ऑनलाइन सेवेचा फसवणुकीचा फंडा
पंकज खोले
सध्याच्या जमान्यात ऑनलाइन सेवा मुळे नागरिकांना देखभाल दुरुस्तीची कामे स्वस्त व सुलभ मिळतात. मात्र, या ऑनलाइन सेवेचा महिलेला हजारो रुपयांचा गंडा घालण्याचा तिच्या दक्षतेमुळे उघडकीस आला. सांगवी पोलिसांनी (Sangvi Police) या सर्वांची पोलीस ठाण्यात हजेरी घेतल्याने नरमाईची भूमिका घेत संबंधित महिलेचे पैसे परत केले.
पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) येथे शिवार गार्डन चौक येथील एका सोसायटीत हा प्रकार घडला. येथे रूपाली महाजन यांनी जस्ट डायल (Just Dial) माध्यमातून इलेक्ट्रिक स्विच (एसी) बदलण्यासाठी इलेक्ट्रिशन सर्च केला. काही वेळातच त्यांच्या फोनवरती संपर्क साधून दुरुस्तीसाठी येत असल्याचे सांगितले. २४ बाय ७ इलेक्ट्रिक सर्व्हिस नावाने एक व्यक्ती तेथे दाखल झाला. मुख्य दुरुस्ती सोडून तुमची वायरिंग खराब झाली आहे, मीटर फॉल्ट आहे अशी बतावणी केली. त्यानंतर सदनिकेचा वीज पुरवठा खंडित करून दुरुस्तीच्या नावाखाली १६ हजार रुपयांची मागणी केली. तसेच, एकूण खर्च ७० हजार रुपये असल्याचे सांगितले. एका स्वीच खर्चाचा आकडा ऐकून संबंधित महिला हादरली. तसेच पैसे न दिल्यास वीज सुरळीत न करण्याची धमकीसुद्धा दिली. उपस्थित असलेल्या दोन कर्मचाऱ्याने त्याच्या अन्य सहा साथीदारांना बोलून घेतले. पैसे देत नाही तोपर्यंत घराबाहेर पडणार नाही, अशी धमकीवजा बतावणी करून सर्वजण महिलेशी उद्धटपणे बोलू लागले. (Online Fraud)
दरम्यान, महाजन यांना हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे लक्षात आले. त्यांनी स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांची मदत घेतली. त्या कर्मचाऱ्यांना कंपनीचा पत्ता, फोन क्रमांक देण्याची मागणी केली. मात्र, कोणत्याही प्रकारचे उत्तर न देता सर्वजण पैशासाठी अडवून बसले. यानंतर अखेर स्थानिक पोलिसांची मदत घेण्यात आली. रात्री साधारण एक वाजता पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेची कहाणी ऐकल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांनी या सर्वांची हजेरी घेतल्यानंतर त्या सर्वांनी नरमाईची भूमिका घेतली. चौकशीत त्यांच्याकडे कोणत्या प्रकारचे ओळखपत्र नसल्याचे दिसून आले. कधी कोंढवा तर कधी रांजणगाव या ठिकाणी कार्यालय असल्याचे सांगितले. मात्र पिंपरी-चिंचवड शहरात कार्यालय नाही, असे त्यांनी पोलिसांना सांगितले. याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
अन् पैसे केले परत
दुरुस्तीला आल्यापासून अस्ताव्यस्त बसणे, उध्दटपणे बोलणे, जबरदस्ती करण्याच्या प्रकारामुळे कुटुंबीयांना संशय आला होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांना त्याची माहिती देण्यात आली. अवघ्या काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सांगवी पोलीस ठाण्याला रात्री १ वाजता आल्यानंतर सर्वांची हजेरी घेतली. त्यानंतर नरमाईची भूमिका घेत ऑनलाइन स्वीकारलेले १६ हजार रुपये परत दिले.
अशाप्रकारे आणखीन पुणे परिसरात कोणाची फसवणूक केली आहे का, याची चौकशी पोलिसांनी करणे आवश्यक आहे. कुटुंबीयांना घाबरून जबरदस्ती करून पैसे काढायचे काम करीत असल्याचा संशय आहे. शहरातील नागरिकांनी अशा फसव्या जाहिराती पासून सावध राहावे. - राजू सावळे, शहर उपाध्यक्ष, मनसे
याबाबत महिलेचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. त्या अनुषंगाने चौकशी सुरू आहे. - सुनील तांबे, पोलीस निरीक्षक, सांगवी
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.