'ओव्हर टाईम'चा पगार हवा, तर सहीसाठी दहा हजार दे'; प्रशासन अधिकाऱ्याची लिपिकाकडे लाचेची मागणी

लिपिक, मुख्य लिपिकांचे सहा महिन्याचे प्रलंबित 'ओव्हर टाईम' पगाराचे बिल काढायचे असेल, तर मला फाईलवर सही करायला दहा हजार रुपये द्यावे लागतील, त्याशिवाय फाईलवर सही करणार नाही, अशी अजब मागणी महापालिकेतील कर आकारणी व कर संकलन विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्याने केली आहे.

PCMC News

संग्रहित छायाचित्र

सहायक आयुक्तांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून फोडले बिंग

लिपिक, मुख्य लिपिकांचे सहा महिन्याचे प्रलंबित 'ओव्हर टाईम' पगाराचे बिल काढायचे असेल, तर मला फाईलवर सही करायला दहा हजार रुपये द्यावे लागतील, त्याशिवाय फाईलवर सही करणार नाही, अशी अजब मागणी महापालिकेतील कर आकारणी व कर संकलन विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्याने  केली आहे. याबाबत पालिकेच्या सहायक आयुक्तांनी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करत संबंधित प्रशासन अधिकाऱ्याचे बिंग फोडले आहे. यावर महापालिका आयुक्त शेखर सिंह हे संबंधित अधिकाऱ्यावर काय कारवाई करतात, याकडे सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.    

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) कर आकारणी व कर संकलन विभागातील लिपिक आणि मुख्य लिपिक हे एक हजार कोटींचे उदिष्ट पुर्ण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे. सकाळी लवकर कार्यालयात येऊन रात्री उशिरापर्यंत काम करत आहेत. पालिकेच्या लिपिक आणि मुख्य लिपिकांना अतिकालीन भत्ता देण्याची तरतूद आहे. प्रत्येक महिन्यात चोवीस तास ओव्हर टाईमचे बिल देण्यात येते. मात्र, कर संकलनच्या कर्मचाऱ्यांना जानेवारी ते मार्च २०२४ या तीन महिन्यासाठी ४८ तासांचे ओव्हर टाईम देण्याचा निर्णय करसंकलन विभागाने घेतला होता. थेरगांव कर संकलन विभागातील लिपिक कर्मचाऱ्यांना एप्रिल २०२३ पासून अतिकालीन भत्ता प्रलंबित आहे. अतिकालीन भत्ता काढण्यासाठी त्या कर्मचारी हे करसंकलन गटाचे काम सांभाळून ते आस्थापनेचे काम करावे लागत होते. त्यामुळे अतिकालीन भत्ता काढता आला नाही.

त्यामुळे थेरगांव करसंकलन कार्यालयातील लिपिक कर्मचाऱ्यांनी एप्रिल २०२३ ते आॅगस्ट २०२३ पर्यंत अतिकालीन भत्ता गट लिपिकांनी काढला. त्यानंतर सदरची फाईल ही सही करण्यासाठी करसंकलन विभागाचे प्रशासन अधिकारी राजाराम सरगर यांच्याकडे पाठवण्यात आली. ओव्हर टाईम फाईलवर सही करण्यास प्रशासन अधिकारी सरगर यांनी नकार दिला. त्यावर संबंधित लिपिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फाईलवर सही नसल्याचे कारण विचारले. त्यावर त्यांनी फाईलवर सहीसाठी दहा हजार रुपये द्यावे लागेल, तुम्ही दहा हजार रुपये देणार असाल तरच  फाईलवर सही करणार अथवा सही करणार नाही, असा संदेश सहायक आयुक्त श्रीकांत कोळप यांनी समाज माध्यमातून व्हायरल केला आहे.

दरम्यान, कर संकलनच्या लिपिक, मुख्य लिपिक हे अहोरात्र काम करुन मालमत्ता वसुलीचे उद्दिष्ट पुर्ण करण्यास प्रयत्न करत आहेत. मात्र, त्याच कर्मचाऱ्यांचा ओव्हरटाईम भत्ता देण्यास वरिष्ठ अधिकारी लाचेची मागणी करत आहेत. याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील हे संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ओव्हर टाईमचे प्रलंबित बिल काढण्यासाठी वरिष्ठ अधिकारी हे कर्मचा-यांना वेठीस धरुन सहीसाठी पैसे मागत असेल, तर हे शंभर टक्के चुकीचे आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी महासंघाकडे त्या वरिष्ठांची तक्रार करावी, याबाबत प्रशासन अधिकारी राजाराम सरगर यांनी पैशाची मागणी केली असेल, तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. याकरिता महासंघाकडून आयुक्तांना भेटून कडक कारवाई करावी, म्हणून लेखी पत्र देण्यात येईल.
- बबन झिंजुर्डे, अध्यक्ष, कर्मचारी महासंघ, पिंपरी-चिंचवड महापालिका.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest