अखेर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित; इंद्रायणीच्या प्रदूषणावर तोडगा काढण्याचा प्रयत्न
इंद्रायणी नदीतील प्रदूषणावर (Indrayani river pollution) उपाययोजना करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कुदळवाडी येथे प्रतिदिन ३ दशलक्ष लीटर क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या माध्यमातून सांडपाण्यावर प्रभावीपणे प्रक्रिया होऊन नदीमध्ये मिसळणारे रासायनिक व दूषित पाणी रोखण्यास मदत होते आहे. (Pimpri Chinchwad)
इंद्रायणी नदीच्या प्रदूषण पातळीबाबत नॅशनल रिव्हर कॉन्झर्वेशन डायरेक्टरेटने प्रकाशित केलेल्या अहवालामध्ये नदीच्या प्रदूषण पातळीबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. चिखली, कुदळवाडी, जाधववाडी परिसरातील औद्योगिक कारखाने, गोदामे आणि अनधिकृत व्यवसायांमधून रासायनिक पाणी, तेल व ग्रीसचे होणारे विसर्जन यातून प्रदूषण होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर कुदळवाडी जाधववाडी येथील नाल्यालगतचे अतिक्रमण सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी मोकळे करण्यात आले. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या निर्देशांनुसार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने सदर समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत.
प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या माध्यमातून प्रक्रिया केलेले पाणी व्यावसायिक, नागरिक, बांधकाम व्यावसायिकांना मोफत उपलब्ध करून देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रोत्साहन देत आहे. यासाठी प्रक्रिया केलेले पाणी पाच मिनिटांत टँकरमध्ये भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पिण्याव्यतिरिक्त इतर कारणांसाठी पाण्याचा वापर केल्याने नदीवरील अवलंबित्व कमी होणार आहे.
इंद्रायणी नदीचे रक्षण हेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे प्राधान्य आहे. महापालिका सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासारख्या शाश्वत उपायांची अंमलबजावणी करून प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या पुनर्वापराला प्रोत्साहन देत आहे. यातून समाजाचे व पर्यावरणाचे कल्याण होण्याच्या दृष्टीने महापालिका प्रयत्नशील आहे.
-शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
नदी प्रदूषणाचा सामना करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी म्हणजे एक महत्त्वाचा टप्पा आहे. महापालिका प्रदूषणासारख्या विषयांवर नावीन्यपूर्ण उपायांचा वापर करून पर्यावरण संवर्धनासाठी आयुक्त शेखर सिंह यांच्या सूचनेनुसार आणि अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सक्रिय पावले उचलत आहेत.
-संजय कुलकर्णी, सह-शहर अभियंता, पर्यावरण विभाग
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.