गवताला आग, सात गाड्या जळून खाक; पिंपळे गुरव येथील दुर्घटना
पिंपळे गुरव येथील पवनानगर येथे शुक्रवारी (२६ एप्रिल) सायंकाळी चारच्या सुमारास मोकळ्या जागेत गवताला अचानक आग लागली. या आगीत रस्त्यालगत उभ्या केलेल्या सात मोटारींना त्याची मोठी झळ बसली. त्यात सात गाड्या जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा फवारा मारून आग आटोक्यात आणली.
पवनानगर येथील गणराज वडापाव समोरील रस्त्याच्या दुतर्फा बाजूस अचानक वणव्यामुळे वाळलेल्या गवताला आग लागली. सदर आग पार्क केलेल्या चार चाकी वाहनांजवळ येऊन वाहनांच्या पुढील बाजूने पेट घेतला. यावेळी मोठ्या प्रमाणात आगीच्या ज्वाला, धूर हवेत पसरत होता. या वेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या वेळी स्थानिक लोकप्रतिनिधींना आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी वल्लभनगर, रहाटणी येथील अग्निशमन विभागाला ४ वाजून २० मिनिटांनी संपर्क करून घटनेविषयी माहिती दिली.
साडेचार वाजता वल्लभनगर, रहाटणी येथील अग्निशमन विभागाचे वाहन एका पाठोपाठ घटनास्थळी दाखल झाले. या वेळी क्षणाचाही विलंब न करता वल्लभनगर अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. मात्र, तोपर्यंत येथे पार्क केलेल्या वाहनांच्या पुढील बाजूला आग लागून वाहनांचे मोठे नुकसान झाले होते.
तीन वाहनांचे पुढील टायर फुटून अक्षरशः जळून खाक झाले होते. या वेळी अग्निशमन दलाचे लिडिंग फायरमन किरण निकाळजे, फायरमन कैलास वाधिरे, भूषण येवले, वाहनचालक संतोष कदम, प्रमोद जाधव, जवान सिद्धेश दरवेश, प्रतीक खांडगे, ओंकार शिंदे, शुभम क्षीरसागर, समीर पोटे, ऋषिकेश जगताप, ओंकार रसाळ, संकेत घोगरे यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अथक परिश्रम घेतले. आगीची माहिती मिळताच सांगवी पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सुनील तांबे, पोलीस कर्मचारी, पोलीस बीट मार्शल घटनास्थळी उपस्थित झाले होते.
आगीमध्ये जळालेली वाहने
एमएच-१२ एसयू ८०८९
एमएच- १४ जेए ४१३३
एमएच-१४ ईपी ९३८२
एमएच- १२ जीआर ६५९६
एमएच-१४ एफसी ०८७९
एमएच-१४ एचयू ०८३८
एमएच-१२ एनबी ४२६८
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.