महापालिका, कॅन्टोन्मेंट बोर्डच्या वेशीवर कचऱ्याचे ढीग

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड या वेशीवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे.

garbageatthegateofMunicipal,CantonmentBoard

महापालिका, कॅन्टोन्मेंट बोर्डच्या वेशीवर कचऱ्याचे ढीग

गेल्या वर्षभरापासून निगडी, रुपीनगर, सहयोगीनगर या परिसरातील लाखो रहिवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. अलीकडे तो कचरा जाळत असल्याने त्याचे धुराचे लोट पसरत आहेत. याबाबत महापालिका पर्यावरण विभाग आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड एकमेकांकडे बोट दाखवत आहेत.

गेल्या वर्षभरापासून निगडी ते देहूरोड या मार्गालगत कचरा फेकला जातो. यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग झाले आहेत. रात्रीच्या वेळी हा कचरा जाळला जातो. परिणामी, मोठ्या धुराचे लोट निगडी येथील सहयोगनगर, रुपीनगर, तळवडे या लोकवस्तीमध्ये पसरतात.  नागरिकांना खिडक्या, दारे बंद करून घरामध्ये स्वतःला कोंडून घ्यावे लागते. उन्हाळ्यामध्ये हे प्रमाण सर्वाधिक असते. महापालिका तसेच कॅन्टोन्मेंट बोर्डातील अनेक व्यावसायिक, हॉटेल चालक या उघड्या जागेवर कचरा टाकतात. हे प्रमाण गेल्या काही दिवसात अधिक वाढले आहे. त्याचा सर्वाधिक त्रास महापालिकेतील रहिवाशांना बसत असूनही, पर्यावरण विभाग, कचरा व्यवस्थापन विभाग आणि खुद्द आयुक्त हेही तोडगा काढू शकत नसल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत 'निसर्गराजा मित्र जीवा' संस्थेचे अध्यक्ष व स्थानिक रहिवासी सागर वाघ यांनी सांगितले की,  गेल्या अनेक वर्षांपासून हा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. आम्ही शुद्ध हवा घेण्यासाठी दरवाजे खिडक्या उघडल्यानंतर हा दुर्गंधीयुक्त धूर घरात शिरतो. बारीक कचरा हवेत उडून घरात येतो. कचरा जाळला जात असून, त्याचा अधिक त्रास होतो. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ लागला आहे. यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

अग्निशमन दल येते, पण पोहोचत नाही

स्थानिकांनी याबाबत तक्रार केल्यानंतर महापालिका अग्निशमन दलाचे वाहन पाठवतात. मात्र जळत असलेल्या कचऱ्यापर्यंत अग्निशमन दल पोहोचू शकत नाही. ओबडधोबड रस्ता व खड्ड्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यास अडचण येते, तर अग्निशमन दलाची पाठ फिरताच पुन्हा कचरा जाळला जातो.

हॉटेल व्यावसायिकांना नाहक त्रास

पिंपरी-चिंचवड शहरातील हॉटेल व्यवसाय करणाऱ्या हॉटेलचालकांना हॉटेल वेस्टसाठी पैसे भरावे लागतात. हॉटेलच्या ग्रेडनुसार त्यांच्याकडून पैसे आकारले जातात. त्यात 'अ' ग्रेड, 'बी'  ग्रेड, 'सी' ग्रेड असे वेगळे चार्ज आकारण्यात येतात. मात्र सुविधा देत नसल्याने काही हॉटेलचालक नाराज आहेत. पैसे भरूनही त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. याबाबत हॉटेल असोसिएशनने महापालिका आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली होती. मात्र छोटे व्यावसायिक हे उघड्यावर कचरा टाकतात. त्यांना महापालिकेचे स्थानिक आरोग्य निरीक्षक व कर्मचारी कारवाई करत नाही. तेच, मोठ्या हॉटेलचालकावर कारवाई करतात. हा दुजाभाव असल्याचे एका हॉटेल चालकाने सांगितले. शहरातील हॉटेल्समधील कचरा गोळा करण्यासाठी खासगी कंपनी नेमण्यात आली आहे. मात्र, या कंपनीबद्दल अनेक तक्रारी आलेल्या आहेत. अनेक वर्षांपासून हॉटेल्समधील कचऱ्यासाठी स्वतंत्र प्लॅन्ट करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे, प्रत्यक्षात तो कार्यान्वित झाला नसल्याने हॉटेलचालकांना भुर्दंड भरावा लागत आहे.

नेमलेले ठेकेदाराचे कर्मचारी गायब

पिंपरी-चिंचवड शहरातील ओला व सुका कचरा विलगीकरण करण्यासाठी आयुक्तांनी थेट काही ठेकेदार नेमले आहेत. मात्र, ते कधीही फील्डवर दिसून येत नाहीत. कचरा गाडी मागे फिरून जगृती करणे आवश्यक असताना ते कुठेतरी कोपऱ्यात बसलेले दिसून येतात. मध्यंतरी रस्त्यावरील कचरा फेकत असलेल्या स्पॉटवरती या कर्मचाऱ्यांना नेमण्यात आले होते. मात्र, दोनच दिवसानंतर ते तेथून गायब झाले.

फेब्रुवारी ते मे 

त्रास ठरलेलाच वर्ष सुरू झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यापासून हा त्रास सुरू होतो. तो मे अखेरपर्यंत सुरू असतो. पर्यावरण विभाग त्याला आम्ही काही करू शकत नाही, असे मोघम उत्तर देतात. परिणामी, नागरिकांचा हा त्रास वाढत असून, महापालिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड या दोन्ही विभागाने त्यावर तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे.

तो कचरा महापालिकेत संबंधित नाही,  कॅन्टोन्मेंट बोर्डाचा आहे. त्याला काय करू शकतो. नागरिकांना त्रास होत असल्यास कॅन्टोन्मेंट बोर्डाला पत्र देण्यात येईल.

- संजय कुलकर्णी, 

सह शहर अभियंता पर्यावरण विभाग

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest