संग्रहित छायाचित्र
पंकज खोले
लोणावळा शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर सर्व जड व अवजड वाहनांना सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे. मात्र, त्याबाबत अंमलबजावणी अद्याप सुरू झालेली दिसत नाही. मार्गावर बंदी असणारा बोर्ड नाही. या संबंधित कारवाईही पोलिसांकडून झालेली नाही. त्यामुळे वाहनचालकदेखील गोंधळात आहेत. आयआरबीकडून या सूचनेचे बोर्ड अद्याप तयार झाले नाहीत.
शहरातील वाहतूक कोंडी व अपघाताच्या समस्येमुळे हा आदेश लागू करण्यात आला आहे. या वेळेत सर्व प्रकारची जड-अवजड वाहने मनशक्ती येथून द्रुतगती मार्गावर वळवण्यात येणार आहेत. खंडाळ्याच्या दिशेने येणाऱ्या सर्व जड वाहनांनाही बंदी घालण्यात आली आहे. लोणावळा शहरामध्ये शनिवार, रविवार व सलग सुट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. त्यांची वर्दळ राष्ट्रीय महामार्गावरून होत असते. त्याच मार्गावर अवजड वाहने आल्याने वाहतूक कोंडी होते. या अवजड वाहनांमुळे लोणावळा शहरामध्ये अनेक प्राणांतिक अपघात झाले आहेत. अपघाताच्या पार्श्वभूमीवर जागरूक नागरिकांच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनानंतर पोलिसांनी पाठवलेल्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सकाळी सात ते रात्री नऊ या कालावधीमध्ये अवजड वाहनांना बंदी घातली होती. मात्र अवजड वाहनांची सुस्पष्ट व्याख्या नसल्याने अनेक जड वाहने तसेच मोठे कंटेनर नजर चुकवून लोणावळा शहरातून जाण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे लोणावळा पोलिसांनी जड व अवजड वाहनांच्या प्रवेशाला बंदी घालण्याची सुधारित मागणी केली होती. मनशक्ती केंद्र ते खंडाळा बॅटरी हिल या दरम्यान हा बंदी आदेश असणार आहे.
जुन्या मार्गावर अवजड वाहनांच्या बंदीबाबत दोन दिवसांपूर्वी आदेश आला आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू केली आहे. आयआरबी कंपनीला बोर्ड लावण्याबाबत सुचवले आहे. तसेच, नियमांचे उल्लंघन केल्या कारवाई देखील करण्यात येणार आहे.
-सुहास जगताप, पोलीस निरीक्षक, लोणावळा शहर
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.