पिंपरी-चिंचवड : अखेर सांगवीतील वटवृक्षांनी घेतला मोकळा श्वास
पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर राहावे यासाठी काम करणाऱ्या पर्यावरणप्रेमींनी नुकत्याच पार पडलेल्या वटपौर्णिमेनिमित्त गुंडाळलेला दोरा वडापासून दूर करण्यासाठी अभियान राबवले. पिंपळे गुरव, नवी सांगवी, सांगवी गाव येथे वडाच्या झाडांना पर्यावरण संवर्धन म्हणून दोरे, कापूस, पणत्या, नैवद्य फुले, हार यांनी वेढलेल्या वडांची झाडे मुक्तता केली.
या उपक्रमात ज्येष्ठ कवी गझलकार सूर्यकांत भोसले यांच्यासह ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांचा मोठा सहभाग होता. वृक्षांचे संवर्धन करणे, झाडे निकोप ठेवणे, मोकळा श्वास जसा माणसाला आवश्यक आहे तसा झाडांना आवश्यक आहे याची जाणीव ठेवून मानवी हक्क संरक्षण जागृती आणि 'दिलासा' संस्था यांनी सामाजिक प्रेरणेतून हे काम करण्यासाठी सर्व पर्यावरणप्रेमींनी पुढाकार घेतला. शहरात विविध ठिकाणी असा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचा मानस व्यक्त केला. शहरातील तरुणांनी आपल्या परिसरात हा उपक्रम राबवावा, असे आवाहनदेखील करण्यात आले.
मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थेचे अध्यक्ष आण्णा जोगदंड म्हणाले की, परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. त्यानुसार आम्ही पुरुषांनी जर स्त्रियांबरोबर वडाच्या झाडाला दोरे बांधत मनोभावे प्रदक्षिणा घेतल्या असतील तर झाडांना मोकळे करणे हे आमचेच काम आहे. हे सर्व काम करताना आम्हाला असे आढळले की, वडाच्या झाडांना खूप खिळे ठोकले होते. तेही काढून झाडांना खिळेमुक्त आणि दोरामुक्त करण्यात आले. 'दिलासा' संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक म्हणाले की, असे उपक्रम शहरातील तरुणांनी पुढाकार घेऊन ठिकठिकाणी राबवावेत. पवना नदी प्रदूषित होत आहे यासाठी लाक्षणिक उपोषणही केले आहे.
पाण्यात उभे कवींना, सामाजिक कार्यकर्त्यांना इंद्रायणी, पवनेत उभे करून नदी प्रदूषणाविषयी दोन्ही संस्थांनी जनजागृती केली आहे. मुरलीधर दळवी, दिनकर क्षीरसागर, गजानन धाराशिवकर, मीना करंजावणे, अमित निंबाळकर, सारंगी करंजावणे हे कार्यकर्ते कात्री, कटर, हॅन्डग्लोज घालून सेवेसाठी उपस्थित होते. आपले पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ आणि सुरेख दिसावे असावे यासाठी मानवी हक्क संरक्षण जागृती आणि दिलासा संस्था कायम कटिबद्ध आहे.
आपले शहर नेहमी स्वच्छ आणि सुंदर राहावे म्हणून हा प्रयत्नशील उपक्रम प्रतिवर्षी मानवी हक्क संरक्षण आणि जागृती ,दिलासा संस्था करीत असते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.