दिघीत बिबट्या मुक्कामी! दीड महिन्यांत दहा कुत्री, सहा कोल्हे फस्त
पंकज खोले
दिघी- वडमुखवाडी (Dighi- Wadmukhwadi) परिसरात गेल्या दोन दिवसापासून रात्रीच्या वेळी बिबट्याचा (Leopard) वावर होतअसल्याचे निदर्शनास आले आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी लावलेल्या कॅमेरात त्याच्या हालचाली कैद झाल्या असून, परिसरात वनविभाग अधिकारी आणि रेस्क्यूचे पथकाने शोध मोहीम राबवली आहे. परिसरातील मातीमध्ये बिबट्याचे ठसे, विष्ठा आणि झाडावर ओरखडलेली नखे आढळून आली आहेत. त्यामुळे या परिसरात जाण्यास शेतकऱ्यांना मज्जाव करण्यात आला आहे.
येथील साई मंदिर परिसरातील लक्ष्मीनारायण कॉलनी येथे गेल्या दीड महिन्यांपासून बिबट्या भटकत आहे. २० कुत्री, ६ कोल्हे असे अनेक प्राणी बिबट्याने फस्त केले आहेत. रात्री बारानंतर दिसणारा बिबट्या गेल्या दोन दिवसांपासून सायंकाळी सात वाजल्यापासून दिसू लागला आहे. परिणामी, शेतामध्ये जाण्यास शेतकरी, शेतमजूर घाबरू लागले आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींनाही याबाबत कळवण्यात आले होते. (Leopard in Dighi- Wadmukhwadi)
दरम्यान, गेल्या दोन दिवसापासून वनविभाग, स्थानिक ग्रामस्थ या बिबट्याचा शोध घेत आहे. या ठिकाणी वणवा पेटल्याने बिबट्या दुसरीकडे पळाला. रात्री बारानंतर दिसणारा बिबट्या आता सायंकाळी सात वाजता दिसू लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या परिसरातील महिला लहान मुलांना घेवून शेतकामासाठी जात असतात. त्याचप्रमाणे ग्रामस्थ व ज्येष्ठ नागरिक सकाळी बाहेर पडतात. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने तात्काळ यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, दिघी, चरोली, वडमुख वाडी या परिसरात दाट झाडी आहे. यामुळे अन्नाच्या शोधात बिबट्या लोकवस्तीमध्ये येतो. काही महिन्यांपूर्वी विश्रांतवाडीजवळ संरक्षण आणि संशोधन विकास संस्थेच्या (डीआरडीओ) परिसरात बिबट्या दिसला होता. त्यानंतर आता वडमुखवाडी परिसरात गेल्या दीड महिन्यापासून बिबट्या ग्रामस्थांना दिसत आहे.
फटाक्यांमुळे गायब
दररोज येत असलेल्या ठिकाणी वनविभागाने काही कॅमेरे सेट केले आहेत. मात्र, सायंकाळी सात वाजता बिबट्या दिसल्याने परिसरातील ग्रामस्थांनी रात्री फटाके वाजवले. त्यामुळे घाबरून बिबट्या परिसरात आलाच नाही. पर्यायाने तो कॅमेऱ्यामध्ये दिसला नसल्याने त्याचा माग काढणे अवघड झाले आहे.
बिबट्या असल्याची खात्री पटल्यानंतर परिसरात कॅमेरे लावले होते. गेल्या दोन दिवसापासून तो कॅमेरात कैद झाला होता. वनविभागाने तात्काळ कार्यवाही करून बिबट्याला पकडावे. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सायंकाळी सात वाजता बिबट्या दिसू लागला आहे. त्यामुळे सातनंतर घराबाहेर पडणे धोक्याचे वाटू लागले आहे.
- सौरभ तापकीर, शेतकरी, दिघी
दोन दिवसापासून सर्चिंग ऑपरेशन सुरू आहे. दोन ट्रॅप कॅमेरेदेखील लावले आहेत. या परिसरातील झाडांवरती बिबट्याच्या ओरखडल्याच्या खुणा देखील आहेत. आज रात्रभर पुन्हा एक पथक हालचाली टिपणार आहेत.
- अनिल राठोड, वनविभाग अधिकारी
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.