'No Horn Day'! : पिंपरी-चिंचवड शहरात आता दर सोमवारी ‘नो हाॅर्न डे’!

दररोज लाखो वाहनांच्या हॉर्नमुळे (No Horn Day) होणाऱ्या गोंगाटापासून एक दिवस तरी सुटका होण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी (Pimpri-Chinchwad Traffic Police) अनोखी शक्कल लढविली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rohit Athavale
  • Sat, 4 Nov 2023
  • 02:28 pm
No Horn Day

संग्रहित छायाचित्र

वाहतूक पोलिसांचा निर्णय, ठीकठिकाणी नागरिकांत करणार जनजागृती

दररोज लाखो वाहनांच्या हॉर्नमुळे (No Horn Day) होणाऱ्या गोंगाटापासून एक दिवस तरी सुटका होण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी (Pimpri-Chinchwad Traffic Police) अनोखी शक्कल लढविली आहे. प्रत्येक आठवड्यातील पहिल्या सोमवारी नो हॉर्न डे उपक्रम साजरा करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. या उपक्रमांतर्गत सोमवारी कोणत्याही वाहनचालकाने हॉर्न वाजवू नये, यासाठी वाहतूक पोलीस शाळा, कॉलेज, आय टी इंडस्ट्री, एमआयडीसीमध्ये जाऊन नो हॉर्न डे संदर्भात जनजागृती करणार आहेत.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सर्वांनाच कामावर जाण्याची तसेच कामावरून घरी येण्याची घाई असते. मात्र, वाहतूक कोंडीमुळे कोणालाही या गोष्टी वेळेत करता येत नाहीत. वाहतूक कोंडीत अडकल्यावर प्रत्येक वाहनचालक वाहनाला जागा मिळावी म्हणून हॉर्न वाजवितो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होते. ध्वनिप्रदूषणाचा त्रास वाहनचालकासह रस्त्यावर तसेच आसपास असणाऱ्या सर्वच नागरिकांना सहन करावा लागतो. या ध्वनिप्रदूषणामुळे अनेकांना कान तसेच मानसिक विकार झाल्याची उदाहरणे समोर आली आहेत. याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालय, सामाजिक संस्था तसेच वाहतूक संस्थांकडून वारंवार जनजागृती करण्यात आली आहे. मात्र, वाहनचालक याकडे नेहमीच दुर्लक्ष करतात. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी होणाऱ्या अनेक ठिकाणी सातत्याने ध्वनिप्रदूषण होताना दिसते. यावर उपाय म्हणून प्राथमिक स्वरूपात दर सोमवारी वाहनचालकांनी नो हॉर्न डे पाळावा, असा निर्णय शहर वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. त्यासाठी वाहतूक पोलीस प्रत्येक शाळा, महाविद्यालये, आय टी इंडस्ट्री आणि एमआयडीसीमध्ये जाऊन जनजागृती करणार आहेत. निष्कारण हॉर्न वाजवणे किती धोकादायक आहे, ध्वनिप्रदूषण वाढल्याने काय परिणाम होतात याबाबत वाहतूक पोलीस जनजागृती करणार आहेत. 

पंधरा दिवसात ६ हजार वाहनांवर कारवाई ६१ लाखांचा दंड

पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या १५ दिवसात ६ हजार १७८ वाहनांवर कारवाई करीत पोलिसांनी ६१ लाख ७१ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. अवजड वाहनांना सकाळी ८ ते ११ आणि संध्याकाळी ५ ते रात्री ९ या कालावधीत शहरातील अंतर्गत रस्त्यांवरून प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. तरीदेखील या नियमांचा भंग करून शहरात अवजड वाहने आणणाऱ्या चालकांना पकडून वरील कारवाई करण्यात आली आहे. येत्या काळात दुचाकीवर ट्रिपल सीट फिरणारे, लक्झरी बस, रॉंग साईडने वाहन चालविणारे, कर्णकर्कश सायलेन्स तसेच अन्य वाहतुकीच्या नियमांचा भंग करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहरातील सर्व वाहतूक विभागांच्या अधिकाऱ्यांना याबाबत आदेश देण्यात आले असून, प्रबोधनाबरोबरच आता कारवाईचा बडगा पोलिसांनी उगारण्यास सुरुवात केली आहे.

हॉर्न वाजविण्याचे तोटे...

रस्त्यावर वाढणारा गोंगाट

रस्त्यावर होणारे वाद

अपघातांची वाढती संख्या

नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम

शहरातील वाहनांची संख्या...

एकूण वाहने - सुमारे २४ लाख

रस्त्यावर असणारी वाहने - सुमारे १५ लाख

२०१० मध्ये वाशीमध्ये रस्ता सुरक्षा अभियानामध्ये ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा समोर आला. या अभियानात सहभागी झालेल्या विनायक जोशी नावाच्या व्यक्तीने चार वर्षे हॉर्न वाजविला नसल्याचे समोर आले. तेव्हा नो हॉर्न उपक्रम राबविण्याचा विचार समोर आला. हॉर्नच्या गोंगाटाचा गर्भवती महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, हृदयरोग असणाऱ्या सर्वच नागरिकांना त्रास होतो. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये वाढणाऱ्या वाहनांची संख्या पाहता दररोज कमीत कमी एक कोटी वेळा हॉर्न वाजविला जातो. याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. त्यामुळे पुण्यात १२ सप्टेंबर २०१८ रोजी पुण्यात पहिल्यांदा नो हॉर्न डे साजरा करण्यात आला होता. 

- संजय राऊत, निवृत्त आरटीओ अधिकारी तथा 'नो हॉर्न डे'चे प्रणेते

घरातून बाहेर पडल्यानंतर इच्छित स्थळी जाईपर्यंत वाहनचालक प्रत्येक किलोमीटरला किमान ५ वेळा हॉर्न वाजवतो. यामुळे शहरातील वायुप्रदूषणात खूप वाढ होत असून, वाहनचालकांचे मानसिक स्वास्थ्य देखील खराब होत असते. यामुळे वाहनचालकांना विनंती असून, आपण एक दिवस अजिबात हॉर्न वाजविला नाही तर हळूहळू हॉर्न वाजविण्याची सवय कमी होत जाईल असा विश्वास वाटतो.

 - बाप्पू बांगर, पोलीस उपायुक्त, `वाहतूक विभाग, पिंपरी-चिंचवड

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest