संग्रहित छायाचित्र
विकास शिंदे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी बोर्डाच्या परीक्षेचा राज्याचा निकाल सोमवारी (२७ मे ) ऑनलाईन जाहीर झाला. यामध्ये पिंपरी -चिंचवड (Pimpri Chinchwad) शहराचा निकाल ९७.९५ टक्के लागला. यामध्ये ९७.३५ टक्के मुलांचा तर ९८.६१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. या वर्षीही मुलींनी पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे. (SSC Result)
ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी सकाळपासूनच लगबग चालू होती. बहुतांश विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईलवर निकाल बघितला. तर काही विद्यार्थ्यांनी शाळेत एकत्र येत निकाल बघितला. शहरामध्ये दहावीच्या परीक्षेला एकूण १९ हजार ८६० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केला होता. यामध्ये १० हजार ४५० मुले आणि ९ हजार ४१० मुली होत्या. त्यापैकी एकूण १९ हजार ८२३ विद्यार्थी बसले होते. त्यामध्ये १० हजार ४३४ मुले तर ९ हजार ३८९ मुली होत्या. तर शहराचा एकूण निकाल ९७.९५ टक्के लागला असून मुलांचा निकाल ९७.३५ टक्के तर मुलींचा निकाल ९८.६१ टक्के लागला.
पिंपरी-चिंचवड शहरात एकूण १ हजार २७० पुन:परीक्षार्थी विद्यार्थ्यांपैकी ९२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर पुन:परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा निकाल ७२.५१ टक्के इतका लागला आहे. दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर होणार असल्याने सकाळपासून विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. अनेक विद्यार्थी निकाल बघितल्यानंतर आपल्या मित्र-मैत्रिणींना फोनवर निकालाबाबत सांगत होते, तर काहीजण एकमेकांना भेटून आनंदोत्सव साजरा करत होते.
महापालिका शाळांचा निकाल ९५.५२ टक्के
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १८ माध्यमिक शाळांचा निकाल ९५.५२ टक्के लागला आहे. दहावीच्या परीक्षेसाठी महापालिकेच्या १८ शाळांमधून १९४१ विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेसाठी अर्ज केले होते. त्यापैकी १७७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर ९ विद्यार्थी गैरहजर होते. १६२ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असून १८ शाळांचा निकाल ९५.५२ टक्के लागला आहे. तसेच उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा निकाल ९८.२१ टक्के लागला आहे.
महापालिकेचे १८ विद्यार्थी होणार लखपती
महापालिकेच्या शाळेत शिकणारे बहुतांश विद्यार्थी गरीब कुटुंबातील आहेत. त्यांच्या वर्षभर नियमित परीक्षासह सर्व विषयाच्या केंद्रीय परीक्षा, सराव परीक्षा घेण्यात येतात. यातून विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेस सामोरे जाणे सोपे जाते. त्यामुळे महापालिकेच्या शाळेमध्ये ९० टक्के व त्यापुढे गुण मिळवणारे एकूण १८ विद्यार्थी आहेत. त्या १८ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १ लाख रुपये, ८५ टक्के ते ८९.९९ टक्के पर्यंत गुण मिळवणारे ६७ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५० हजार, ८० टक्के ते ८४.९९ टक्के गुण मिळवणाऱ्या ११२ विद्यार्थ्यांना २५ हजार आणि दिव्यांग असलेल्या १८ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५० हजार या प्रमाणे महापालिका गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस रक्कम देणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.