किशोर आवारे हत्या प्रकरणी चार आरोपींना अटक
जनसेवा विकास सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलीसांना मोठे यश आले आहे. पिंपरी चिंचवड पोलीसांनी अवघ्या २४ तासात चार आरोपींना अटक केली आहे.
श्याम नीगडकर, संदीप मोरे, राघू धोत्रे आणि आदेश धोत्रे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी किशोर आवारे यांच्या आई सुलोचना आवारे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
आवारे शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास तळेगांव दाभाडे नगरपरिषदेत मुख्याधिकाऱ्याला भेटण्यासाठी आले होते. मुख्याधिकाऱ्याला भेटून आवारे दुपारी दोनच्या सुमारास बाहेर पडले होते. त्यावेळी दबाधरून बसलेल्या चौघांनी त्यांच्यावर हल्ला केला. चार जणांपैकी दोघा जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. तर दोन जणांनी कोयत्याने वार केले आहेत. हा सर्वप्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.
या हत्येनंतर राष्ट्रवादीचे आमदार सुनिल शेळके यांच्यासह ७ जणांवर खून आणि खूनाचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता अवघ्या २४ तासात पिंपरी चिंचवड पोलीसांनी ४ जणांना अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.