गोल्डमॅनच्या ऑडी कारला वाहतूक विभागाने ठोठावला दंड
अलीकडे कारला गोल्ड प्लेटिंग करणे असो वा अन्य प्रकारचे रॅपिंग करणाऱ्यांमुळे ‘शौक बडी चीज हैं’चा प्रत्यय पिंपरी-चिंचवडकरांना अनुभवायला मिळत आहे. या विनापरवाना ‘कार अल्टरेशन’वर सातत्याने दंड ठोठावण्यात येऊनही ‘होऊ दे दंडावर खर्च’ असे म्हणत ‘कार अल्टरेशन’चे प्रमाण उद्योगनगरीत वाढले आहे.
सांगवी वाहतूक विभागाने संजय गुजर उर्फ गोल्डमॅन बंटी गुजर यांच्या गोल्ड प्लेटेड ऑडी या आलिशान गाडीच्या काळ्या काचांवर कारवाई केली. त्यानंतर पुन्हा एकदा शहरातील रॅपिंग केलेल्या कार, गोल्ड प्लेटिंग तसेच मल्टीकलर (फिरता रंग), प्लॅटिनम कलर प्लेटिंग करण्यात आलेल्या गाड्यांचा मुद्दा आणि या शौकिनांच्या अलिशान गाड्यांना लाखो रुपयांच्या बदल्यात मॉडिफिकेशन करून देणारा व्यवसाय चर्चेत आला आहे. विना परवाना वाहनांमध्ये बदल केलेल्यांवर पिंपरी-चिंचवडमध्ये सातत्याने कारवाई केली जात आहे. मात्र, हे प्रकार थांबायचे नाव घेत नाहीत.
पिंपरी-चिंचवड म्हणजे प्रशस्त रस्ते अन् बेशिस्त वाहतूक हा नित्याचा प्रकार आहे. महापालिका होऊन ३७ वर्षे तर पोलीस आयुक्तालय होऊन ६ वर्षे उलटली तरी शहराचे गावपण अद्याप गेलेले नाही. त्यामुळे नियम आम्हाला लागू नाहीत, असा काहीसा तोरा स्थानिकांचा येथे कायम पाहायला मिळतो. त्यामुळेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि अतिरिक्त आयुक्त वसंत परदेशी यांनी नुकतीच वाहतूक विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. तेव्हा शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचे एक सादरीकरण वाहतूक विभागाचे उपायुक्त विशाल गायकवाड यांनी केले होते.
परंतु, वाहतूक सुधरण्याबरोबरीनेच येथील नागरिकांना शिस्त लावणेदेखील तितकेच आवश्यक असून, नियम भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दोन्ही सहाय्यक आयुक्त, सर्व वरिष्ठ निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक यांना बैठकीत देण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून कारवाई सुरू असताना गोल्ड प्लेटेड गाडीवर पोलिसांनी कारवाई केली. एका दिवसात एक दोन नव्हे तर ४०६ वाहनांवर कारवाई करीत चालकांना ४.३७ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवडमधील संजय गुजर आणि त्यांचा एक मित्र या दोघांकडील सहा ते सात अलिशान कारला गोल्ड प्लेटिंग करण्यात आले आहे. मागील १५ ते १८ वर्षांमध्ये या कारचा वापर बॉलिवूडच्या अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींनी आपल्या चित्रपटात केला आहे. तसेच अनेक सिने अभिनेते हे या दोघांचे चांगले मित्र असून, इन्स्टाग्राम, फेसबुक या सोशल मीडियावर या दोघांचे गोल्ड प्लेटेड कारसह अनेक फोटो-व्हीडीओ अपलोड करण्यात आलेले आहेत. गोल्डमॅन म्हणून हे दोघे सोशल मीडियावर चांगलेच प्रसिद्ध आहेत. या दोघांपैकी एकाच्या वाहनावर काश्मीरमध्येदेखील यापूर्वी गाडी गोल्ड प्लेटेड केली म्हणून दंड ठोठावण्यात आला होता.
