पिंपरी मध्ये महायुतीची ताकद वाढली; माघार घेतलेल्या २१ पैकी १९ उमेदवारांचा अण्णा बनसोडे यांना पाठिंबा
पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले) या महायुतीची ताकद वाढली आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेतलेल्या २१ जणांपैकी १९ उमेदवारांनी महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांना पाठिंबा दिला आहे. उमेदवारांनी पाठिंबा दिल्यानंतर आमदार अण्णा बनसोडे यांनी सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याची ग्वाही दिली.
आकुर्डी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे, सदाशिव खाडे, अजिज शेख, संतोष बारणे, परशुराम वाडेकर, कविता आल्हाट, अंकुश कानडे, सिकंदर सूर्यवंशी, कुणाल वाव्हळकर, चंद्रकांता सोनकांबळे, काळूराम पवार, सुधीर कांबळे, जितेंद्र ननावरे, बाबासाहेब कांबळे आणि इतर पदाधिकारी, उमेदवार उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज माघार घेण्याची सोमवारी (दि. ४) अंतिम मुदत होती. महायुतीच्या घटक पक्षातील बंडखोरी करून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी तसेच शहरातील नेत्यांनी समजूत काढली. सर्वांनी महायुतीची ताकद वाढविण्यासाठी तसेच राज्याच्या हितासाठी महायुतीचा मुख्यमंत्री होणे गरजेचे असल्याचे सांगत उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यास सांगितले. महायुतीतील नेत्यांना उमेदवारांच्या मनधरणीसाठी मोठे यश मिळाले आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेतलेल्या २१ जणांपैकी तब्बल १९ जणांनी पिंपरी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच उमेदवारांनी अण्णा बनसोडे यांचे काम सक्रियपणे करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
शहराध्यक्ष योगेश बहल म्हणाले, ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता त्यांना विश्वासात घेऊन महायुतीमध्ये एकत्रितपणे काम करण्यासाठी विनंती करण्यात आली आहे. त्यामध्ये आम्हाला यश आले आहे. रामदास आठवले, अजित पवार यांनी चंद्रकांता सोनकांबळे यांच्याशी चर्चा केली. चंद्रकांता सोनकांबळे यांना भविष्यात चांगले पद मिळण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत."
आमदार अण्णा बनसोडे म्हणाले, निवडणूक लढविण्याचा लोकशाहीत सर्वांना अधिकार आहे. पण पक्ष, संघटना यामध्ये काम करत असताना आपण एक कुटुंब आहोत. त्यातून कोणाला तरी एकाला जबाबदारी मिळते. महायुतीमध्ये पिंपरी विधानसभेची जबाबदारी मला मिळाली आहे. दरम्यान महायुतीमधील ज्येष्ठ नेत्यांनी नाराज उमेदवारांची नाराजी दूर केली आहे. त्यामुळे आता सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार आहे."
"व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा असतो पक्षासाठी काम करण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या आहेत. आम्ही एकत्रितपणे आमदार अण्णा बनसोडे यांचे काम करणार असून त्यांना ५० हजारांचे मताधिक्य मिळेल, असा विश्वास उमेदवार काळुराम पवार यांनी व्यक्त केला.
अण्णा बनसोडे यांना पाठिंबा दिलेले उमेदवार
चंद्रकांता सोनकांबळे, बाबासाहेब कांबळे, जितेंद्र ननावरे, काळुराम पवार, रीता सोनावणे, सुरेश लोंढे, प्रल्हाद कांबळे, चंद्रकांत लोंढे, मनोज कांबळे, स्वप्निल कांबळे, नवनाथ शिंदे, कृष्णा कुडुक, गौतम कूडुक, दादाराव कांबळे, मयूर जाधव, सुधीर कांबळे, मुकुंद ओव्हाळ, जाफर चौधरी, हेमंत मोरे.