स्वातंत्र्यदिनी वाकडमधील शासकीय आदिवासी विद्यार्थी वसतिगृहात ध्वजारोहण न होणे दुर्दैवी – अभाविप
भारतीय स्वातंत्र्य दिन संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष पूर्ण होत असताना, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी देखील तीन दिवसीय 'हर घर तिरंगा' अभियानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य दिनाचा सोहळा साजरा करण्याचे आव्हान संपूर्ण देशाला केले होते.
या आव्हानाला प्रतिसाद देत सर्व शासकीय तसेच खाजगी कार्यालयांमध्ये ही मोठा उत्साह स्वातंत्र्यदिनानिमित्त दिसला, परंतु पुणे जिल्ह्यातील वाकड परिसरात असणारे शासकीय आदिवासी विद्यार्थी वसतिगृह येथे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्याची तसदी तेथील गृहपाल व संबंधीत शासकीय अधिकाऱ्यांनी घेतली नाही. स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पुणे शहराच्या परिसरातील शासकिय आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहात स्वातंत्र्यदिनी ध्वारोहण होत नाही, हे खुप दुर्दैवी आहे, असे मत अभाविपने मांडले आहे.
वसतिगृहातील काही विद्यार्थ्यांनी या घटनेबद्दल चौकशी केली असता, ध्वज लावण्याची आवश्यकता नाही, आपल्याकडे खांब नाही तसेच दोरी उपलब्ध नाही, अशी हास्यास्पद कारणे दिली. इतकेच काय तर स्वातंत्र्यदिनी वाकड येथील शासकीय आदिवासी वस्तीगृहाचे गृहपाल असणारे घोरपडे सर हे स्वातंत्र्यदिनी वसतिगृह परिसरात फिरकले सुद्धा नाहीत. "ही घटना अतिशय निंदनीय असून आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी स्वतः लक्ष घालत संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करत त्याचे निलंबन करावे, अन्यथा विद्यार्थी परिषद तीव्र आंदोलन करेल," असे मत अभाविप प्रदेश मंत्री ॲड अनिल ठोंबरे यांनी व्यक्त केले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.