किशोर आवारे
जनसेवा विकास सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आता मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्यासह ७ जणांविरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी किशोर आवारे यांच्या आई सुलोचना आवारे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, श्याम निगडकर (रा. तळेगाव दाभाडे, मावळ जि. पुणे), सुनिल शेळके (रा. तळेगाव दाभाडे, मावळ जि पुणे), (सुधाकर शेळके (रा. तळेगाव दाभाडे, मावळ जि. पुणे), संदीप गराडे (रा. तळेगाव दाभाडे, मावळ जि. पुणे) आणि इतर ३ अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आवारे शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास तळेगांव दाभाडे नगरपरिषदेत मुख्याधिकाऱ्याला भेटण्यासाठी आले होते. मुख्याधिकाऱ्याला भेटून आवारे दुपारी दोनच्या सुमारास बाहेर पडले होते. त्यावेळी दबाधरून बसलेल्या चौघांनी त्यांच्यावर हल्ला केला. चार जणांपैकी दोघा जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. तर दोन जणांनी कोयत्याने वार केले आहेत. हा सर्वप्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.
हल्ल्यानंतर आवारे नगरपरिषदेच्या आवारात रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यानंतर सोमाटणे येथील एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. आवारे यांच्या हत्येनंतर त्यांच्या आई सुलोचना आवारे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यामुळे आमदार सुनिल शेळके यांच्यासह सात जणांवर कलम ३०२, १२० (ब), भारतीय हत्यार कायदा ३/२५, ४/२५, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ सह क्रिमीनल लाँ अमेन्टमेन्ट कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दळेगाव दाभाडे पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिकचा तपास करत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.