रावेत मेट्रो इकोपार्कसाठी 'फसवा' पंचनामा
रावेत येथील मेट्रो इकोपार्कसाठी २०१७ मध्ये मेट्रो रेल कॉर्पोरेशनला दिलेली जागा निवडणूक आयोगाला हस्तांतरीत केली आहे. मात्र, ती जागा पडीक, मोकळी असल्याचा फसवा पंचनामा करणाऱ्या संबंधित तलाठी, तहसीलदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे. याबाबत ग्रीन आर्मीचे प्रशांत राऊळ यांनी तक्रार अर्ज केला आहे. (Raavet Metro)
याबाबत 'सीविक मिरर'शी बोलताना प्रशांत राऊळ म्हणाले की, २०२२ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संबंधित तहसीलदार, तलाठ्यांनी या ठिकाणाचा पंचनामा केला होता. प्रत्यक्षात हजारोंच्या संख्येने झाडे, तळे असूनही पंचनाम्यामध्ये जागा मोकळी व पडीक असल्याचे त्यात नमूद केले. तसेच चारही बाजूला सीमा भिंत, लोखंडी तारेचे कुंपण असा त्यात समावेश करण्यात आला होता. या पंचनाम्यावर तत्कालीन अप्पर तहसीलदार, मंडल अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी असून, त्यात सामाजिक कार्यकर्त, वृक्षप्रेमींचा समावेश आहे. तसेच, शासकीय अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाला देखील चुकीची माहिती दिली आहे. त्यामुळे हा पंचनामा फसवा आणि विरोधाभासाचा असल्याचे निदर्शनास येते. या ठिकाणी असलेली झाडे पाच वर्षांपेक्षा जुनी आहेत.असे असतानाही नेमके कुणाच्या दबावाखाली हा पंचनामा झाला, याची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही राऊळ यांनी केली आहे. (Pimpri Chinchwad)
झाडे तोडण्यामागे अर्थकारण
पिंपरी-चिंचवडमध्ये अवैध वृक्षतोडी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याबाबत तक्रारी देऊनही संबंधित विभागाचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. दरम्यान याची चौकशी होऊन उद्यान विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना पदावरून हटवले पाहिजे. याबाबत चौकशी करण्याची मागणी पालिका आयुक्तांकडे करून देखील त्यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने आता सर्व तपशील हा लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाकडे देण्यात येणार आहे, अशी माहिती राऊळ यांनी दिली.
फसवा पंचनामा करून आम्हा पर्यावरणप्रेमींची मोठी फसवणूक केली आहे. या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात रितसर तक्रार अर्ज केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी करून कारवाई करावी.
- प्रशांत राऊळ, ग्रीन आर्मी, पिंपरी-चिंचवड
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.