अर्ध्या सोसायटीला दूषित, गढूळ पाण्यामुळे जुलाब

ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासत असताना, गढूळ, दूषित पाणी पुरवठ्याने सोसायटी सदस्यांना डॉक्टरांची पायरी चढावी लागत आहे. थेरगाव-वाकड रस्त्यावरील शोनिस्ट टॉवरमधील अर्ध्याहून अधिक सदनिकाधारकांना जुलाब व उलटीच्या त्रासाला सामोरे जावे लागले.

अर्ध्या सोसायटीला दूषित, गढूळ पाण्यामुळे जुलाब

थेरगाव-वाकड रस्त्यावरील शोनिस्ट टॉवरमधील २०० हून अधिक रहिवाशांना उलट्या, जुलाबाचा त्रास, पालिकेच्या वैद्यकीय पथकाने केली तपासणी

पंकज खोले
ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासत असताना, गढूळ, दूषित पाणी पुरवठ्याने सोसायटी सदस्यांना डॉक्टरांची पायरी चढावी लागत आहे. थेरगाव-वाकड रस्त्यावरील शोनिस्ट टॉवरमधील (Shonest Society Wakad) अर्ध्याहून अधिक सदनिकाधारकांना जुलाब व उलटीच्या त्रासाला सामोरे जावे लागले. यामुळे संतापलेल्या त्रस्त रहिवाशांनी महापालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अखेर महापालिकेच्या वैद्यकीय पथकाने सोसायटीत येऊन सर्वांची तपासणी केली. दूषित पाण्यामुळे ही समस्या उद्भवली आहे. 

थेरगाव-वाकड रस्त्यावरील शोनिस्ट टॉवर या सोसायटीत गेल्या शनिवारपासून ( दि. २३) गढूळ , मातीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. या दूषित पाण्यामुळे सोसायटीतील सुरक्षारक्षकापासून ते सदस्यांपर्यंत सर्वांना त्रास होऊ लागला. विशेष म्हणजे सोसायटीतील देखभाल दुरुस्तीसाठी नेमण्यात येणाऱ्या व्यवस्थापकलाही जुलाब-उलट्यांचा त्रास झाला. परिणामी अनेकांना डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागली. सर्व सदस्यांनी एकत्र येऊन याबाबत प्राधान्याने महापालिकेत कळविल्यानंतर सोसायटीतील सर्व सदस्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. दूषित पाण्यामुळे हा प्रकार झाल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली. काही नागरिकांना शनिवारनंतर २४ तासांत तर काहींना दोन ते चार दिवसांनी त्रास जाणवू लागला. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना याची काळजी वाटू लागली. 

दरम्यान, थेरगाव-वाकड परिसरात वारंवार दूषित आणि अनियमित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यातच सोसायटीमध्ये हा प्रकार होत असल्याने रहिवाशांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या शनिवारपासून गढूळ पाणीपुरवठा होत आहे. दोन दिवसांपूर्वीदेखील पिवळसर पाणी आले होते. त्यामुळे वारंवार गढूळ पाणी पोटात गेल्याने हा त्रास होत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. 

२०० हून अधिक रहिवासी त्रस्त

सोसायटीमध्ये साडेतीनशे नागरिक राहतात. त्यातील दोनशेहून अधिकजणांना जुलाब-उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यामुळे वैद्यकीय पथकाला पाचरण करण्यात आले. डॉक्टरांनी तत्काळ सर्वांवर उपचार केले आहेत. सदनिकाधारकांना घरात फिल्टर असो वा नसो, प्रत्येकाने पाणी उकळून पिण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

पाहणीसाठी पथक पाठवण्यात येणार असून, संबंधित सोसायटीत तत्काळ कारवाई करण्यात येईल. - अजय सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग

गढूळ पाण्यामुळे नागरिकांना पोटाच्या तक्रारी जाणवू लागल्या आहेत. अर्धी सोसायटी गढूळ पाण्याने बाधित झाली आहे. सर्वांची डॉक्टरांनी तपासणी केली आहे. याबाबत लवकरच पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार करणार आहोत. - तेजस्विनी ढोमसेसवाई सदस्य, सोनिस्ट टॉवर, थेरगाव-वाकड रोड

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest