'त्या' संघटनेच्या विरोधात 'जोडे मारो' आंदोलन

काळाखडक झोपडपट्टीचे शासनामार्फत पुनर्वसन केले जात आहे. मात्र या परिसरात वास्तव्यास नसतानाही 'अपना वतन' या संघटनेकडून प्रकल्पाला विरोध होत असल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी मंगळवारी (२ एप्रिल) संघटनेच्या विरोधात 'जोडे मारो' आंदोलन केले.

'त्या' संघटनेच्या विरोधात 'जोडे मारो' आंदोलन

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात खो घातल्याचा निषेध, आर्थिक हितापोटी आडकाठी आणत असल्याचाही केला आरोप

काळाखडक झोपडपट्टीचे (Kalakhadak Slums) शासनामार्फत पुनर्वसन केले जात आहे. मात्र या परिसरात वास्तव्यास नसतानाही 'अपना वतन' या संघटनेकडून प्रकल्पाला विरोध होत असल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी मंगळवारी (२ एप्रिल) संघटनेच्या विरोधात 'जोडे मारो' आंदोलन केले. काळाखडक झोपडपट्टीचे शासनामार्फत पुनर्वसन होत आहे. मात्र पुनर्वसनाला विरोध करणारे 'अपना वतन' संघटनेचे (Apna Watan) पदाधिकारी सिद्दीकी शेख, जितेंद्र जुनेजा व संघटनेतील इतर पदाधिकारी हे काळाखडक येथील रहिवासी नाहीत. मात्र संघटनेकडून सामान्य जनतेच्या मनात शासनाबद्दल गैरसमज निर्माण करून दिशाभूल करण्यात येत आहे.

दरम्यान संघटनेतर्फे प्राधिकरण कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला होता. यामुळे मिळकतीवर राहणाऱ्या नागरिकांची दिशाभूल होत आहे. याचा निषेध करत स्थानिक नागरिकांकडून मंगळवारी संघटनेच्या पोस्टरला 'जोडे मारो' आंदोलन करण्यात आले. याबाबत वाकड पोलीस ठाण्यात स्थानिक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असणारे निवेदन देण्यात आले आहे. या प्रकरणी नागरिकांमध्ये वादविवाद तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची जबाबदारी संघटनेची असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच याबाबत योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

झोपडपट्टी पुनर्वसन योजना (एसआरए) राबवताना मिळणारा अडीच पट टीडीआर अन्य ठिकाणी चढ्या भावाने विकता यावा यासाठी पिंपरी-चिंचवडमधील अनेक नेते सध्या बिल्डर झाले आहेत. पण एका राजकीय नेत्याला विरोध करायला दुसरा उभा राहिला की एसआरए योजना अडकत असून, परिणामी झोपड्यांचे प्रमाण वाढत जाऊन शहराचा बकालपणा कायम राहात आहे. एकीकडे राजकीय नेते बिल्डर होऊन झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवण्यासाठी पुढे आल्यावर झोपडपट्टी बचाव समित्या स्थापन होऊ लागल्या आहेत. ठराविक नेत्याला पुनर्वसन प्रकल्प मिळू नये यासाठी दुसरा राजकीय नेता झोपडपट्टीतील नागरिकांची माथी भडकावून प्रकल्पात आर्थिक हितापोटी आडकाठी आणत असल्याची उदाहरणे पिंपरी-चिंचवडमध्ये वाढू लागली आहेत. या सागळ्याचा परिणाम म्हणजे प्रकल्प पूर्ण होण्यास उशीर होऊन, तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित झालेल्या जागांवर नवी अनधिकृत झोपडपट्टी तयार होऊ लागली आहे.

काळाखडक येथील वादात हा प्रकल्प उभारणारा राजकीय व्यक्ती नाही. मात्र, त्याला विरोध करण्यासाठी आता संघटना उभी राहिली आहे. ज्या संघटनेचे लोक या ठिकाणी राहायला नाहीत त्यांच्याकडून विरोध घडवून आणला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्या मालकाची ही जागा आहे तोच याठिकाणी हा प्रकल्प राबवत आहे.  सिद्दीक शेख म्हणाले, स्थानिकांनी तक्रार केल्याने मी पूर्वी आंदोलन केले होते. आता बिल्डरच्या सांगण्यावरून काही लोकांनी माझ्या व संघटनेच्या विरोधात आंदोलन केले आहे. लवकरच मी त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे.

या प्रकल्पास काळाखडक येथील स्थानिकांनी विरोध केल्यास त्याबाबत आमचे काही मत नाही. मात्र इथले रहिवासी नसतानाही इथल्या लोकांना भडकावून या प्रकल्पास खोडा घालणाऱ्यांबाबत आमचा विरोध आहे. शासनाकडून इथल्या प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळणार आहे. इतरांनी स्थानिक नागरिकांना भडकावून खोडा घालू नये. -अमोल देवकर, स्थानिक रहिवासी

मे. जय एंटरप्राईजेस हे जमीनमालक असून काळाखडकचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांचा एकमेव प्रस्ताव आमच्याकडे दाखल झाला आहे. त्यांच्या व्यतिरिक्त अन्य एक दोन विकासक प्रयत्न करत असल्याचे आमच्या कानावर आहे. मात्र, नियमानुसार जागामालकाला प्रथम प्राधान्य दिले जाते. त्यामुळे मे. जय एंटरप्राईजेस यांचा प्रथम संधीने प्रस्ताव मान्य केलेला आहे.  -नीलेश गटणे, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest