पिंपरी-चिंचवडमध्ये शून्य कचरा प्रकल्पाच्या शेजारीच कर्मचारी पत्ते खेळण्यात मश्गूल
(विकास शिंदे)
पिंपरी-चिंचवड: महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयाच्या पाठीमागे राज्यातील पहिला शून्य कचरा प्रकल्प उपक्रम राबविला आहे, पण त्या प्रकल्पाच्या शेजारीच महापालिकेचे काही कर्मचारी हे पत्त्याची पाने खेळण्यात मश्गूल असल्याचे दिसून आले. त्यामुळे महापालिकेने शून्य कचरा प्रकल्पाऐवजी जुगार अड्डा सुरू केलाय का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. (Pimpri Chinchwad News)
महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयाच्या पाठीमागे शून्य कचरा प्रकल्प कार्यालयाशेजारी प्रशस्त कार्यालय, फॅन, खुर्च्या, टेबल आणि सोबतीला काही सवंगडी घेत पालिकेचे कर्मचारी जुगार खेळत असल्याचे मंगळवारी (दि. १६) आढळून आले. हे सर्व कर्मचारी दररोज टाईमपास म्हणून पत्ते खेळत असतात.
जुगार खेळणारे बहुतांश कर्मचारी हे चतुर्थ श्रेणीतील आहेत. क क्षेत्रीय कार्यालयातील ड्रायव्हर, अतिक्रमणचे कर्मचारी, शिपाई, कधी-कधी काही वर्ग तीनचेदेखील कर्मचारी खेळण्यास येतात. त्यामुळे पत्ते खेळणे हा केवळ टाईमपास असल्याचे कर्मचारी बोलत होते. दरम्यान, महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांचे अधिकारी आणि कर्मचा-यांवर कसलेही नियंत्रण नाही. महापालिका आयुक्त हेच कार्यालयात उपस्थितीत नसतात.
त्यामुळे सर्व विभागाचे विभाग प्रमुख, उपायुक्त, सहायक आयुक्त असो किंवा वर्ग तीन आणि चारचे कर्मचारी कोणी कुठेही दिवसभर फिरत असतात. त्यामुळे टाईमपासच्या नावाखाली अनेक उद्योग महापालिकेत वाढू लागले आहेत, असा आरोप जागरूक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
'आम्ही कचरा निर्माण करत नाही आम्ही संपत्ती' निर्माण करतो या संकल्पनेला आधारभूत ठेऊन महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयात राज्यातील पहिला शून्य कचरा कार्यालय प्रकल्प उपक्रम राबविण्यात आला. जागतिक शून्य कचरा दिवसाच्या निमित्ताने हा उपक्रम आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आला आहे.
क क्षेत्रीय कार्यालयात निविदा प्रक्रिया न राबविता शून्य कचरा प्रकल्प कार्यालय उपक्रम राबविला. पण, त्या उपक्रमात कर्मचा-यांना पत्ते खेळण्यात आणि जुगार अड्डा चालविण्याचा परवाना दिलाय का? याबाबत आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे तक्रार केली आहे. शून्य कचरा प्रकल्पाशेजारीच खतासाठी साठवण रूम तयार केलेली आहे. त्या रूममध्ये जुगार अड्डा सुरू आहे.
- अमित मोहिते, शहर उपाध्यक्ष, सामूहिक गुंडगिरी, दहशतवाद, भ्रष्टाचार विरोधी संघटना
महापालिकेच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळी जे कोणी कर्मचारी पत्ते खेळत असतील, त्या कर्मचा-यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल. यात जे दोषी आढळतील, त्यांच्यावर महापालिका अधिनियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल.
- अण्णा बोदडे, सहायक आयुक्त, क क्षेत्रीय कार्यालय, पिंपरी-चिंचवड महापालिका
काय आहे शून्य कचरा कार्यालय उपक्रम?
क्षेत्रीय कार्यालयात एकूण १३३ अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात ४१ महिला आणि ९२ पुरुष कर्मचारी आहेत. कार्यालयात दैनंदिन निर्माण होणारा जेवणाचा कचरा, वापरलेले कागद, वापरलेले पेन, कार्यालय परिसरातील झाडांचा पालापाचोळा आणि प्लास्टिक यांचे अलगीकरण करण्यात येते.
प्रत्येकाने प्लास्टिकची पाण्याची बॉटल, जेवणाचा प्लास्टिकचा डब्बा, प्लास्टिकची पिशवी बंद केली. कर्मचाऱ्यांकडून लेखनाचा आणि छपाई केलेला पेपर फाडून कचरापेटीत जायचे, तथापि या उपक्रमांतर्गत वापरलेले कागद याचे संकलन करून लगदा तयार करून पुनर्वापर करण्यात येणार आहे.
कार्यालयात दररोज निर्माण होणारा सुका कचरा २० किलो, पालापाचोळा आणि निर्माल्य ४१ किलो असे एकूण ६१ किलो दिवसाला म्हणजे महिन्याला सुमारे २ टन आणि वर्षाला २४ टन कचरा निर्माण होत होता. त्याचे संकलन करून मोशी कचरा डेपोला दररोज तो पाठवण्यात येत होता. शून्य कचरा कार्यालय उपक्रमामुळे ही वाहतूक पूर्णपणे बंद होऊन आर्थिक बचत आणि वाहतुकीसाठी लागणारे इंधनाची बचत होणार आहे. कार्यालयातील ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यात येत असून त्याचा वापर महापालिकेच्या उद्यान विभागासाठी करण्यात येणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.