कार अल्टरेशनचा खर्च करू तेवढा थोडाच
आपल्या कारवर ओरखडे पडले म्हणून ‘पीपीएफ’ (प्लास्टिकमधील एक प्रकार) नावाचे कोटिंग करण्याची पद्धत सध्या सर्वत्र अवलंबली जाते. हे कोटिंग पारदर्शक असल्याने प्रादेशिक परिवहन विभागाकडून याला मनाई करण्यात आलेली नाही. या कोटिंगमुळे गाडीच्या रंगांमध्ये कोणताही बदल होत नसल्याने त्यासाठी स्वतंत्र परवानगीची गरजही लागत नाही. याचा खर्च सुमारे ३५ हजार ते वाहनाच्या आकारानुसार ३ लाखापर्यंत येतो.
याव्यतिरिक्त गोल्ड प्लेटिंग करण्यासाठी येणारा खर्च हा किमान ३ ते ४ लाख रुपयांपासून पुढे आहे. गाडी गोल्ड प्लेटिंग करणाऱ्यांचे प्रमाण तुलनेने खूपच कमी आहे. मात्र अंगावर चार-सहा किलो सोने घालणाऱ्या व्यक्तींकडून आपल्या गाडीचा रंगदेखील गोल्ड प्लेटेड करण्याचे फॅड सध्या वाढत आहे.
गोल्ड प्लेटेडपलीकडे जाऊन प्लॅटिनियम कलर प्लेटेड, मल्टी कलर (फिरता रंग) अथवा आपल्याला आवडेल त्या पद्धतीचा मॅट फिनिश-मेटालिक पद्धतीचे एक अत्यंत पातळ कोटिंग गाडीवर करण्यात येते. यासाठीचा खर्च सुमारे २० हजारापासून करू तेवढा कमी आहे. एक प्रकारचे स्टिकर चिकटविल्याप्रमाणे हे कोटिंग गाडीवर लावले जाते. हवे तेव्हा ते काढून टाकता येते. मात्र ते काढून टाकण्यासाठीदेखील किमान १५ हजार रुपये खर्च येतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जिथे गाडीचा रंग बदलला जात आहे त्या ठिकाणी प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) पूर्वपरवानगी घ्यावी लागते मात्र तसे क्वचितच होताना आढळून येते.
नियम काय सांगतो...
कंपनीने तयार करून दिलेल्या गाडीमध्ये कोणत्याही स्वरूपाचा बदल करायचा झाल्यास त्यासाठी आरटीओची लेखी संमती आवश्यक असते. तसे न केल्यास गाडीच्या किमतीएवढा दंड तसेच गाडीच जप्त करण्याचा अधिकार आरटीओ अधिकाऱ्यांना आहे. त्याचबरोबर वाहतूक पोलीसदेखील आरसी तपासून रंगात बदल असल्यास जागेवर दंड ठोठावू शकतात.
गाडीचा रंग, चाकांचा आकार, गाडीची उंची, दारे उघडण्याची दिशा अशा स्वरूपाचे बदल किंवा अंतर्गत आसन क्षमता बदलण्यापूर्वी प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून रीतसर परवानगी घ्यावी लागते. अधिकाऱ्यांनी परवानगी दिली की ते बदल करून, गाडीचे तपासणी करून घ्यावी लागते. त्यानंतर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटमध्ये (आरसी) बदल करण्यात आल्याची नोंद आरटीओने करून दिल्यावरच ते वाहन रस्त्यावर धावण्यासाठी अधिकृत असते. मात्र, वाहनांची संख्या आणि अधिकारी-कर्मचारी संख्या यातील तफावत पाहता अशी वाहते जप्त करणे आरटीओला सध्या जिकरीचे झालेले आहे.
- सचिन साकोरे, कार्याध्यक्ष, प्री-ओन्ड कार डीलर्स असोसिएशन
काळया काचांवर (ब्लॅक फिल्मिंग) आमच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कारवाई केली आहे. संबंधित वाहन चालकाकडून ३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचबरोबर कलर अल्टरेशन संदर्भात झालेल्या नियंभगाबाबत आरटीओला कळविण्यात येणार असून, पुढील कारवाई त्यांच्याकडून केली जाईल.
- वसंत परदेशी, अतिरिक्त पोलीस, आयुक्त पिंपरी-चिंचवड
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.