अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांसाठी मिळाली २१ नवी वाहने
रोहित आठवले
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या ताफ्यात २१ नवी कोरी चारचाकी वाहने दाखल झाली आहेत. शासनाकडून ही वाहने देण्यात आली आहेत. ऐन गणेशोत्सवाच्या काळात वाहने दाखल झाल्याने बाप्पा पावल्याच्या प्रतिक्रिया पोलीस वर्तुळात उमटत आहेत. शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यासाठी एक-एक वाहन दिले जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात अठरा पोलीस ठाणी आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यात दोन ते तीन पोलीस चौक्या आहेत. प्रत्येक चौकी अंतर्गत बिट मार्शलीची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांना गस्तीसाठी दुचाकी देण्यात आली आहे. तसेच, पोलीस अधिकाऱ्यांना गस्तीसाठी चारचाकी वाहने देण्यात आली आहेत. पोलीस आयुक्तालयात एकूण १४० चारचाकी (लाईट व्हॅन, कार, बस), १८३ दुचाकी, अशी एकूण ३२३ वाहने आहेत.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत येणारा परिसर आणि लोकसंख्याच्या तुलनेत ही वाहने कमी पडत होती. परिणामी पोलिसांच्या गस्तीवर देखील मर्यादा येत होत्या. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शासनाकडे वाहनांची मागणी केली होती. मागील कित्येक महिन्यापासून ही मागणी प्रलंबित होती. दरम्यान, मंगळवारी (२६ सप्टेंबर) मागणीनुसार महिंद्रा कंपनीची २१ वाहने शहरात दाखल झाली आहेत. या वाहनांमुळे पोलिसांना काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.
प्रत्येक पोलीस ठाण्यासाठी एक चारचाकी शहरात दाखल झालेल्या २१ नव्या वाहनांपैकी प्रत्येकी एक वाहन पोलीस ठाण्यांसाठी देण्यात येणार आहे. ज्यामुळे स्थानिक पोलिसांना आणखी प्रभावीपणे गस्त तसेच इतर कामकाज करता येणार आहे. यापूर्वी नऊ जीप, १८ दुचाकी चालू वर्षात पोलिसांना देण्यात आल्या आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.