PCMC News
महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात बीएससी नर्सिंग महाविद्यालय आणि पॅरामेडिकल कोर्सेस सुरू करण्यासाठी राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने तत्त्वत: मंजुरी दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये रुग्णसेवेकरिता कार्यरत नर्सिंग आणि इतर विभागाच्या कामकाजामध्ये मदत होणार आहे. महापालिका हद्दीतील आणि बाहेरील विद्यार्थ्यांना अल्प दरात नर्सिंग शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. तसेच या नर्सिंग महाविद्यालयासाठी विविध संवर्गातील २४ पदांची निर्मितीही करण्यात येणार आहे. शहरातील वैद्यकीय सुविधा आणखी बळकट करण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. या अनुषंगाने यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्याचा महापालिकेचा मानस होता. याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता.
या प्रस्तावास शासनाची मंजुरी मिळाली असून रुग्णालयाच्या आवारात ११ मजली नवीन इमारतीच्या तिसऱ्या, चौथ्या व सहाव्या मजल्यावर नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. बी.एस.सी. नर्सिंगकरिता ६० विद्यार्थी भरती प्रस्तावित आहे. हा अभ्यासक्रम चार वर्षांचा असल्याने चारही वर्षाचे मिळून एकत्रित २४० विद्यार्थी सेवेमध्ये हातभर लावतील. तसेच इतर पॅरावैद्यकीय कोर्सेस (बीपीएमटी, पीजीडीएमएलटी) पूर्ण क्षमतेने सुरू झालेस ३०० ते ४०० प्रशिक्षणार्थी विविध विभागाच्या कामकाजाकरिता उपलब्ध होणार आहे.
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात बीएससी नर्सिंग कॉलेज व पॅरामेडिकल कोर्सेस सुरू झाल्यानंतर वायसीएम रुग्णालयामध्ये सुश्रुषा विभाग व इतर विभागाचे कामकाजात मदत प्राप्त होणार आहे. पदव्युत्तर संस्था, यशवंतराव चव्हाण रुग्णालयाशी संलग्नित बीएससी नर्सिंग कॉलेज व पॅरामेडिकल कोर्सेस वायसीएम रुग्णालयात सुरू करून पालिकेमार्फत दिली जाणारी रुग्णसेवा अधिक सक्षम करण्यात हातभार लागणार आहे.
- डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय
बीएससी नर्सिंग महाविद्यालय तसेच पॅरामेडिकल कोर्सेस सुरू झाल्यानंतर गरजू विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच अल्प दरात शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. भविष्यातही शहरातील वैद्यकीय सुविधा अधिक बळकट करण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना राबवण्यात येणार असून शहरवासियांना उत्तम वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे.
- डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महानगरपालिका
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.