दहा दिवसांत हिंजवडी घेणार मोकळा श्वास
मेट्रोला काम झालेल्या ठिकाणचे बॅरिकेड्स काढून घेण्याचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी बुधवारी दिले. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे डेप्युटी प्रोजेक्ट डायरेक्टर अमन भट्टाचार्य आणि अन्य अधिकाऱ्यांना यावेळी हिंजवडी आयटी पार्क (Hinjawadi IT Park) येथे काम सुरू असलेल्या ठिकाणी पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या चर्चेतून पुढील दहा दिवसांत हिंजवडी मोकळा श्वास घेईल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
आयटी पार्क हिंजवडी मधील वाहतूक कोंडी हा कळीचा मुद्दा बनला आहे. त्यातच या ठिकाणी गेल्या तीन वर्षांपासून हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे (पुणेरी मेट्रो) काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी बॅरिकेड्स लावून रस्ता अडविण्यात आलेला आहे. मात्र, ज्या भागातील मेट्रोपिलर आणि गर्डरचे काम पूर्ण झाले आहे; तेथील बॅरिकेड्स तत्काळ काढून घेण्यात यावेत. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेस मेट्रोने अवजड वाहने लावून काम करू नये. नागरिकांना या कामाचा त्रास होऊ नये; असे स्पष्ट आदेश बुधवारी पोलीस आयुक्त चौबे यांनी मेट्रो अधिकाऱ्यांना दिले.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो दरम्यान पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत असलेल्या हिंजवडी फेज ३ ते बालेवाडी स्टेडियमपर्यंत सध्या मेट्रोचे काम सुरू असून, अनेक ठिकाणी या कामासाठी वाहतूक वळवण्यात आली आहे. तर बऱ्याच ठिकाणी रस्ताच बंद करण्यात आलेला आहे. या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि कामाच्या तासांमध्ये होणारी वाढ लक्षात घेता आयटीयन्स कडून अनेक तक्रारी करण्यात येत होत्या. कोरोना कालावधीत मेट्रोचे काम देखील थांबले होते. त्यामुळे आता या कामाला मुदत वाढवून देण्यात आलेली आहे. त्यानंतर मेट्रोने कामाचा वेग वाढविला असून, पीलर आणि गर्डर उभे करण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, त्यानंतरही बहुतांश भागातील बॅरिकेड्स काढण्यात आलेले नाहीत. परिणामी वाहतूक कोंडीत भर पडत आहे.
हिंजवडी वाहतूक विभाग, सहायक पोलीस आयुक्त आणि वाहतूक विभागाच्या उपायुक्तांनी वारंवार येथील कोंडी सोडण्यासाठी बरेच प्रयत्न केले आहेत. मात्र, मेट्रो कडून वॉर्डन देणे आणि गर्दीच्या वेळेत काम न करण्याबाबत ठोस निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळे अखेर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, उपायुक्त विशाल गायकवाड, सहाय्यक आयुक्त सतीश कसबे आणि मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी गर्दीच्या ठिकाणी या पूर्ण परिसराची पाहणी केली. गर्दीच्या वेळेत कोणकोणत्या भागात कोंडी होती ते पाहून, या ठिकाणी तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश आयुक्त चौबे यांनी दिले. तसेच एकूण मार्गावरील जेथे काम पूर्ण झाले आहे तेथील संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे आदेश यावेळी मेट्रो अधिकाऱ्यांना देण्यात आले.
मेट्रो अधिकाऱ्यांनी काम चालू असलेल्या ठिकाणचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी १० दिवसांची मुदत मागितली आहे. तोपर्यंत ज्या ठिकाणचे बॅरिकेड्स काढून घेणे शक्य आहे ते लगेच काढून घेतले जातील. वाहनचालकांना त्रास होणार नाही याची जबाबदारी घेऊन तत्काळ तश्या उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
-विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी-चिंचवड
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.