वाहतूक कोंडीवर दंडाचा फेल फंडा!
वाहतूक कोंडी (Traffic congestion) सोडविण्यासाठी नवनवे उपक्रम आणि प्रयोग सध्या पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad)राबविले जात आहेत. बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईसाठी दररोज पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांकडून दंड ठोठावला जात आहे. मात्र, याची वसुलीचे प्रमाण तुलनेने कमी असल्यामुळे वाहतूक कोंडी कायम असल्याचे चित्र आहे. (Traffic News)
नोव्हेंबर महिन्यात स्पेशल ड्राईव्ह राबवत पिंपरी चिंचवडमधील ३२,७७५ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई म्हणून २ कोटी ७२ लाख ९१ हजार ७०० रुपये किमतीचा दंड ठोठावण्यात आला. मात्र, यापैकी केवळ ३७ लाख रुपयांचा दंड वसुली करण्यात पोलिसांना यश आले आहे. या व्यतिरिक्त शहरातील विविध चौकात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले असतात. या पोलिसांकडून वाहन चालकांना थांबवून विविध कारणाने दंड केला जातो. परंतु, ऑनलाईन स्वरूपातील हा दंड भरण्यास काही महिन्यांचा कालावधी दिला जात असल्याने, नागरिकांकडून हा दंड भरला जात नाही. तसेच बरेचदा आपल्या वाहनांवर कोणत्या स्वरूपाचा दंड करण्यात आला आहे, याची माहिती नसते. यामुळे दंडाचा अपेक्षित परिणाम साधला जात नाही. परिणामत:, वाहतूक कोंडी सुटलेली नाही.
पोलिसांकडून वाहनचालकांना थांबविल्यानंतर ज्यांनी दोन किंवा त्यापेक्षा अधिक चलनावरील दंड भरलेला नाही, अशांकडून जागेवर दंड वसूल केला जातो. एकीकडे महिन्याला पावणेतीन कोटी रुपयांचा दंड ठोठावला जात असताना दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा कारवाई झाली आणि दंड भरला नाही अशा वाहनचालकांकडून मागील वर्षभरात केवळ २ कोटी १० लाखांचा दंड वसूल करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे नवनवीन योजना आणि प्रयोग राबविताना वाहतूक कोंडी सोडविणे तसेच दंडाची रक्कम वसूल करून बेशिस्तीला आळा घालण्याची अधिक गरज आहे. यात नेमके पोलीस कमी पडत असल्याचे आढळून आले आहे.
खासगी ट्रॅव्हल्स बससाठी ठरविलेले नियम व्यावसायिकांकडून धाब्यावर बसविले गेले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी बसचालकांनी आपल्या बस कुठे थांबवाव्या, याचे परिपत्रक पोलिसांकडून तीन दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले. पण त्यानंतरही शहरातील विविध ठिकाणी खासगी बस थांबवून प्रवाशांची मनमानी वाहतूक सुरूच आहे. ट्रॅव्हल्स बसवाल्यासांठी शहरात पाच पिकअप पाॅईंट पोलिसांकडून निश्चित करण्यात आले आहेत. त्याव्यतिरिक्त शहरात प्रवाशांच्या पिकअप आणि ड्राॅपसाठी कुठेही बस थांबवून वाहतुकीस अडथळा करणाऱ्या ट्रॅव्हल्सवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश उपायुक्त बांगर यांनी शनिवारी दिले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रात चाकण, भोसरी, तळेगाव ही औद्योगिक क्षेत्रे तसेच हिंजवडी, तळवडे ही आयटी पार्क क्षेत्रे आहेत. तसेच देहू आणि आळंदी ही संतांची भूमी आहे. शहरात पिंपरी बाजारपेठ सर्वात मोठी आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा विकास तसेच वाढ वेगाने होत आहे. राज्यातील तसेच देशातील नागरिक मोठ्या प्रमाणावर या शहरात वास्तव्यास आहेत. हे नागरिक आपल्या गावी ये-जा करण्यासाठी प्रामुख्याने लक्झरी ट्रॅव्हल्स बसचा पर्याय निवडतात. लक्झरी ट्रॅव्हल्स बस या निगडी, तळवडे, भोसरी हद्दीतून महाराष्ट्रात तसेच देशाच्या विविध राज्यांत ये-जा करतात.
पिंपरी-चिंचचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील निगडी, तळवडे आणि भोसरी येथून लक्झरी ट्रॅव्हल्स बस ये-जा करत असताना या मार्गातील मधुकर पवळे उड्डाणपूल, खंडोबा माळ, चिंचवड, बिजलीनगर, चिंतामणी चौक, अहिंसा चौक, चापेकर चौक, थेरगाव, बिर्ला हॉस्पिटल, डांगे चौक, काळेवाडी, वाकड, रहाटणी, हिंजवडी, नाशिक फाटा, फुगेवाडी तसेच इतर कोणत्याही ठिकाणी प्रवासी घेण्यासाठी थांबतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच अपघातांच्या संख्येतदेखील वाढ होत आहे. महत्वाचे म्हणजे शनिवारी खासगी बस चालक-मालकांना ठरवून दिलेल्या जागेवर न थांबता अन्यत्र बस थांबविल्या जात आहेत. त्यामुळे कोंडीतून नागरिकांची सुटका झालेली नाही.
पोलिसांनी ठरवून दिलेले ‘पिकअप पाॅईंट’
निगडी येथील भक्ती-शक्ती सर्कल तसेच तळवडे येथील टॉवर लाईन आणि रुपीनगर तसेच भोसरी येथील गावजत्रा मैदान व लांडेवाडी येथील बाबर पेट्रोलपंप हे लक्झरी ट्रॅव्हल्स बससाठी पिक अप आणि ड्रॉप पॉईंट पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेकडून निश्चित करण्यात आले आहेत. त्याव्यतिरिक्त लक्झरी ट्रॅव्हल्स बस कुठेही थांबल्यास बसवर संबंधित वाहतूक विभागांकडून कडक दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. ट्रॅव्हल्स बसचालक, मालक तसेच बुकिंग घेणारे एजंट यांनी नोंद घ्यावी, असे उपायुक्त बांगर यांनी सदर आदेशात नमूद केले आहे. नागरिकांनीही गैरसोय टाळण्यासाठी निगडी येथील भक्ती-शक्ती सर्कल, तळवडे येथील टॉवर लाईन, रुपीनगर, भोसरी येथील गावजत्रा मैदान आणि लांडेवाडी येथील बाबर पेट्रोलपंप या ठिकाणांवरूनच प्रवास सुरू करावा, असे आवाहन पिंपरी -चिचवड वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.
खासगी ट्रॅव्हल्स बस मूळ ठिकाणाहून निघाल्यानंतर त्यांना पिंपरी-चिंचचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवासी घेण्यास मनाई केली आहे. ट्रॅव्हल्स बससाठी पिकअप आणि ड्राॅप पाॅईंट निश्चित केले आहेत. त्यानुसार बसचालक आणि नागरिकांनी सहकार्य करावे. हा आदेश न पाळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.
- बापू बांगर, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.