होर्डिंग कोसळले
पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे. हिंजवडीतील आयटी पार्क येथील लक्ष्मी चौकात एक महाकाय होर्डिंग कोसळले आहे. ही घटना आज (मंगळवारी) दुपारी चारच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाले नाही. मात्र, होर्डिंग कोसळल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये दुपारी चारच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. या पावसात जोरात वारा वाहत होता. या वाऱ्यामुळे लक्ष्मी चौकात एक महाकाय होर्डिंग कोसळले आहे. मात्र हा होर्डिंग अलगत दुकानांच्या शेड व रस्त्यावर पडले. या दुर्घटनेत एका गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणालाही इजा किंवा जीवितहानी झाली नाही.
होर्डिंग कोसळल्यानंतर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, काही दिवसांपुर्वीच किवळे येथे होर्डिंग कोसळले होते. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, आता पुन्हा एकदा हिंजवडीत होर्डिंग कोसळले आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अद्याप पावसाळा सुरू झालेला नाही. पावसाळ्या आधीच अशा घटना घडत आहेत. तर पावसाळा सुरू झाल्यावर अजून किती घटना घडणार ? असा प्रश्न नागरिक करत आहेत
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.