Pimpri-Chinchwad : रस्तेसफाईला लागले उद्घाटनाचे ग्रहण, पिंपरी-चिंचवडमधील रस्ते सफाईला मुहूर्तच मिळेना

पिंपरी चिंचवड शहरातील रस्ते यांत्रिकी पद्धतीने सफाईसाठी सात वर्षांकरिता ३२८ कोटी ९५ लाख रुपये खर्च नियोजित असलेल्या कामाला अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही. कधी रोड स्विपिंग मशिन उपलब्ध होत नसल्याने तर कधी या मशिनचे आरटीओ मधील पासिंग रखडल्याने कामाला मुहुर्त लागत नव्हता.

Pimpri-Chinchwad : रस्तेसफाईला लागले उद्घाटनाचे ग्रहण, पिंपरी-चिंचवडमधील रस्ते सफाईला मुहूर्तच मिळेना

रस्तेसफाईला लागले उद्घाटनाचे ग्रहण, पिंपरी-चिंचवडमधील रस्ते सफाईला मुहूर्तच मिळेना

आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने रखडले काम

पिंपरी चिंचवड शहरातील रस्ते यांत्रिकी पद्धतीने सफाईसाठी सात वर्षांकरिता ३२८ कोटी ९५ लाख रुपये खर्च नियोजित असलेल्या कामाला अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही. कधी रोड स्विपिंग मशिन उपलब्ध होत नसल्याने तर कधी या मशिनचे आरटीओ मधील पासिंग रखडल्याने कामाला मुहुर्त लागत नव्हता. आता या सर्व बाबींची पुर्तता केल्यानंतर उद्घाटनासाठी हे काम रखडले आहे.

सध्या धोकादायकरित्या वर्दळीच्या रस्त्यावर उतरून सफाई कामगारांकडून रस्ते स्वच्छ करून घेतले जात आहेत. यांत्रिक पद्धतीने रस्ते सफाईचे काम आद्याही सुरु झाले नसल्याने या प्रकारे काम करावे लागत आहे. त्यामुळे मातीचे ढीग करून ते हाताने गोळा केले जात आहेत. हे काम वेळेवर होत नसल्याने वाहनचालकांसह नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, जमा केलेले मातीचे ढीग आठवडा-आठवडा उचलले जात नसल्याने धुळीचा त्रास कमी होण्याऐवजी वाढत आहे.

शहरातील १८ मीटर व त्यापेक्षा अधिक रूंद असलेल्या मोठ्या रस्त्यांची यांत्रिक (रोड स्वीपर मशिन) पद्धतीने साफसफाई केली जाणार आहे. यांत्रिक पद्धतीने रस्ते साफसफाई कामाची निविदा सुरूवातीपासूनच वादात अडकली आहे. त्यावरून सातत्याने असंख्य आरोप व टीका करण्यात आल्या आहेत. तांत्रिक कारणे पुढे करीत तत्कालिन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ती पूर्ण झालेली निविदा प्रक्रियाच रद्द केली होती. मात्र, गुंडाळलेल्या या कामास प्रशासकीय राजवटीत गती देण्यात आली. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी त्याला २७ डिसेंबर २०२२ ला स्थायी समितीची मान्यता दिली. शहराच्या चार विभागांत हे काम केले जाणार असून, ७ वर्षांसाठी ३२८ कोटी ९५ लाख महापालिका खर्च करणार आहे.

मोठ्या आकाराचे ८ व मध्यम आकाराचे ८ असे परदेशी बनावटीचे एकूण १६ अत्याधुनिक रोड स्वीपर मशिन वाहने खरेदी करण्यासाठी प्रशासनाने ठेकेदारांना ९० दिवसांची मुदत दिली. मात्र, सप्टेंबर अखेरपर्यंतच्या मुदतीमध्ये ठेकेदारांना काम सुरू करता आले नाही. त्यानंतर, परदेश कंपनीच्या या वाहनांची आरटीओत नोंदणी करण्यासाठी या ठेकेदारांना महापालिकेकडून वारंवार मुदतवाढ देण्यात आली. अखेर, आरटीओकडून या वाहनांची नोंदणी गेल्या महिन्यात पूर्ण झाली आहे.

परंतु, आता या कामास नवे विघ्न निर्माण झाले आहे. शहरासाठी महत्वाचे काम असल्याने या कामाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यंमत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्याचे प्रशासनाने ठरविले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही काळजी घेण्यात येत आहे. मात्र, या तीनही नेत्यांची तारीख मिळत नसल्याने उद्घाटनाचा मुहूर्त आणखी लांबणीवर पडला आहे. दरम्यान, शहरात अनेक ठिकाणी गृहप्रकल्प बांधकामांसाठी खोदकाम सुरू आहे. खोदलेला राडारोडा घेऊन जाणार्‍या वाहनांमुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात माती पडते. त्यामुळे रस्ते धुळीने माखले आहेत. त्यात वर्कऑर्डर देऊन सहा महिने झाले तरी, रस्ते सफाईचे काम सुरू होत नसल्याने रस्त्यावरील धुळीमुळे वाहनचालकांची गैरसोय होत आहे. महापालिकेच्या कायदा विभागाला बाजूला ठेवून खासगी कायदा सल्लागार नेमून ठेकेदारांसोबत सात वर्षाचा करारनामाही करण्यात आला. त्यानंतर या कामासाठी पात्र ठरलेल्या चार ठेकेदारांना ३० जूनला वर्कऑर्डर देण्यात आली आहे.

रोड स्वीपर मशिनचे लहान व मोठी अशी एकूण १६ अत्याधुनिक वाहनांची आरटीओकडे नोंदणी करण्यात आली आहे. काम सुरू करण्याबाबत आयुक्त शेखर सिंह यांच्याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. लवकरच काम सुरू करण्याचे नियोजन आहे.

- यशवंत डांगे, सहायक आयुक्त, आरोग्य विभाग,  पिंपरी-चिंचवड महापालिका

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest