्रव्यवहार केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 6 Sep 2024
  • 03:39 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पालिकेच्या हालचालींना राज्य सरकारची टोलवाटोलवी, प्रस्ताव धूळखात पडून; लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष

पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यात पाण्याची लागणारी गरज ओळखून महापालिकेकडून मुळशी धरणातून पाणी मिळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत महापालिकेने जलसंपदा मुख्य अभियंता, राज्य सरकारसह टाटा धरणाच्या व्यवस्थापकांना देखील पत्रव्यवहार केला आहे. परंतु, जलसंपदा मुख्य अभियंता यांच्यासह टाटा धरणाच्या व्यवस्थापनाने राज्य सरकारकडे बोट दाखवत पाण्याची मागणी करण्यास सुचवले आहे. त्यानुसार महापालिकेकडून मुळशी धरणातून पाणी घेण्यासाठी प्रस्तावावर राज्य सरकारकडून अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही. यामुळे पाण्याचा प्रस्ताव सरकार दरबारी लालफितीत अडकला असून याकडे खासदार, आमदारांचेही दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.

पिंपरी-चिंचवड शहर पायाभूत सोयी सुविधांमुळे नागरिकांना आकर्षित करत आहे. त्यामुळे शहराची लोकसंख्या मोठया प्रमाणात वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येला पायाभूत सुविधा पुरवितानाच त्यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता होणे गरजेचे आहे. शहरात वाढत्या पाण्याच्या मागणीवरही मनपाचा पाणीपुरवठा विभाग सातत्याने काम करत आहे. नागरिकांना मुबलक पाणी मिळावे, शहरातील पाणी क्षमतेत वाढ होण्यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. मनपा हद्दीतील नागरिकांना मुबलक पाणी देण्यास पालिकेचा प्रयत्न असणार आहे.  शहराची लोकसंख्या वेगात वाढत आहे. सध्यस्थितीत उपलब्ध असलेले ६१० एमएलडी पाणीही सध्या कमी पडत आहे. येत्या २०३१ पर्यंत शहराची लोकसंख्या सुमारे ४३ लाखांपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे पाण्याचे नवे स्रोत शोधण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. त्या दृष्टीने मुळशी धरणातील पाणी मिळवण्यासाठी तसेच, इतर नव्या स्रोतासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू आहेत. महापालिकेने मुळशी धरणात ७६० एमएलडी पाणी आरक्षित करण्याची मागणी सात महिन्यांपूर्वी जलसंपदा विभागाकडे केली आहे. मात्र, अद्याप महापालिकेस कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

ही धरणे भागवतात शहराची तहान

शहरासाठी पवना धरणातून ५१० एमएलडी, आंद्रा धरणातून १०० एमएलडी आणि भामा आसखेड धरणातून १६७ एमएलडी असे एकूण ७७७ एमएलडी पाणी महापालिकेसाठी आरक्षित आहे. आंद्रा व भामा आसखेड प्रकल्पाचे काम अजून पूर्ण झालेले नाही. पवना व आंद्रा प्रकल्पाचे पाणी सध्या महापालिका घेत आहे. पवनेतून ५१० एमएलडी आणि आंद्रा प्रकल्पाच्या निघोजे येथील तात्पुरत्या बंधार्‍यातून दररोज ८० एमएलडी पाणी उचलले जात आहे, तर भामा आसखेड धरणातून आणखी १६७ एमएलडी पाणी मिळणार आहे. भविष्यात पाण्याची गरज ओळखून मुळशी धरणातूनही पाणी घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

भविष्यात  दीड हजार एमएलडीची गरज

भविष्यात वाढणार्‍या लोकसंख्येमुळे पिण्याच्या पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. सन २०४१ च्या संभाव्य ९६ लाख लोकसंख्येसाठी १ हजार ५३६  एमएलडी पाण्याची गरज भासणार आहे. सद्यस्थितीत ७७७ एमएलडी पाणी शहरासाठी आरक्षित आहे. उर्वरित पाण्याची गरज भागवण्यासाठी पाण्याचे नवे स्रोत महापालिकेस निर्माण करावे लागणार आहेत. त्यासाठी महापालिकेकडून विविध धरणातून पाणी घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महापालिकेने मुळशी धरणात ७६० एमएलडी पाणी आरक्षित करण्याची मागणी सात महिन्यांपूर्वी जलसंपदा विभागाकडे केली आहे.

स्रोत वाढवण्याचे प्रयत्न

पवना धरणात ५१० एमएलडी पाणीसाठा आरक्षित आहे. पवना बंद जलवाहिनी प्रकल्प पूर्ण झाल्यास शहरात अधिकचे पाणी मिळू शकेल. तसेच, आंद्रा आणि भामा आसखेड धरणातून आरक्षणापेक्षा अधिकचे पाणी उचलण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. तसेच, सांडपाणी पुनर्निर्माण करून ते बांधकाम, शहरातील उद्योग, उद्यान आणि इतर प्रकल्पांसाठी वापरण्याचे नियोजन आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा कमी वापर होऊन त्या पाण्याची बचत होणार आहे.  

२०४१ मध्ये शहराची लोकसंख्या ९६ लाखांवर

राहण्यायोग्य शहर म्हणून पिंपरी-चिंचवडला देशात पसंती मिळत आहे. मुंबई, पुणे आणि नाशिक शहराला कनेक्टिव्ही असल्याने शहराच्या चोहोबाजूंनी टोलेजंग इमारती उभ्या राहात आहेत. हाऊसिंग सोसायट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कंपन्यांच्या जागेवर टोलेजंग इमारती निर्माण होत आहेत. परिणामी, लोकवस्ती वाढून लोकसंख्या वाढत आहे. सध्या शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या आसपास आहे. मागील २५ वर्षांतील लोकसंख्या वाढीचा वेग लक्षात घेता सन २०३१ मध्ये शहराची लोकसंख्या ५२ लाख ७४ हजार ७८१ होण्याची शक्यता आहेत. तर, २०४१ ला ९६ लाख ३ हजार ८५८ इतकी लोकसंख्या होईल, असा अंदाज आहे.

... तर आणखी लोकसंख्या वाढेल

महापालिकेची हद्दवाढ होणार आहे. त्यानुसार हद्दीलगतची काही गावे महापालिकेत समाविष्ट होणार आहेत. त्यानुसार हिंजवडी, माण, मारुंजी, जांबे, नेरे, सांगवडे, गहुंजे ही सात गावे महापालिकेत समाविष्ट केली जाणार आहेत. तसेच, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा भाग, पुणे शहरातील दिघी व कळसचा उर्वरित भाग महापालिकेत समाविष्ट होण्याची करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे भविष्यात पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्येत आणखी मोठी वाढणार आहे.

सात महिन्यांपासून प्रतिसाद मिळेना

शहराची भविष्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन महापालिकेने मुळशी धरणात ७६० एमएलडी पाणी आरक्षित करण्याची मागणी जलसंपदा विभागाकडे केली आहे. त्यातील ९८.५० टक्के पाणी घरगुती पिण्यासाठी वापरले जाईल. तर, १.५० टक्के पाणी औद्योगिक व व्यावसायिक कारणांसाठी वापरले जाईल. तसे पत्र महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंत्यांना डिसेंबर २०२३ ला पाठविले आहे. त्यांनी त्या संदर्भात राज्य शासनाकडे संपर्क साधण्याबाबत महापालिकेस कळवले आहे. त्यानुसार राज्य शासनाकडे देखील प्रस्ताव पाठवला आहे. परंतु, अद्याप कोणताही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे मुळशी धरणातून पाणी घेण्याचा प्रस्ताव सरकार दरबारी लालफितीत अडकला असून त्याकडे खासदार, आमदारांचे देखील दुर्लक्ष झाले आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest