संग्रहित छायाचित्र
(विकास शिंदे)
पिंपरी-चिंचवड: देहू-आळंदी रस्त्यावरील 'राम झरा' (Ram Jhara) ओढ्याला वारकरी संप्रदायात विशेष स्थान आहे. संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) हे वारीला जाताना वाटेत याच 'राम झ-या' वर विसावा घेऊन पाणी पित मार्गस्थ व्हायचे, अशी वारकऱ्यांची भावना आहे. त्यामुळे रामझरा हे लाखो वारकऱ्यांचे, भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या श्रद्धास्थानाची दुरवस्था झाली असून त्याच्या पुनरुज्जीवनासाठी आता सामाजिक संस्था सरसावल्या आहेत. रामझरा परिसराच्या स्वच्छतेसाठी प्रशासनाकडे तक्रारी करण्यासोबतच या सामाजिक संघटनांनी अनेक उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. (Pimpri-Chinchwad News)
सध्यस्थितीत 'राम झरा' ओढ्याचे उगमस्थान पूर्णपणे बुजवण्यात आले आहे. त्या ओढ्यात घातक कचरा, प्लास्टिक, रसायनयुक्त व सांडपाणी सोडल्याने या ओढ्याचे स्वरूप आता गटारगंगेसारखे झाले आहे. त्यामुळेच ओढा पुनरुज्जीवित करण्यास विविध सामाजिक संघटना एकत्र आल्या आहेत. ओढ्याची स्वच्छता मोहीम राबवण्यात यावी म्हणून महापालिकेच्या सारथीवर २० ते २५ तक्रारी करण्यात आल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या नागरीकरणामुळे चिखली, मोशी परिसरात गृह प्रकल्प मोठ्या प्रमाणात उभारत आहेत. तसेच चिखली, कुदळवाडी भागात शेकडो भंगार व्यावसायिकांची दुकाने आहेत. त्या भंगार दुकानातील घातक कचरादेखील ओढ्या नाल्यात टाकला जात आहे. काही बांधकाम व्यावसायिक नैसर्गिक ओढे-नाले हे पूर्णपणे बुजवून टाकत आहेत. त्या ओढ्यात, नाल्यात राडारोडा टाकणे, आजूबाजूच्या रहिवाशांकडून प्लास्टिक, घातक कचरा, सांडपाणी सोडले जात आहे. याखेरीज औद्योगिक कंपन्यांतून बाहेर पडणारे दूषित पाणी कसलीही प्रक्रिया न करता सोडले जाते.
'राम झरा' हा ओढा वारकरी संप्रदायातील भाविकांशी नाते असणारा नैसर्गिक ओढा आहे. या ओढ्याचे उगमस्थान नेवाळेवस्ती (चिखली) ते इंद्रायणी नदी, मोई फाटा असा दोन ते तीन किलोमीटरचा हा परिसर आहे. सध्यस्थितीत राम झरा ओढ्याचे अस्तित्व मोडकळीस आले असून या ओढ्याला अतिप्रदूषित गटारगंगेचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. 'राम झरा' ओढ्याशेजारी लोकवस्ती राहणा-या नागरिकांचे आरोग्य धोकादायक बनले आहे. औद्योगिक कंपन्यांचे रसायनयुक्त व लोकवस्तीचे सांडपाणी ओढ्यात थेट मिसळत आहे. ओढ्याचे तेच पाणी इंद्रायणी नदीला जाऊन मिसळत आहे. त्या पाण्यावर कुठलीही प्रक्रिया होत नसल्याने ओढ्यासह इंद्रायणी नदीच्या पाण्याची दुर्गंधी सुटली आहे.
दरम्यान, 'राम झरा' ओढा पुनरुज्जीवित करण्यास विविध सामाजिक संघटना एकत्र येत आहेत. या ओढ्याला वारकरी संप्रदायासह आध्यात्मिक क्षेत्रात विशेष महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळेच पर्यावरणप्रेमी आणि वारक-यांच्या भावना विचारत घेऊन 'राम झरा' या नैसर्गिक ओढ्याची तत्काळ स्वच्छता मोहीम राबवण्यात यावी. त्या ओढ्यातील सर्व कचरा काढण्यात यावा. ओढ्यावरील अतिक्रमण हटवण्यात यावे, ओढ्याच्या उगमस्थानापासून ते इंद्रायणी नदीपर्यंत सर्व संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात यावा. ओढ्यात सांडपाणी व रसायनयुक्त मिसळणारे पाणी तत्काळ थांबवण्यात यावे, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.
'श्री राम झ-या'चे सामूहिक पूजन
संत तुकाराम महाराज यांच्या गाथेत राम झ-याचा विशेष उल्लेख आहे. जगद्गुरू तुकाराम महाराजही याच झ-याचे पाणी पीत असत. त्यामुळे राम झ-याला वारकरी संप्रदायात व आध्यात्मिक क्षेत्रात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. हा 'राम झरा' पुनरुज्जीवित करण्यासाठी सर्व नागरिक एकत्र येऊन येत्या २१ जानेवारी २०२४ रोजी सामूहिक उजनी करणार आहेत. सकाळी ९ ते १२ वाजता मोई फाटा देहू - आळंदी रोडवर श्रीराम झरा पूजन, श्रीराम शिळा स्थापना, परिसरात स्वच्छता मोहीम, राम रक्षा पठण, श्रीराम झरा पुनरुज्जीवित संकल्प असे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
'राम झरा' स्वच्छता अभियान विविध सामाजिक संघटनांकडून हाती घेण्यात आले आहे. तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सारथीवर २० ते २५ तक्रारी सामाजिक संघटनांकडून दाखल करण्यात आल्या आहेत. राम झरा स्वच्छ करण्यात यावा. त्यात रासायनिक व मैलामिश्रित पाणी सोडणे बंद करावे. राम झरा उगम ते इंद्रायणी संगम दोन्ही काठावरील स्वच्छ करण्यात यावेत.
- डाॅ. प्रकाश जुकंटवार, पर्यावरणप्रेमी नागरिक
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.