मराठा आंदोलनाला मोठा प्रतिसाद; उपोषण, एस टी, उपनगरे बंद आणि श्राद्ध
पिंपरी-चिंचवड शहरात (Pimpri-Chinchwad) मराठा आंदोलनाला मोठा (Maratha reservation) प्रतिसाद मिळाला आहे. मराठा आरक्षणासाठी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकासह ठिकठिकाणी मराठा कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत. तसेच चऱ्होली, भोसरी, रावेत य ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. त्याचबरोबर वल्लभनगर आगारातून ही अनेक एसटी बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे शासनाचा निषेध म्हणून दशक्रिया विधी करण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन चिघळले आहे. गावोगावी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. एस टी महामंडळाच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र बंदची हाक दिल्याचे मेसेज फिरत असल्याने मंगळवारी चऱ्होली, रावेत, भोसरी या ठिकाणची सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. तसेच सकाळ मराठा समाजाकडून मोरया गोसावी मंदिर येथे शासनाचा दशक्रिया विधी करत निषेधही करण्यात आला आहे.
सोमवारी रात्री भोसरी आळंदी रस्त्यावर टायर जाळण्यात आले. त्याच बरोबर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे काही माजी नगरसेवक देखील या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरले. पिंपळे सौदागर, रहाटणी, वाकड या भागातील माजी नगरसेवकांनी आंदोलनात सहभाग घेतला.
दरम्यान, सकाळी सात वाजल्यापासून शहरात सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अतिरिक्त आयुक्त वसंत परदेशी आणि शहरातील सहा पोलीस उपायुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त, निरीक्षक आणि फौजफाटा रस्त्यावर प्रत्यक्ष उतरून परिसराचा अंदाज घेत आहेत. पिंपरी-चिंचवड मध्ये आंदोलनाला सर्व ठिकाणाहून चांगला प्रतिसाद मिळत असून, शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात येत आहे.
शहरातील नेते गायब
खासदार श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार अण्णा बनसोडे, महेश लांडगे,अश्विनी जगताप, उमा खापरे यांनी मराठा आंदोलनाबाबत आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. शहरातील विविध समाजाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी मराठा आंदोलनाला पाठिंबा दर्शविला असताना सत्ताधारी पक्षाचे खासदार आणि आमदार गायब असल्याचे बोलले जात आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.