पुतळ्याची आयआयटी मुंबईकडून तपासणी

महापालिकेच्या वतीने मोशीत छत्रपती संभाजी महाराजांचा ब्राॅंझ धातूचा १४० फूट पुतळा उभारण्यात येणार आहे. या पुतळ्याचे वेगवेगळे भाग मोशीत आणण्यात आले आहेत. त्यातील पुतळ्याच्या मोजडी भागाला तडे गेले की तुटला आहे, याबाबत शिल्पकार राम सुतार यांचा अहवाल मागवण्यात येणार आहे, तर पुतळ्याच्या प्रत्येक भागाची आयआयटी मुंबईच्या पथकांकडून स्वतंत्र तपासणी करून अहवाल मागवण्यात येणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 6 Sep 2024
  • 03:44 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

तडे गेलेल्या भागाबाबत राम सुतार यांचा अहवाल मागवणार, आयुक्त शेखर सिंह यांनी दिली माहिती

महापालिकेच्या वतीने मोशीत छत्रपती संभाजी महाराजांचा ब्राॅंझ धातूचा १४० फूट पुतळा उभारण्यात येणार आहे. या पुतळ्याचे वेगवेगळे भाग मोशीत आणण्यात आले आहेत. त्यातील पुतळ्याच्या मोजडी भागाला तडे गेले की तुटला आहे, याबाबत शिल्पकार राम सुतार यांचा अहवाल मागवण्यात येणार आहे, तर पुतळ्याच्या प्रत्येक भागाची आयआयटी मुंबईच्या पथकांकडून स्वतंत्र तपासणी करून अहवाल मागवण्यात येणार आहे. त्यानुसार तो भाग पुतळा बसवायचा की नाही, ते ठरवण्यात येईल, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.    

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या १४० फूट उंच ब्रॉंझ धातूच्या पुतळ्याचे काम जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार करत आहेत. त्यांच्या दिल्ली येथील फाउंड्री येथे पुतळ्याची निर्मिती करण्यात येत आहे. या पुतळ्याचे स्ट्रक्चरल डिझाईन आयआयटी मुंबई यांचे मंजूर संरचनेनुसार करण्यात येत आहे. सद्यस्थितीत पुतळ्याचे काही भाग दिल्ली येथून पिंपरी-चिंचवड येथे ट्रकने वाहतूक करून मोशी येथे आणण्यात आले आहेत. प्रत्यक्ष पुतळा उभा करण्यापूर्वी, पुतळ्यासाठी ब्रॉंझ धातूने सांधे जोडणी व इतर आवश्यक प्रक्रिया प्रत्यक्ष जागेवर केल्यानंतर प्रत्यक्षात पुतळ्याची उभारणी करण्यात येणार आहे. प्रत्येक भाग हा आयआयटी मुंबईकडून तपासून घेतला जाईल. त्यांनी योग्य असल्याचा अहवाल दिल्याशिवाय एकही भाग पुतळा उभारताना जोडला जाणार नाही. पुतळा उभारणीच्या सगळ्या कामावर आयआयटी मुंबई येथील तज्ज्ञांची देखरेख राहणार आहे.

दरम्यान, मोशीत उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मोजडीच्या भागांना तडे गेल्याचे फोटो शुक्रवारी (दि. ३०) समाज माध्यमातून व्हायरल झाले होते. त्या पार्श्वभूमीवर आयुक्त शेखर सिंह यांनी हा खुलासा केला आहे.

प्रत्येक भागाची काळजी घेण्याच्या सूचना

छत्रपती संभाजी महाराजांचा ब्रॉंझ धातूच्या पुतळ्याचे ८० भाग मोशीत आले आहेत. त्या ठिकाणी ते भाग सुरक्षित झाकून योग्य ठिकाणी ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच तो धातू ब्राँझ असल्याने त्याला तडे गेलेत की गंजला आहे, याबाबत तपासणी करण्याचे आदेशदेखील दिले आहेत. त्याबाबत शिल्पकार राम सुतार यांचा अहवाल आल्यावरच नेमके काय झाले आहे. यावर सांगण्यात येईल, असेही आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest