अखेर निगडीपर्यंत मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा, केंद्र सरकारची मान्यता
पिंपरी चिंचवडकरांसाठी (Pimpri Chinchwad) आनंदाची बातमी समोर आली आहे. निगडीपर्यंत मेट्रो (Metro) धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालयाने आज (सोमवारी) मान्यता दिली आहे. त्यामुळे सध्या पिंपरी चौकापर्यंत धावणारी मेट्रो निगडीतील (Nigdi) भक्ती-शक्ती चौकापर्यंत लवकरच धावणार असून नागरिकांच्या मागणीला यश आले आहे.
पहिल्या टप्प्यात पिंपरी ते दापोडी हा ७.९ किलोमीटरचा मार्ग १ ऑगस्ट २०२३ पासून सुरू झाला होता. तर, पिंपरी ते फुगेवाडी हा मार्ग ६ मार्च २०२२ पासून सुरू झाला आहे. या मार्गाच्या कामासोबत पिंपरी ते निगडी या ४.१३ किलोमीटर अंतराच्या मार्गाचे काम सुरू करावे, अशी नागरिकांची आग्रही मागणी होती.
नागरिकांची मागणी, सातत्याने होणारे आंदोलने याचा विचार राज्य सरकारने निगडीपर्यंतच्या मेट्रो मार्गाला दोन वर्षापुर्वीच मान्यता दिली होती. मात्र, केंद्र सरकारकडे दोन वर्षांपासून प्रस्ताव रखडला होता. अखेर आज केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. हा मार्ग ४.१३ किलोमीटर लांबीचा असणार आहे. त्यामुळे, निगडीपर्यंत मेट्रो धावण्याचे शहरवासीयांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि पिंपरी-चिंचवडमधील रहिवाशांना चांगली ‘कनेक्टिव्हिटी’ देण्यासाठी हा मेट्रो प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.