पिंपरी चिंचवडमधील विद्यार्थ्यांसाठी पुन्हा मोफत बससेवा सुरू
पिंपरी चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा मोफत बससेवा देण्यात सुरू करण्यात आली आहे. यामध्ये रावेत, पुनवळे, किवळे येथील बांधकाम कामगार आणि मजुरांच्या मुलांना त्यांच्या घरापासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावरील शाळांमध्ये बसने जाता यावे, यासाठी ही बससेवा सुरु करण्यात आली आहे. सहयोगी फाउंडेशन आणि इतर काही संस्थांनी केलेल्या मागणीनंतर बससेवा सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, या अगोदर देखील शहरातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बस सुरू करण्यात आली होती. मात्र, कोरोना काळात ती पुन्हा बंद करण्यात आली होती.
शहरातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा सुरू करण्यात यावी, यासाठी सहयोगी फाऊंडेशनच्या अध्यक्षांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि महापालिका आयुक्तांकडे पाठपुरवठा केला होता. यात रावेत, पुनावळे, किवळे परिसरातील विद्यार्थ्यांना दोन ते अडीच किलोमीटर लांब असलेल्या महापालिकेच्या शाळेत जावे लागते. यातील बहुतांश विद्यार्थी वंचित कुटुंबातील आहेत. त्यामुळे पैसे खर्च करून शाळेत जाणे या विद्यार्थ्यांना शक्य होत नाही. सध्या विद्यार्थ्यांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मोफत बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली होती.
दरम्यान, गतवर्षी बससेवा उपलब्ध नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शाळेत जाता आले नव्हते. अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया गेले. शिवाय, मुलांच्या अपहरणाच्या घटना लक्षात घेऊन अनेक पालक आपल्या मुलांना एकटे शाळेत पाठवण्याचे धाडस करत नाहीत. मात्र, आता बससेवा सुरू झाल्यास मुलांचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे. आता पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सुरू झालेल्या या बस सुविधेमुळे झोपडपट्टीतील अनेक शाळाबाह्य मुलांना शाळेत जाता येणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.