कासारवाडीतील 'त्या' डेपोतून कचरा पसरतोय
जुन्या पुणे मुंबई मार्गालगत असलेल्या कासारवाडीतील कचरा डेपोचा परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास होऊ लागला आहे. या डेपोच्या लगत असलेल्या आयडीटीआरमध्ये आलेला नागरिकांना तेथे उभे राहावत नाही. येणाऱ्या पावसाळ्यात पाण्यामुळे हा कचरा कुजल्यास अधिक दुर्गंधी पसरणार आहे. त्यातच या डेपोची संरक्षण भिंत अनेक ठिकाणी ढासळली असून त्यातून कचरा बाहेर येत आहे.
कासारवाडी येथील आयडीटीआर (वाहनचालन प्रशिक्षण व संशोधन केंद्र) शेजारी जवळपास वीस एकर परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा डम्प केला जातो. खडकी कॅन्टोन्मेंट येथील घरगुती कचरा या ठिकाणी नेला जात होता. यामुळे या ठिकाणी कचऱ्याचे मोठे ढीग लागले आहेत. हा कचरा चहूबाजूने पसरला आहे. वाऱ्यामुळे कचरा परिसरात उडून येतो. दरम्यान, या ठिकाणी आता कचरा टाकणे बंद केले असून, येथून कचरा दुसरीकडे नेत असल्याचे या ठिकाणी उपस्थित असलेल्या सुपरवायझरने सांगितले. तसेच, त्याची नेमकी माहिती खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड करून मिळेल, असे सांगून अधिक माहीत देण्यास नकार दिला.
आयडीटीआर आणि कचरा डेपो यामध्ये संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे. मात्र, ती अनेक ठिकाणी ढासळली असून, मोठे भगदाड पडले आहे . त्यातून भटकी जनावरे तसेच , कचरा आत येतो. त्यामुळे या ठिकाणी येणारे नागरिक आणि कर्मचारी त्रासले आहेत. सध्या आयडीटीआरमध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड या दोन्ही ठिकाणी आरटीओच्या नवीन वाहन परवान्याची चाचणी होते. त्यामुळे सायंकाळपर्यंत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र, दुर्गंधी आणि कचऱ्याचे ओंगळवाणे रूप पाहून येणाऱ्या अर्जदारांना नाक दाबून थांबावे लागते. त्याचप्रमाणे या केंद्राच्या परिसरात या कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात डास आणि माश्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे तातडीने येथील सुरक्षा भिंतीची डागडुजी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. याबाबत खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड विभागाशी संपर्क साधला असता, होऊ शकला नाही. तर, बोर्डाचे अभियंता शुभम कदम यांनी या ठिकाणी असलेल्या सुरक्षा भिंतीची दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात येणार आहे, असे सांगितले.
महापालिका अधिकारी, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
जुन्या पुणे-मुंबई मार्गावर असलेल्या या कचरा डेपोचा स्थानिक नागरिकांना देखील त्रास होत असतो. सध्या या ठिकाणी खडकी व्यतिरिक्त कचरा टाकत नसल्याचे सांगण्यात असले तरी, परिसरातील काही महाभाग या ठिकाणी कचरा टाकत असल्या निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे या भागात माजी महापौर, तसेच महापालिकेचे अधिकारी देखील राहतात. मात्र त्यांना इतके वर्षे होऊनदेखील ही समस्या सुटली नसल्याने या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येते .
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.